अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंता व पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली. रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या या तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि २००२ मधल्या गुजरात दंगलीपासून ते भाजपाच्या निवडणूक यशाचे रहस्य अशा विविध मुद्द्यांवर मते मांडली.
आरएसएसचा प्रभाव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधाबद्दल विचारले असता मोदी म्हणाले, “संघानं प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूत महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मग ती स्त्री असो, तरुण असो किंवा कामगार असो.
“सदस्यसंख्येबाबत जर मी म्हटलं, तर आपल्याकडे अनेक भारतीय कामगार संघटना आहेत. देशभरात लाखो सदस्यांसह सुमारे ५० हजार संघटना आहेत. कदाचित संख्येचा विचार करता, यापेक्षा मोठी कामगार संघटना नाही. पण विशेष आहे तो त्यांचा दृष्टिकोन. ऐतिहासिकदृष्ट्या, डाव्या विचारसरणीनं जगभरातील कामगार चळवळींना चालना दिली आणि त्यांचं घोषवाक्य काय होतं? ‘जगातील कामगार एकत्र या’. हा संदेश स्पष्ट होता. म्हणजेच आधी एकत्र या आणि मग आपण इतर सर्व गोष्टी मार्गी लावू शकतो. मात्र, आरएसएस प्रशिक्षित स्वयंसेवकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कामगार संघटना कशावर विश्वास ठेवतात? ‘कामगार जगाला एकत्र करतात…’ हा शब्दांमधला फार लहानसा फरक वाटू शकतो, पण हा फरक एक मोठं वैचारिक परिवर्तन दर्शवतो”, असे मोदी म्हणाले.
तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश कसा झाला? असे फ्रिडमन यांनी विचारले असता यावर मोदी म्हणाले , “लहानपणापासूनच मला कुठल्या ना कुठल्या कामात रममाण होण्याची सवय होती. मला लक्षात आहे की, माकोशी नावाचा एक माणूस होता. तो एका सेवा गटाचा भाग होता. तो डंबोरिन नावाचं एक लहान ढोलासारखं वाद्य घेऊन यायचा आणि त्याच्या स्पष्ट कणखर आवाजात देशभक्तीपर गाणी म्हणायचा. तो जेव्हाही आमच्या गावात यायचा तेव्हा तो वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सादर करायचा. मी त्याची गाणी ऐकण्यासाठी वेड्यासारखा त्याच्यामागे पळायचो. संपूर्ण रात्र मी त्याची गाणी ऐकण्यात मग्न व्हायचो. माहीत नाही का, पण मला ते खूप आवडायचे. आमच्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा होती. तिथे आम्ही खेळायचो आणि देशभक्तीपर गाणी म्हणायचो. त्या गाण्यांमधले शब्द माझ्या मनाला खोलवर स्पर्श करीत, माझ्यात काहीतरी ऊर्जा निर्माण करीत आणि अशा प्रकारे मी अखेर आरएसएसचा एक भाग झालो.”
मोदींनी यावेळी असेही सांगितले,” संघ हा अद्वितीय आहे, अशी संघटना जगात इतर कुठेही अस्तित्वात असू शकत नाही.”
त्याबाबत ते म्हणाले, “लाखो लोक संघाशी जोडलेले आहेत; पण संघ समजून घेणं तितकं सोपं नाही. संघाच्या कार्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचं, आयुष्यात ध्येय असणं म्हणजे नक्की काय याबाबत संघ तुम्हाला मार्ग दाखवतो. दुसरं म्हणजे राष्ट्र हेच सर्वस्व आहे आणि लोकांची सेवा करणं हे देवाची सेवा करण्यासारखं आहे. माझ्या माहितीप्रमाणे, कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ समुदायाच्या पाठिंब्यानं ते जवळपास एक लाख २५ हजार सेवा प्रकल्प राबवतात. तिथे वेळ व्यतीत करणं, मुलांना शिकवणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, आयुष्यात चांगली मूल्य रुजवणं आणि स्वच्छतेचे धडे देणं अशी अनेक कामं केली जातात. एक लाख २५ हजार सेवा प्रकल्प राबवणं हे काही छोटं काम नाही.”
