अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावचे सुपुत्र असलेले रूपेश राऊळ सावंतवाडी तालुका पंचायत समितीचे सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सुमारे १७ वर्षांपूर्वी त्यांनी सामाजिक-राजकीय कार्याचा श्रीगणेशा केला. शेती काम करत असताना कुटुंबात राजकीय वारसा नव्हता. पण सावंतवाडीमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय वातावरण होते. त्यातच शिवसेनेचे शिवराम दळवी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आमदार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे राऊळ यांना सुरुवातीला शिवसैनिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते शिवसेना शाखाप्रमुख म्हणून काम करु लागले. स्वतःला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न करत असताना रेशनिंग दुकान परवाना मिळवला. हे दुकान चालवत त्यांनी समाजकार्य सुरू ठेवले. नंतर दुकानाची जबाबदारी वडील पाहू लागले.
हेही वाचा… किशोर कुमेरिया : लढवय्या शिवसैनिक
यापूर्वी ते वडिलांसोबत चिपळूण तालुक्यातील लोटे येथे राहत होते. वडील गुरुनाथ राऊळ लोटे औद्योगिक वसाहतीत कामाला होते. वडिलांसोबत राहून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर राऊळ यांनी पॅथाॅलाॅजीचे शिक्षण पूर्ण केले. या काळात ते खेड चिपळूण परिसरात शिवसेना नेते रामदास कदम विशेष कार्यरत होते. त्यामुळे राऊळ यांच्यावर शिवसेनेचा प्रभाव पडला आणि त्यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला. त्यानंतर राऊळ कुटुंब सावंतवाडीमध्ये आले. तालुक्यातील नेमळे गावी वडिलांना आणि चराठा येथे मामांना शेतीकामात मदत करु लागले.शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड-चिपळूण येथे शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी बांधिलकी मानणाऱ्या रूपेशवर शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी तालुका प्रमुखपदाची जबाबदारी टाकली. त्यानंतर २०१३ मध्ये राऊळ यांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा प्रसंग घडला. शिवसेनेचे नेते वैभव नाईक आणि तत्कालीन राणेसमर्थक तरुण कार्यकर्ते सतीश सावंत यांच्या उपस्थितीत कणकवलीमध्ये ‘आमने-सामने’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरातील दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेथे वादावादी होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. तेव्हा शिवसेनेचे तालुकाप्रमुख असलेले राऊळ पोलिसांना भिडले. पोलिसांनी लाठीमार केला. स्वाभाविकपणे राऊळ यांना चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेमुळे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात चमकले. मात्र पोलिसांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना गोवा मेडिकल हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले.
हेही वाचा… गजानन मालपुरे : सर्वसामान्य कार्यकर्ता
या राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तत्काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौऱ्यावर आले. गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाऊन रुपेश राऊळ धीर दिला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुण कार्यकर्ता असलेले राऊळ पक्षसंघटनेत महत्त्वाचे कार्यकर्ते बनले. त्यानंतर खासदार विनायक राऊत आणि आमदार दीपक केसरकर यांना दोन निवडणुकांमध्ये विजयी करण्यासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले. उदय सामंत पालकमंत्री असताना त्यांनी विशेष प्रयत्न केले. साकव, रस्ता , शाळा, वीज वितरण अशा विविध कामांच्या नूतनीकरणाची संधी मिळाली. यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी तालुक्यासह दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली. या संपर्काचा फायदा उठवत राऊळ यांनी ग्रामीण भागामध्ये विविध योजना पोहचवल्या. त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना लोकांनी पंचायत समिती सदस्य म्हणूनदेखील विजयी केले.
हेही वाचा… डॉ. देवेंद्र वानखडे : लोकपाल आंदोलनातून राजकारणात
गेल्या जून महिन्यात शिवसेनेत उभी फूट पडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटाबरोबर गेले. यानंतर तालुक्यातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यासाठी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र काम केले.दरम्यान शिवसेनेत उभी फुट पडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटाबरोबर गेले. यानंतर तालुक्यातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण करत विकास कामांना प्राधान्य दिले आहे. त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात संपर्क ठेवला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे शिवसेना तालुक्यात प्रभावीपणे उभी राहिली आहे, असे दावा राऊळ करतात.