Deportation Of Indians From US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांना देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये काही वादग्रस्त निर्णयही आहेत. यात बेकादेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना हद्दपार करण्याचाही समावेश आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीयांना दोन दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने हद्दपार करण्यात आले त्याबद्दल विरोधी पक्षाने गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. काही विरोधी नेत्यांनी विमानात निर्वासितांना बेड्या घालून पाठवण्यात आल्याबद्दल निषेध नोंदवण्यासाठी बेड्या घालून संसदेबाहेर आंदोलन केले.
परराष्ट्र मंत्र्यांकडून स्पष्टीकरण
यानंतर काल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या प्रकरणावर संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिले आणि म्हटले की, “अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना हद्दपार करणे ही नवीन गोष्ट नाही. अर्थातच, आम्ही भारतात परत पाठवण्यात येणाऱ्या नागरिकांशी यादरम्यान कोणत्याही प्रकारे गैरवर्तन केले जाणार नाही याची खात्री करण्यासाठी अमेरिकन सरकारशी चर्चा करत आहोत. यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटद्वारे हद्दपारीची अंमलबजावणी करताना, २०१२ पासून गरज पडल्यास बेड्या घालण्याची तरतूद आहे.”
निर्वासितांना बेड्या घालण्यावर कोलंबियाचा आक्षेप
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर सुरू झालेल्या हद्दपारीमुळे इतर देशांमध्येही वाद निर्माण झाला आहे. २६ जानेवारी रोजी कोलंबियन सरकारने अमेरिकेतून हद्दपार केलेल्या नागरिकांना घेऊन आलेल्या दोन लष्करी विमानांना उतरण्यापासून रोखले होते.
याचबरोबर कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी निर्वासितांना साखळ्यांनी बांधून ठेवण्यावर आक्षेप घेतला आणि म्हटले की, “अमेरिका कोलंबियन स्थलांतरितांना गुन्हेगारांसारखे वागवू शकत नाही, त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे”.
यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियन वस्तूंवर अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याची धमकी दिली होती. तेव्हा पेट्रो यांनी अमेरिकेच्या लष्करी विमानांना कोलंबियात उतरण्यास परवानगी दिली. सुरुवातीला पेट्रो यांनी अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता, परंतु त्यांनी एक पाऊल मागे घेतले.
ब्राझीलची आक्रमक भूमिका
पुढे, २८ जानेवारी रोजी, जेव्हा अमेरिकेचे एक लष्करी विमान, ज्यामध्ये निर्वासितांना बेड्या घातल्या होत्या, ते ब्राझीलमध्ये आले तेव्हा यावर अशीच चीका झाली होती. डीडब्ल्यूने दिलेल्या वृत्तानुसार ब्राझीलचे न्यायमंत्री रिकार्डो लेवांडोव्स्की यांच्या सूचनेनुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांंना निर्वासितांना ठोकलेल्या बेड्य काढण्यास सांगितले होते.
डीडब्ल्यूने आपल्या वृत्ता पुढे असेही म्हटले आहे की, लेवांडोव्स्की यांनी अमेरिकेच्या या कृतीचे वर्णन बंदीवानांच्या मूलभूत अधिकारांचा घोटासा अनादर असे केले आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी निर्देश दिले आहेत की, “ब्राझिलियन नागरिकांना त्यांच्या ठिकाणांवर नेण्यासाठी ब्राझिलियन हवाई दलाचे विमान तैनात करावे जेणेकरून ते त्यांचा प्रवास सन्मानाने पूर्ण करू शकतील”.
अमेरिकेची भूमिका
भारतीयांना ज्या पद्धतीने हद्दपार करण्यात आले त्यावरून प्रश्न उपस्थित होत असताना, नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, “देशाचे इमिग्रेशन कायदे प्रामाणिकपणे लागू करणे हे अमेरिकेच्या राष्ट्रीय आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागच्या कार्यकाळातही हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. पण, त्यासाठी लष्करी विमानांचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे.
अध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वाखाली, २०२४ मध्ये, अमेरिकेने १९२ देशांमध्ये २,७१,००० स्थलांतरितांना परत पाठवले होते. द न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, चार वर्षांत, बायडेन यांच्या सरकारने १.५ दशलक्ष परदेशी नागरिकांना हद्दपार केले आहे.