राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी वसुंधरा राजे सरकराच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी करत अशोक गेहलोत सरकारविरोधात एक दिवसीय उपोषण केले. पायलट यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. येथे अवघ्या ८ महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. वर्षाभराने लोकसभा निवडणूकही होणार आहे. असे असतानाच सचिन पायलट यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर एकाच पक्षात असलेले सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात राजकीय वैर कधीपासून आहे? या वैराचा राजस्थान काँग्रेसवर कसा परिणाम झाला? हे जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन पायलट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते

सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील वाद काँग्रेस सत्तेत नव्हती तेव्हापासून आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर २०१८ सालापासून हा वाद वाढत गेला. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या दोन बड्या नेत्यांमधील वाद सर्वांसमोर आला. काँग्रेसने ही निवडणूक जिंकली होती. त्यावेळी सचिन पायलट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. याच कारणामुळे ते स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे दावेदार समजत होते. मात्र आमदारांचा पाठिंबा गेहलोत यांना होता.

हेही वाचा >> राजस्थान काँग्रेसमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर गेहलोत सरकारविरोधात सचिन पायलट यांचे उपोषण; विरोधकांचा हल्लाबोल!

राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला

पूर्व राजस्थानमधील नेते पायलट यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे या भागातील आमदार जयपूर येथे गेले होते. त्यांनी पायलट यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली होती. या आमदारांचे आंदोलन तीव्र झाल्यामुळे दिल्ली हायकमांडला त्याची दखल घ्यावी लागली. पुढे १४ डिसेंबर २०१८ रोजी खुद्द राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करत गेहलोत आणि पायलट यांच्यातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे फोटो ट्वीट करत ‘एकत्र आलेला राजस्थान’ असे कॅप्शन दिले होते.

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले

त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात पडली. तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. हा वाद संपल्यानंतर आपल्याच समर्थकांना कसे मंत्रिपद मिळेल, यासाठी या दोन नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली होती. हा वादही नंतर कसाबसा संपुष्टात आला होता.

हेही वाचा >> Karnataka Election 2023 : बीएस येडियुरप्पा नाराज? दिल्लीतील बैठक सोडून कर्नाटकमध्ये परतले; अद्याप उमेदवारांची घोषणा नाही!

उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामुळेच माझ्या मुलाचा पराभव झाला- गेहलोत

त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा या दोन नेत्यांमधील बेबनाव सर्वांसमोर आला. कारण या निवडणुकीत काँग्रेसचा राजस्थानमध्ये सर्व २५ जगांवर पराभव झाला. यामध्ये अशोक गेहलोत यांचे पूत्र वैभव गेहलोत हेदेखील पराभूत झाला. वैभव यांच्या विजयासाठी अशोक गेहलोत यांनी पूर्ण ताकदीने प्रचार केला होता. मात्र त्याचा काहीही फायता झाला नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामुळेच माझ्या मुलाचा पराभव झाला, असा आरोप त्यावेळी अशोक गेहलोत यांनी केला होता. या आरोपांमुळे दोघांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.

बंड फसल्यामुळे गेहलोत यांचे सरकार शाबुत राहिले

२०२० साली पुन्हा एकदा येथील काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली. कारण यावेळी सचिन पायलट यांनी आपल्या १८ समर्थक आमदारांना घेऊन बंड केले होते. ते आपल्या आमदारांना घेऊन साधारण महिनाभर हॉटेलवरच होते. या बंडाला भाजपाने बळ दिले आहे, असा त्यावेळी आरोप केला गेला. मात्र यावेळी सचिन पायलट यांना माघार घ्यावी आही. हे बंड फसल्यामुळे गेहलोत यांचे सरकार शाबुत राहिले. मात्र यामुळे पायलट यांचे उपमुख्यमंत्रिपद गेले. यासह त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला.

