कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक तयारीने जोर धरला असताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव राजस्थानमधून पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांचे नाव चर्चेत आहे. अलीकडेच कॉंग्रेस आमदार आणि राजस्थान अनुसूचित जात आयोगाचे अध्यक्ष खिलाडी लाल बैरवा यांनी पायलट हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असे सांगत तरूण आणि गुज्जर समाज १०० टक्के त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.  

“अशोक गहलोत हे आमचे जुने नेते आहेत. त्यांना राजकारणातील ४० वर्षांचा अनुभव आहे. आजच्या स्थितीत, जर बदलाविषयी चर्चा झाली तर पक्षातील वडील नेते म्हणून त्यांनी तरूण पिढीचा विचार केला पाहिजे,” असे बैरवा म्हणाले. सध्या राज्यात पायलट यांच्यासोबत गेलेले आणि गहलोत यांना पाठिंबा असलेले दोन गट निर्माण झाले आहेत.  अशा वातावरणात राजस्थानमधील निवडणुकांची ही नांदी असून निवडणुकीला केवळ १५ महिने उरल्याने आपली बाजू मजबूत करण्याची ही शेवटची संधी पायलट गटकडे आहे. एकीकडे राज्यातील निवडणुका तोंडावर असताना हायकमांडने पक्षाच्या प्रमुखपदासाठी गहलोत यांच्या नावाचा केलेला विचार आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी पायलट यांना वाढत चाललेला पाठींबा यामुळे राज्यातील वातावरण तंग आहे.

या पार्श्वभूमीवर गहलोत यांनी मात्र आपण राजस्थानात आनंदी असल्याचे म्हटले असून कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी फारसे उत्सुक नसल्याचे म्हटले आहे. जरी त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले तरी राज्यात मुख्यमंत्री म्हणून प्रामाणिक नेत्याची निवड करण्याची अट ठेवतील असे दिसते.  

कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आणि गहलोत यांना हे पद देण्याविषयी उत्सुक नसलेल्या काही व्यक्तींबाबत वार्ताहरांनी पायलट यांना छेडले असता ते म्हणाले: “राजकारणात जे दिसते ते घडत नाही, जे घडते ते दिसत नाही.”   या संदर्भात ७१ वर्षीय गहलोत हे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रमुख अशी दोन्ही पदं आपल्याकडे ठेवतील असे संकेत त्यांच्या बोलण्यातून मिळाले. “मी तुमच्या नजरेच्या टप्प्यात असेन. मी तुमच्यापासून दूर जाणार नाही, असे अनेकदा सांगत आलो आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राज्यापासून दूर जाणार नाही. मग जबाबदारी कोणतीही असो,” सोनिया गांधी यांच्याकडून आपल्या नावाची शिफारस झाल्याची बातमी बाहेर आल्यावर गहलोत यांनी आपले मत स्पष्ट केले.

Story img Loader