तुमच्या वाटचालीत संघाची काय भूमिका आहे यावर मोदी म्हणाले, “संघाच्या तालमीत घडत असताना मला आयुष्याचं ध्येय उमगलं. त्यानंतर संतांचा सहवास लाभला, त्यातून मला खूप शिकायला मिळालं. त्यामुळे माझा आध्यात्मिक पाया मजबूत झाला. मला शिस्त आणि ध्येयपूर्ण आयुष्य मिळालं. संतांच्या मार्गदर्शनामुळे मला आध्यात्मिक मार्ग मिळाला. स्वामी आत्मस्थानंद आणि त्यांच्यासारख्या इतरांनी माझ्या वाटचालीत संतांची शिकवण मार्गदर्शक प्रेरणा आहे. पावलोपावली मला मार्गदर्शन केलं. रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद यांची शिकवण आणि आरएसएसच्या सेवाकेंद्रित तत्त्वज्ञानानं मला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. “
२००२ मधील गुजरात दंगल
गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ मध्ये घडलेल्या दंगलीबाबत विचारले असता, मोदी म्हणाले, “२००२ ची दंगल ही सर्वांत मोठी दंगल असल्याची चुकीची माहिती पसरवण्यात आली होती. २००२ पूर्वीही गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या.”
वारंवार कुठेतरी कर्फ्यू लादला जात, पतंग उडवणं किंवा अगदी किरकोळ सायकलींच्या धडकेसारख्या क्षुल्लक कारणावरूनही जातीय हिंसाचार उफाळून येत असे. २००२ पूर्वी २५० पेक्षा जास्त दंगली झाल्या होत्या. १९६९ मधील दंगल तब्बल सहा महिने सुरू होती. त्यामुळे मी पदावर येण्यापूर्वीचा हा दंगलींचा इतिहास आहे. यादरम्यान बोलताना एक दु:खद घटना अशी की, काही लोकांना हिंसाचाराकडे वळवण्याचं एक कारण झालं, असे म्हणत पंतप्रधानांनी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना फटकारले.
“न्यायव्यवस्थेनं या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यावेळी आमचे राजकीय विरोधक सत्तेत होते आणि अर्थात, त्यांना आमच्यावरील सर्व आरोप तसेच टिकून राहावेत, असं वाटत होतं. त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता, न्यायव्यवस्थेने या संपूर्ण प्रकरणाचा दोनदा सखोल अभ्यास केला. आणि अखेर आम्हाला पूर्णपणे निर्दोष ठरवलं. व्होट बँकेच्या राजकारणापासून दूर राहण्याचा आमचा दृष्टिकोन कायम आहे. त्याऐवजी ‘एकत्र सर्वांसाठी, सर्वांसाठी विकास, सर्वांकडून विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न’, असा आमचा मंत्र आहे. आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणापासून दूर जाऊन आकांक्षेच्या राजकारणाकडे वळलो आहोत आणि आज गुजरात विकसित भारताच्या निर्मितीमध्ये सक्रिय योगदान देत आहे”, असे मोदी म्हणाले.
गुजरातमध्ये सांप्रदायिक हिंसाचाराला कारणीभूत ठरणारी जागतिक परिस्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे मोदींनी सांगितले. हे बोलताना त्यांनी १९९९ चे कंधार अपहरण, २००० मध्ये लाल किल्ल्यावरील हल्ला, ९/११ हल्ला, २००१ मधील जम्मू-काश्मीर विधानसभेवरील आणि संसदेवर झालेल्या हल्ल्यांचा तपशीलही सांगितला.
२४ फेब्रुवारी २००२ मध्ये मी पहिल्यांदाच राज्याचा प्रतिनिधी झालो. २४, २५ व २६ फेब्रुवारीला मी पहिल्यांदाच गुजरात विधानसभेत प्रवेश केला. २७ फेब्रुवारीला आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभेत बसलेलो असताना अचानक गोध्राची भयानक घटना घडली. राज्याचा प्रतिनिधी म्हणून मला केवळ तीनच दिवस झाले होते. या हिंसाचारात लोकांना जिवंत जाळण्यात आलं. कंदाहार अपहरण, लाल किल्ल्यावर झालेला हल्ला, वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर झालेला हल्ला, जम्मू काश्मीर विधिमंडळात झालेला हल्ला या सगळ्या हिंसक अस्थिर घटनांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हिंसक घटना घडल्या. याची कल्पना तुम्ही करू शकता. अर्थात, हे सर्वांसाठीच अतिशय दु:खद होतं. कारण- सर्वांना शांतताच हवी आहे.”
