नाशिक – परतीच्या पावसाआधीच यंदा राज्य जलसमृद्ध झाले. पाणी वाटपावरून होणारे संघर्ष तूर्तास थांबले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता सत्ताधारी मंत्री, आमदारांची”जलनायक’, ‘पाणीदार नेतृत्व’ म्हणून नावारुपास येण्याची धडपड सुरू आहे. आपला मतदारसंघ वा जिल्ह्यात तुडुंब भरलेली धरणे, लहान-मोठे तलाव, प्रवाहित झालेले कालवे यांचे जलपूजन, कालवा, नदीतून आवर्तन सोडण्यासारख्या कार्यक्रमांतून संबंधितांनी प्रचाराचा नारळ फोडल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर महाराष्ट्रासह राज्यात इतरत्र अशा कार्यक्रमांची लाट आली आहे. पाणी हा तसा लोकाभिमुख, सर्वस्पर्शी विषय. कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून पालकमंत्री सूत्रे आपल्या हाती ठेवतात. त्यांच्या निर्देशानुसार शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन, आवर्तन सोडले जाते. या वर्षी मुबलक पावसाने आपली छबी चमकवण्याची संधी राजकारण्यांना मिळाली. आवर्तन सोडून आमच्यामुळे पाणी आल्याचे मतदारांवर ठसवणे सोपे, तितकेच प्रभावी ठरते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तर खास जलपूजन विकास दर्शन यात्रा आयोजित केली. यातून एकाच दिवसांत विविध गावांतील सिमेंट बंधारे, पाझर तलाव व धरणांचे पूजन करुन जलसाठ्यामुळे पुढील काळात शेतीला होणारा लाभ कथन केला.

हेही वाचा >>> शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना सरकारी पदे; भाजप, अजित पवार गटाचे नेते दुर्लक्षित

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे दुष्काळी येवला मतदारसंघात केवळ पाणी प्रश्नावर सलग चारवेळा निवडून आले आहेत. सुरुवातीला मांजरपाडा प्रकल्प उभारणी आणि नंतर या प्रकल्पातून आलेल्या पाण्यावर त्यांचे राजकारण तरले आहे. उपरोक्त प्रकल्पाचे पाणी डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झाल्यानंतर भुजबळ यांनी जलपूजन करुन पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नसल्याची ग्वाही दिली. पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाच टीएमसी पाणी मांजरपाड्यात आणले जाईल. यातून येवल्याची तहान भागवून वैजापूर, छत्रपती संभाजीनगरलाही पाणी देणार असल्याचे त्यांच्याकडून मतदारसंघात सांगितले जाते. दुष्काळाचे सावट दूर झाल्यामुळे बागलाण तालुक्यातील केळझर, हरणबारी धरणात भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांनी पूजन केले. जळगावमध्ये ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी वाघूर धरण १०० टक्के भरल्यानंतर जलपूजन केले. या पाण्याचा सर्वाधिक लाभ जामनेर तालुक्यास होतो. जो महाजनांचा मतदारसंघ आहे.

हेही वाचा >>> रंगभूमीवरही महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा अंक

पाण्याचे राजकीय मोल

मुसळधार पावसामुळे यंदा नाशिक-नगर-मराठवाड्यात समन्यायी पाणी वाटपावरून होणारे मतभेद टळले. धरणे न भरल्यास पाणी वाटप या भागात अस्मितेचा विषय बनतो. स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये परस्परांविरोधात आक्रमक भूमिका मांडण्याची स्पर्धा लागते. निवडणुकीत ही आक्रमकता मतांमध्ये रुपांतरीत करता येते. मुबलक पाण्यामुळे यंदा प्रचारातून तो मुद्दा निसटला असला तरी आहे त्याचा कौशल्याने वापर होत आहे. जायकवाडीसाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या विरोधात कोपरगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे व नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकारातून याचिका दाखल आहेत. अलीकडेच सुनावणीत या दोन्ही जिल्ह्यातील लाभधारकांना दिलासा मिळाल्याचा दावा आमदार फरांदे यांनी केला. नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून तसेच दावे होत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling party mla in maharashtra to campaign on solution of water crisis print politics news zws