Rajasthan Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षातील दोन नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज स्वतःच्याच सरकारविरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसले आहे. भाजपाच्या सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी आपल्या सरकारकडे लावून धरली आहे. विशेष म्हणजे आज महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून पायलट यांनी आपले आंदोलन सुरू केले. जोतिबा फुले यांच्यानिमित्ताने ओबीसी, दलित, वंचित समाजाला हाक देत, विधानसभा निवडणुकीआधी पायलट यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचा एक प्रयत्न केल्याचे यातून दिसत आहे.
सचिन पायलट यांनी जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचीही मागणी स्वतःच्या सरकारपुढे केली आहे. १९ व्या शतकाच्या मध्यात महिलांसाठी शिक्षण, शोषण-जातिविरहित समाज निर्माण करण्यासाठी जोतिबा फुले यांनी संघर्ष केला होता. या संघर्षाची आठवण म्हणून ही सुट्टी जाहीर करावी, अशी त्यांची मागणी आहे.
फक्त सचिन पायलटच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देशातील विविध पक्षांच्या नेत्यांनी जोतिबा फुले यांना अभिवादन केले आहे. मोदींनी अभिवादनपर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मी महात्मा फुले यांना अभिवादन करतो आणि सामाजिक न्याय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महान योगदानाचे स्मरण करतो. त्यांचे विचार लाखो लोकांना प्रेरणा आणि शक्ती देतात.” या ट्विटसोबत त्यांनी फुलेंविषयी काढलेल्या गौरवोद्गाराचे एक भाषणही जोडलेले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील फुले यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांनी लिहिले की, “समाजात न्याय आणि समतेचे राज्य निर्माण करण्यासाठी महात्मा फुले आम्हाला प्रेरणा देतात.”
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीदेखील महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. “सुधारणावादी चळवळीचे प्रणेते आणि वाईट चालीरीती, प्रथा-परंपरा यांना छेद देऊन सामाजिक समता आणि न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या महात्मा जोतिबा फुलेंना विनम्र अभिवादन.”
हे ही वाचा >> पायलट यांच्या उपोषणाला ठरवलं पक्षविरोधी कृती, मुख्यमंत्री विरुद्ध माजी उपमुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा संघर्ष; नेमकं घडतंय काय?
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करून फुले यांना वंदन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख, खासदार शरद पवार यांनी महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करताना म्हटले की, “महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणारे, समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!”
केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांनीही महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त नमन केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, १९ व्या शतकात महिलांना शिक्षण आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी अतुलनीय योगदान दिले.