भाजपाच्या निवडणूक यशाबाबत…
भाजपाने एकामागोमाग एक निवडणुका कशा जिंकल्या याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. याचे श्रेय त्यांनी संघटनात्मक कामाच्या, निवडणूक व्यवस्थापनाच्या आणि मोहिमांच्या रणनीती आखण्याच्या त्यांच्या अनुभवाला दिले.
“माझ्यासाठी जनता जनार्दन माझा देव आहे. त्यांनी सोपवलेलं कर्तव्य पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांचा विश्वास कधीही डगमगणार नाही याची खात्री बाळगण्यासाठी मी वचनबद्ध आहे. मी जो आहे, तेच ते पाहतात. माझं सरकार कुठलीही कल्याणकारी योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक योजना त्या त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. प्रत्येक लाभार्थ्याला समान वागणूक मिळाली पाहिजे. जात, पंथ, श्रद्धा, संपत्ती किंवा विचारांमुळे कोणालाही भेदभावाचा सामना करावा लागू नये. आपण सर्वांचे कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्यांना थेट लाभ कधी मिळत नाही त्यांना कधीही वगळलं जात नाही किंवा चुकीची वागणूक दिली जात नाही. योग्य वेळी त्यांनाही फायदा होईल हे जाणून दिलासा मिळतो. त्यामुळे खोलवर विश्वासाची भावना निर्माण होते आणि विश्वास हा माझ्या शासनाचा आधारस्तंभ आहे”, असे ते म्हणाले.
आपल्या यशाबद्दल बोलताना मोदी सांगतात, “आमच्या सरकारचा कामाचा गाभा सामान्य माणूस आहे; मतदान नाही. नागरिकांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी ते वचनबद्ध आहे. एक समर्पित पुजाऱ्याप्रमाणे, माझं मन केवळ जनतेची सेवा करण्यावर केंद्रित आहे. मी स्वत:ला लोकांपासून कधीच दूर केलं नाही. मी त्यांच्यामध्ये त्यांच्यापैकीच एक म्हणून राहतो. ज्यांच्यासोबत मी काम करतो, त्यांना मी हेच सांगतो की, तुम्ही अथक परिश्रम केले तर मीसुद्धा आणखी अथक परिश्रम करेन. लोक हे पाहतात आणि त्यांचा विश्वास आणखी मजबूत होतो. त्याशिवाय माझ्या पदाचा गैरवापर करतील असे मित्र किंवा नातेवाईक नाहीत. हितसंबंध विरहित व्यवस्थेला सामान्य माणूस प्राधान्य देतो आणि कदाचित हेच या यशाचं कारण आहे.”
मोदींनी आपल्या यशाचे श्रेय पक्षालाही दिले, ज्याचे लाखो समर्पित कार्यकर्ते भारताच्या आणि त्याच्या नागरिकांच्या कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहेत.
‘भारत एक राष्ट्र’
भारताला एक राष्ट्र म्हणून ओळखण्यामागची कल्पना काय, असा प्रश्न फ्रिडमन यांनी पंतप्रधानांना विचारला. त्यावर ते म्हणाले, “भारत ही एक सांस्कृतिक ओळख आहे, हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती आहे. भारताची विशालता, १००हून अधिक भाषा, हजारो बोलीभाषा… भारत हा इतका वैविध्यपूर्ण देश आहे की, आपल्याकडे जसं म्हणतात की दर २० मैलांवर भाषा बदलते, चालीरीती बदलतात, पाककृती बदलतात, अगदी कपड्यांच्या शैलीही बदलतात. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत तुम्हाला संपूर्ण देशात प्रचंड विविधता दिसेल. पण, तुम्ही थोडं खोलवर गेलात तर या सगळ्यात एक समान धागा तुम्हाला सापडेल. याचं उदाहरण म्हणजे, श्रीरामांच्या कथा भारतात सगळीकडेच ऐकू येतात. त्यांचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येतं. तुम्ही तमिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत पाहिलंत, तर तुम्हाला असे लोक सापडतील ज्यांच्या नावात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात राम आहे. गुजरातमध्ये रामभाई आहेत, तमिळनाडूमध्ये रामचंद्र आणि महाराष्ट्रात रामभाऊ… हे अद्भुत सांस्कृतिक बंध भारताला एक संस्कृती म्हणून एकत्रित करतात.