हेही वाचा >> राहुल गांधींचे ‘अनिष्ट’ व्यवसाय करणाऱ्यांशी संबंध; आझाद यांच्या आरोपानंतर ते अनिष्ट व्यवसाय उघड करण्याची मागणी

पायलट यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते

याच कारणामुळे अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. सचिन पायलट हे काहीही कामाचे नाहीत. ते निकम्मे आहेत, असे गेहलोत म्हणाले होते. या बंडानंतर पायलट यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते, असे म्हटले जाते. कमीतकमी दोन वर्षे तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते, असे सांगितले जाते. मात्र अद्याप तसे झालेले नाही.

पुढील २० वर्षे पायलट यांना मुख्यमंत्री होण्याची संधी नाही- गेहलोत

दुसरीकडे पायलट हे मुख्यमंत्रिपदासाठीचे तरुण नेते आहेत, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. मात्र २ ऑक्टोबर २०२१ रोजी अशोक गेहलोत यांनी एक विधान करून पायलट यांच्या समर्थकांमधील सर्व हवा काढून घेतली होती. पुढच्या १५ ते २० वर्षे् काहीही होणार नाही. तुम्हाला यामुळे दु:खी राहायचे असेल तर राहा. मी काहीही करू शकत नाही, असे म्हणत पुढील २० वर्षे पायलट यांना मुख्यमंत्री होण्याची संधी नाही, असे गेहलोत यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले होते. हा शाब्दिक वाद वाढत गेला होता. पायलट यांना युपीए-२ सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे यासाठी मी प्रयत्न केला होता. मी त्यांना पाठिंबा दिला होता, असा दावा गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वैभव गेहलोत यांना तिकीट देण्यास काँग्रेस हायकमांड उत्सुक नव्हते. मात्र मी पाठिंबा दिल्यामुळे वैभव गेहलोत यांना तिकीट मिळाले, असा दावा तेव्हा पायलट यांनी केला होता.

हेही वाचा >> Karnataka : निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे मंत्री अडचणीत; द्वेषपूर्ण भाषण आणि साडीवाटप प्रकरणात अटकेची शक्यता!

ऐनवेळी गेहलोत यांच्याकडून राजकीय खेळी

या दोन्ही नेत्यांमधील शेवटचा वाद सप्टेंबर २०२२ मध्ये समोर आला. या काळात काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत यांनी उडी घ्यावी, असा सूर तेव्हा काँग्रेसकडू आळवण्यात आला होता. तशी तयारीदेखील गेहलोत यांनी दाखवली होती. या निवडणुकीनंतर गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून दिल्लीमध्ये जातील आणि राजस्थान काँग्रेसचे नेतृत्व पायलट यांच्याकडे जाईल, असा कयास बांधला जात होता. मात्र ऐनवेळी गेहलोत यांनी राजकीय खेळी करत पायलट यांना पुन्हा एकदा हुलकावणी दिली.

८१ आमदार काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उनुपस्थित

एकीकडे गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगितलेले असताना राजस्थानमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचे निशाण हाती घेतले. गेहलोत यांच्या समर्थनार्थ ८१ आमदार काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उनुपस्थित राहिले. तसेच त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष सी पी जोशी यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले. परिणामी गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. ते राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहिले तर सचिन पायलट यांना मुख्यंत्रिपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. पुढे बंड केलेल्या ८१ आमदारांना फक्त नोटीस जारी करण्यात आली. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

हेही वाचा >> महात्मा जोतिबा फुले यांना वंदन करत सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाविरोधातच फुंकले रणशिंग

दरम्यान, सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाने कायम हुलकावणी दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आलेली असताना काहीतरी ठोस निर्णय घेणे पायलट यांना गरजेचे वाटत असावे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आता गेहलोत सरकारविरोधात आघाडी उभारली आहे. त्यामुळे आगामी काळात राजस्थान काँग्रेसमध्ये काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilot and ashok gehlot clash rajasthan congress war know detail information prd