Maha Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे यंदा कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) गुरूवारपासून वंचित वर्गातील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभ दर्शनासाठी घेऊन जाणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश अनुसूचित जाती (SC) समुदायातील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.
आरएसएसची शैक्षणिक विंग विद्या भारतीने या संपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती देताना सांहितले की, संस्कार केंद्रांचे विद्यार्थ्यांना हिंदू परंपरा, भारतीय संस्कृती यांची ओळख व्हावी आणि ते धर्मांतराला बळी पडू नयेत यासाठी सध्या सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला भेट दिली जाणार आहे. या कुंभ दर्शणासाठी जाणारे सर्व विद्यार्थी हे १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालक असतील.
अवध भागातील सेवा भारती शाळांचे प्रशिक्षक रामजी सिंग हे या उपक्रमाच्या उद्देशाबद्दल बोलताना म्हणाले की, “विद्यार्थ्यांना कुंभ दर्शनासाठी घेऊन जाण्याचा उद्देश त्यांना भारताच्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीची तसेच महाकुंभाच्या आध्यात्मिक बाजूची जाणीव करून देणे हा आहे. जेव्हा (ख्रिश्चन) मिशनरी त्यांच्या भागात जातात आणि ते हिंदू नाहीत असा दावा करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी याची मदत होईल”.
या उपक्रमाशी संबंधित एका आरएसएस कार्यकर्त्याने सांगितलं की फिरायला येणारे सर्व विद्यार्थी दलित समुदायातील आहेत, ज्यांना संघात ‘वंचित समाज’ म्हटले जाते.
वेळापत्रकानुसार संस्कार केंद्रात शिक्षण घेणारे उत्तर प्रदेशच्या अवघ भागामधील १४ जिल्ह्यातील २१०० च्या जवळपास विद्यार्थी हे १६ आणि १८ जानेवारीच्या दरम्यान महा कुंभ परिसरात वास्तव्यास असतील. या कालावधीत विद्यार्थी वेगवेगळ्या संतांचे आश्रम, अखाडे आणि संगम घाट या ठिकाणांना भेटी देतील. संघटनेने त्यांच्या निवासासाठी कुंभ मेळ्याच्या सेक्टर ९ मध्ये कॅम्प उभारला आहे.
देशभरात विद्या भारतीकडून संस्कार केंद्रे चालवली जातात, ज्यामध्ये गरीब घारतील विद्यार्थी ज्यामध्ये बहुतांश झोपडपट्टी भागात रहाणारे ज्यांना शाळेत प्रवेश घेणे परवडत नाही अशांचा समावेश असतो.
“संस्कार केंद्रातील मुलांना भारत माता, राष्ट्रवाद आणि देश भक्तीची गाणी शिकवले जातात. त्यांना नियमीत शालेय शिक्षणाबरोबरच आपली संस्कृती आणि वडिलधाऱ्यांना कसं भेटावं, देवांची पूजा कशी करावी आणि ‘भारत माता की जय’ सारख्या घोषणा कशा द्याव्यात हे शिकवले जाते. सांस्कृतिक शिक्षण आणि धार्मिक प्रथा त्यांच्या परिसरातील वातावरण सुधारतात” असेही सिंग म्हणाले.
अवधच्या विद्यार्थ्यांनंतर, गोरक्ष (गोरखपूर) भागातील जवळपास तितकेच विद्यार्थी २४ ते २६ जानेवारी या कालावधीत कुंभ मेळ्याच्या दौऱ्यावर जातील , त्यानंतर काशी आणि कानपूर भागातील विद्यार्थी येतील. पश्चिम उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी भेटीची तयारी करण्यासंबंधी चर्चा सध्या सुरू आहे. ह विद्यार्थी नंतर एका सत्रात सहभागी होतील जिथे ते त्यांच्या भेटीदरम्यानचे त्यांचे अनुभव सांगतील.