दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात रशियातील भारतीयांशी संवाद साधून केली. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या आपल्या भाषणात त्यांनी नवी दिल्ली आणि मॉस्को यांच्यातील जुने संबंध अधोरेखित केले. ते म्हणाले की जेव्हा ते ‘रशिया’ ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात आणि हृदयात ‘सुख-दुख का साथी’ अशी भावना येते. पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताशी आपली मैत्री वाढवल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. मोदी म्हणाले की भारत-रशियाचे संबंध खास आहेत आणि हे संबंध कायम राहतील. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी रशियाच्या अस्त्रखानमधील हाऊस ऑफ इंडियाचाही उल्लेख केला. अस्त्रखानमधील हाऊस ऑफ इंडिया काय आहे आणि त्याच्याशी गुजरातचा संबंध काय? यावर एक नजर टाकू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले?

‘मोदी, मोदी’चा गजर सुरू असताना पंतप्रधानांनी रशियातील भारतीय नागरिकांना संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, “भारत-रशिया संबंधांचे एक प्रतीक म्हणजे अस्त्रखान येथील हाऊस ऑफ इंडिया. १७ व्या शतकात गुजरातमधील व्यापारी तेथे स्थायिक झाले. मी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते, तेव्हा मी तिथे भेट दिली होती.” ऐतिहासिक नोंदी दर्शवतात की, सुमारे ४०० वर्षांपूर्वी, जेव्हा भारतातील व्यापारी, विशेषतः गुजरात मधील व्यापारी व्यापारासाठी रशियाला जायचे, तेव्हा ते अस्त्रखानमधील या इमारतीत राहत असत. जेव्हा हे व्यापारी तेथे आले तेव्हा रशियन अधिकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले, त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली; ज्यामुळे त्यांना स्वतःचे धर्म स्वातंत्र्य आणि बरेच काही मिळाले.

हेही वाचा : भाजपाच्या ‘या’ खासदाराने उद्घाटन कार्यक्रमांसाठी मागितले पैसे; खासदारांच्या नोकरी-व्यवसायासंदर्भात काय आहेत नियम?

अस्त्रखान येथील ‘हाऊस ऑफ इंडिया’चे गुजरात कनेक्शन

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले की, २००१ मध्ये त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून अस्त्रखान येथील हाउस ऑफ इंडियाला भेट दिली होती. पंतप्रधान मोदींच्या जुन्या ‘एक्स’ पोस्टमध्येही अस्त्रखान येथील हाउस ऑफ इंडियाचा उल्लेख आहे. यात त्यांनी लिहिले आहे की ते तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर भारत-रशिया शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मॉस्कोला गेले होते. या भेटीदरम्यान त्यांनी प्रथमच राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान गुजरात आणि रशियन प्रांत अस्त्रखान यांच्यातील सामंजस्यासाठी प्रोटोकॉल करारावर स्वाक्षरी करून भारत-रशिया संबंध दृढ करण्यात आले होते. या करारानुसार दोन्ही राज्यांनी पेट्रो आणि हायड्रोकार्बन क्षेत्र, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन आणि संस्कृती या क्षेत्रात एकत्र काम करण्याचे मान्य केले होते.

भारत आणि रशिया दरम्यानच्या इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (आयएनएसटीसी) मध्येही अस्त्रखानचे हाऊस ऑफ इंडिया महत्त्वपूर्ण आहे. याविषयी सविस्तर माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी आयएनएसटीसीकडून पहिला व्यावसायिक माल येथे पोहोचला होता. आयएनएसटीसी हे ७,२०० किलोमीटर लांबीचे परिवहन नेटवर्क आहे. हा कनेक्टिव्हिटीचा सर्वात लहान मार्ग आहे; ज्याचा उद्देश अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया, युरोप, तसेच भारत आणि इराणमधील मालवाहतूक सुलभ करणे आहे. भारतात याचा मल्टिमोडल मार्ग मुंबई येथून सुरू होतो आणि इराणमधील बंदर अब्बास आणि बंदर-ए-अंझाली येथे जातो, त्यानंतर कॅस्पियन समुद्र ओलांडून रशियातील अस्त्रखान, मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे पोहोचतो.

हेही वाचा : राहुल गांधींच्या मणिपूर दौर्‍यामागचा नेमका उद्देश काय? या दौर्‍यामुळे भाजपावर दबाव वाढणार का?

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी रशियाबरोबरचा व्यापार आणखी वाढवण्यासाठी भारत-रशियाच्या कझान आणि येकातेरिनबर्ग शहरात दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडणार असल्याचीही घोषणा केली. सध्या, भारताचे रशियामध्ये दोन वाणिज्य दूतावास आहेत. एक दूतावास सेंट पीटर्सबर्ग आणि दुसरे व्लादिवोस्तोक येथे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia astrakhan house of india gujarat connection rac
Show comments