समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने विचार करण्यासाठी वेळ घेतला असतानाच केरळमधील त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सीपीआय (एम)ने समान नागरी कायद्याविरोधात आतापासूनच रणशिंग फुंकले आहे. भाजपा पुढे करत असलेल्या समान नागरी कायद्याला विरोध करण्यासाठी सीपीआय (एम) कडून शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. हे शिबिर आयोजित केल्यामुळे मुस्लिम समाजाच्या आणखी जवळ जाता येईल, असा सीपीआय (एम) पक्षाचा कयास आहे. २०२० साली सीपीआय(एम) पक्षाने नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाच्या विरोधात राज्यभरात रान पेटवून त्यावर लोकप्रयिता मिळवली होती.
रविवारी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे राज्य सरचिटणीस एम. व्ही. गोविंदन यांनी सांगितले की, पक्षातर्फे समान नागरी कायद्याच्या विरोधात कोझिकोड येथे राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. “सीपीआय (एम) समान नागरी कायद्याचा तीव्र विरोध करत आहे. शिबिर आयोजित करण्यासोबतच पक्षातर्फे या कायद्याच्या विरोधात आणखी कार्यक्रम घेण्यात येतील. ज्या ज्या लोकांना भारताची धर्मनिरपेक्ष विचारधारा टिकून राहावी असे वाटत असेल त्यांनी या कार्यक्रमांना पाठिंबा द्यावा. आम्ही या शिबिरासाठी “समस्थ केरळ जम-इयाथूल उलेमा” यांना आमंत्रित करत आहोत”, अशी प्रतिक्रिया गोविंदन यांनी दिली.
हे वाचा >> पंतप्रधान मोदी समान नागरी कायद्यासाठी प्रयत्नशील; डॉ. बाबासाहेब आंबेडकर याबद्दल काय म्हणाले होते?
समस्थ ही सुन्नी मुस्लिम विचारवंताची संघटना असून केरळमध्ये त्यांना खूप मोठा जनाधार आहे. तसेच त्यांना इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) या संघनटनेचाही पाठिंबा आहे. समान नागरी कायद्याच्या विरोधात समस्थचे समर्थन मिळाल्यामुळे IUML या काँग्रेसच्या पाठिराख्या संघटनेपर्यंत पोहोचण्याचा सीपीआय(एम) चा कयास दिसत आहे. सीपीआय(एम) ने शिबिराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी IUML नेही समान नागरी कायद्याच्या विरोधात कायदेशीर आणि राजकीय लढा देण्याची घोषणा केली आहे.
सीपीआय (एम) ने समान नागरी कायद्याच्या विरोधात शिबिराची घोषणा करताच, IUML चे प्रदेशाध्यक्ष पनक्कड सईद सादिक अली शिहाब थंगल यांनी सांगितले की, समान नागरी कायद्याचा विरोध करण्यासाठी आम्ही समविचारी संघटनांसोबत एकत्र येण्यास तयार आहोत.