Role Of RSS In BJP Delhi Victory : दिल्लीत पाच फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत २६ वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले आहे. दरम्यान भाजपाने मिळवलेल्या या विजयात अनेक छोट्या-मोठ्या घटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीत पडद्यामागून केलेल्या प्रचाराचाही मोठा वाटा आहे. आज जाहीर झालेल्या निकालातून ते पाहायलाही मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थानिक मुद्द्यांभोवती चर्चा निर्माण केल्या आणि मतदारांना सर्वोत्तम उमेदवार आणि सर्वोत्तम पक्षाला मतदान करण्यास प्रवृत्त केले. निवडणुकीच्या काळात संघाच्या स्वयंसेवकांनी विविध मुद्दे उपस्थित करत, मतदारांना मतदान करण्यापूर्वी त्याबाबत विचार करण्याचे आवाहनही केले. दिल्ली बचाव अभियानांतर्गत दिल्लीतील बहुतेक भागात संघाच्या स्वयंसेवकांनी हे आंदोलन करत, ‘उत्तम दिल्ली आणि उत्तम भारतासाठी, १०० टक्के मतदान करा’, असा नारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नेमकं काय केलं?

यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी दिल्लीतील मतदारांबरोबर १० मुद्द्यांवर बैठका घेतल्या. यामध्ये स्वच्छता, स्वच्छ पाणी, आरोग्य, महिला सुरक्षा, रस्ते, यमुना नदी, वायू प्रदूषण, बेकायदेशीर स्थलांतर, सांडपाणी व्यवस्था आणि रोजगार या मुद्द्यांचा समावेश होता. या मुद्द्यांचा झोपडपट्टी भागांत राहणाऱ्या असंख्य नागरिकांवर परिणाम झाला आणि निम्न उत्पन्न गटातील मोठा वर्ग आपोआप आम आदमी पक्षापासून दूर गेला.

संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या अभियानादरम्यान, दिल्लीतील ७० टक्के रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागते, याबाबतचाही मुद्दा उपस्थित केला होता. दिल्लीत आपचे बहुचर्चित मोहल्ला क्लिनिक मॉडेल मोठ्या प्रमाणात कुचकामी ठरल्याने निम्न उत्पन्न गटांतील लोकांवर याचाही मोठा परिणाम झाला आहे. दुसरीकडे संघाच्या स्वयंसेवकांनी सामान्य लोकांवरील उपचारांवरील आर्थिक भार कमी करण्यास मदत करणारी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आप सरकारने, दिल्लीत लागू केली नाही, हे पटवून दिले. संघाच्या स्वयंसेवकांनी पुढे दिल्लीकरांना शहर दहशतवादमुक्त आणि दंगलमुक्त करणे का महत्त्वाचे आहे, हे सुद्धा पटवून दिल्याने या मुद्यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. परिणामी त्याचे मतांमध्ये रुपांतर झाल्याचेही पाहायला मिळाले.

अन् विकासावर चर्चा सुरू झाली

याशिवाय, संघाच्या स्वयंसेवकांनी असेही काही काही मुद्दे उपस्थित केले, ज्यामुळे दिल्लीत विकासावर सकारात्मक चर्चा सुरू झाली आणि या चर्चेचा लाभ भाजपाला मिळाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये नियोजित शहरी विकास, परवडणारी घरे, सर्व समावेशक विकास, दिल्लीतील सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा व नवोपक्रमाचा वापर, दिल्लीचा सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि महिलांचा सन्मान व सुरक्षा यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता.