यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेला प्रचार आणि एकंदर कामगिरीवरूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपावर नाराज असल्याचे चित्र आहे. “नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत”, असा दावा करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत. एकीकडे त्यांनी केलेली वक्तव्ये चर्चेत असतानाच दुसरीकडे ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रामधूनही भाजपाला खडेबोल सुनावण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”

‘ऑर्गनायझर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये असे म्हटले आहे की, या लोकसभा निवडणुकीकरिता भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते संघाकडे मदत मागण्यासाठी आलेच नाहीत; त्याचाच परिणाम म्हणून पक्षाने इतकी खराब कामगिरी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा हा निकाल अतिआत्मविश्वासात असलेल्या भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. तसेच भाजपाचे नेते प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करण्याऐवजी समाजमाध्यमांवर पोस्ट्स शेअर करण्यात व्यग्र होते, असा टोलाही या लेखामध्ये लगावण्यात आला आहे. भाजपाचे नेते आपापल्या कोषात आनंदात बसले होते; ते लोकांचे म्हणणे ऐकायला प्रत्यक्ष जमिनीवर उतरलेच नाहीत.

हेही वाचा : केरळमधील भाजपाचा ख्रिश्चन चेहरा मोदींच्या मंत्रिमंडळात; कोण आहेत जॉर्ज कुरियन?

“फक्त आम्हालाच राजकारण कळत असल्याचा अतिआत्मविश्वास नडला”

भाजपाला कानपिचक्या देणारा हा लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीव सभासद असलेल्या रतन शारदा यांनी लिहिला आहे. त्यांनी लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून भाजपाच्या मातृसंघटनेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये झालेल्या बदलांविषयीची अस्वस्थता व्यक्त होत आहे. शारदा यांनी आपल्या लेखामध्ये असेही म्हटले आहे, “फक्त आम्हालाच राजकारण कळते आणि संघासारख्या इतर संघटनेमधील लोक अडाणी आहेत, असे मानणाऱ्या भाजपा नेत्यांचा अहंकार अत्यंत हास्यास्पद आहे.”

“हा निकाल भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणारा…”

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपाची मैदानी ताकद नाही. खरे तर, जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपाकडे स्वत:चे कार्यकर्ते आहेत. मतदारांपर्यंत पोहोचणे, पक्षाचा अजेंडा समजावून सांगणे, प्रचार साहित्य व मतदार कार्डांचे वाटप करणे इत्यादी कामे करण्याची त्यांची जबाबदारी आहे”, असेही शारदा यांनी लिहिले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमधील खराब कामगिरीच्या दोषाचे खापर भाजपाच्या माथी फोडत शारदा यांनी पुढे असे लिहिले आहे, “२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हा अतिआत्मविश्वासात असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि अनेक नेत्यांना वास्तवाची जाणीव करून देणारा आहे.

“जुन्या समर्पित कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करणे पडले महागात”

“पंतप्रधान मोदींनी दिलेला ‘चारसौपार’चा नारा हे भाजपासाठी दिलेले लक्ष्य होते आणि विरोधकांना दिलेले आव्हान होते, हे भाजपाच्या अनेक नेत्यांना समजलेच नाही. ठरविलेले ध्येय समाजमाध्यमांवर सेल्फी टाकून नव्हे; तर प्रत्यक्ष मैदानात उतरूनच साध्य केले जाऊ शकते. मात्र, भाजपाचे नेते मोदींच्या भरवशावर स्वत:च्या कोषातच राहण्यात धन्यता मानत होते. ते प्रत्यक्ष मैदानात जाऊन लोकांचे म्हणणे ऐकून घेत नव्हते,” असे सांगून शारदा यांनी आपल्या लेखात असा आरोप केला आहे की, जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून, समाजमाध्यमांवरील सेल्फी स्टार कार्यकर्त्यांचा उदय झाल्याने भाजपावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे.

हेही वाचा : Lok Sabha Result 2024: अमिताभ बच्चन… १९८४ ची निवडणूक आणि काँग्रेसची ४० वर्षांची प्रतीक्षा; ‘या’ मतदारसंघात पक्षानं पुन्हा मारली बाजी!

“संघाकडे येण्याची गरज का वाटली नाही?”

पुढे शारदा यांनी लिहिले आहे, “जर भाजपाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मदतीसाठी येण्याची गरज वाटली नसेल; तर ती गरज का वाटली नाही, याचाही खुलासा भाजपाला करावा लागेल.” पुढे त्यांनी भाजपाच्या खासदार आणि मंत्र्यांवरही टीका केली आहे. तेदेखील कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध नव्हते, असा आरोप त्यांनी केला आहे. “भाजपा कार्यकर्ता वा स्वयंसेवक असो वा कोणताही सामान्य नागरिक असो, त्यांना मंत्र्यांची भेट तर दूरच; पण आपल्या आमदार वा खासदाराला भेटणेही अवघड झाले आहे. सामान्य लोकांच्या समस्यांबाबत असलेली उदासीनता हेदेखील पराभवामागचे एक कारण आहे. भाजपाने नियुक्त केलेले खासदार आणि मंत्री नेहमीच व्यग्र का असतात? ते आपापल्या मतदारसंघामध्ये कधीच का दिसत नाहीत? ते एखाद्या मेसेजलाही प्रतिसाद का देत नाहीत,” असे प्रश्नही शारदा यांनी उपस्थित केले आहेत.

“मोदींच्या करिष्म्यालाही मर्यादा”

मोदींच्या करिष्म्यालाही काही मर्यादा असल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे. “सर्वच्या सर्व ५४३ मतदारसंघांतील निवडणूक मोदींनी अथवा मोदींच्या चेहऱ्यावर लढवली जावी, या संकल्पनेला काही मर्यादाही आहेत. जेव्हा उमेदवार बदलला जातो वा स्थानिक नेत्याला डावलले जाते वा इतर पक्षातील आयारामाला उमेदवारी दिली जाते, तेव्हा हीच संकल्पना कुचकामी ठरते. आयारामांना संधी देण्यासाठी चांगले काम करणाऱ्या खासदाराला डावलण्यामुळे नक्कीच दु:ख होते”, अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss on bjp election results reality check for overconfident bjp workers organiser magazine
First published on: 11-06-2024 at 20:03 IST