Asaduddin Owaisi on Namaz ban in Meerut: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज पठणास विरोध दर्शविला आहे. रस्ते चालण्यासाठी असतात, असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंकडून शिस्त शिकण्याचा सल्ला दिला. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये विविद राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मेरठमध्ये रस्त्यावर नमाज पठणास पोलीस प्रशासनाने विरोध केला. त्याबाबत प्रश्न विचारला असता योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले. त्यांच्या मुलाखतीनंतर आता एमआयएम पक्षाचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघकडून रस्त्यावर कवायती (परेड) केल्या जातात. कावड यात्रा निघतात. तसेच सर्वच धर्माचे कार्यक्रम रस्त्यावर होतात, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

“संघाची परेडही रस्त्यावरच होते. ते काय हवेत परेड काढतात का? कावड यात्राही रस्त्यावरूनच निघते. सर्वच धर्माचे उत्सव रस्त्यावर साजरे होतात. आतापर्यंत कुणालाच त्याची अडचण नव्हती. आता तुम्हाला मुस्लीम धर्माची अडचण कशी काय निर्माण झाली?”, असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले, या देशात आता केवळ एकच धर्म उरला आहे का? विविधता हे या देशाचे सौंदर्य आहे. काही जण फक्त एकाच विचारधारेबाबत बोलत आहेत, ती विचारधारा म्हणजे संघाची विचारधार. पण ही विचारधारा संविधानाच्या विरोधात आहे.

ईदच्या दिवशी उत्तर प्रदेश सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करत नमाज पठन मशिदीत करण्याचे आवाहन केले. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी टीका केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे पासपोर्ट आणि वाहन चालक परवाना जप्त करण्यात येईल, असा इशारा मेरठमध्ये पोलिसांनी दिला.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

योगी आदित्यनाथ यांनी मेरठ प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाचे समर्थन केले. “मेरठमध्ये जे आदेश निघाले ते बरोबरच आहेत. रस्ते चालण्यासाठी असतात. जे लोक हे बोलत आहेत, त्यांनी हिंदूंकडून शिस्त शिकायला हवी. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी ६६ कोटी लोक आले होते. कुठेही लुटमार, हल्ले, छेडछाड, तोडफोड, अपहरण असले प्रकार झाले नाहीत. ही धार्मिक शिस्त आहे. कोट्यवधी लोक श्रद्धेने आले, महास्नान केले आणि आपापल्या घरी परतले”, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

अखिलेश यादव यांच्याकडून टीका

दरम्यान मेरठमधील नमाज पठनाला विरोध आणि महाकुंभमध्ये ६६ कोटी भाविक आल्याच्या दाव्यावर आता विरोधकांकडून टीका होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी माध्यमांशी बोलताना यावर टीका केली. ते म्हणाले, “६६ कोटी लोक महाकुंभला आले, असा दावा त्यांच्याकडून केला जातो. एकवेळेस आम्ही हे मान्य करू, पण ही संख्या योग्य आहे का? जर ६६ कोटींएवढा आकडा सरकार मोजू शकते, मग महाकुंभमध्ये हरवलेल्या हजाराहून हिंदू भाविकांची ओळख का नाही पटवली गेली. त्यांची नावे का जाहीर केली जात नाहीत.”

महाकुंभमध्ये आलेल्या अनेक भाविकांचा मृत्यू झाला. कुणालाही मदत दिली गेली नाही. आजवर मृत्यूमुखी पडलेल्यांची यादी जाहीर केली नाही. महाकुंभ यंदा डिजिटल असल्याचे सरकारने सांगितले. ड्रोन, सीसीटीव्ही तैनात करण्यात आले होते. मग चेंगराचेंगरी झाली, त्याठिकाणाचे सीसीटीव्ही आतापर्यंत समोर का आणले गेले नाही. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे याबद्दलच्या प्रश्नांची चर्चा सरकारला करायची नाही. त्यामुळेच इतर प्रश्नांकडे लक्ष वळविण्यात येत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.

ईदसाठी किट वाटणे हे ध्रुवीकरणच

ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठनास तर विरोध केला गेलाच, त्याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांना ईदच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले. मी स्वतः वरिष्ठ दर्जाच्या पोलिसांना याबद्दल प्रश्न विचारला. तसेच ईदच्या दिवशी सरकारने मुस्लीम समुदायाला सौगात-ए-ईद हे किट वाटले. हाही एकप्रकारे ध्रुवीकरणाचा प्रकार आहे, अशीही टीका अखिलेश यादव यांनी केली.