भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. नुकतेच शिवमोगा मधील बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येवरुन त्यांनी कर्नाटकात चिथावणीखोर भाषण केले होते. “हिंदूंनी आपल्या घरात शस्त्र बाळगावीत. जर शस्त्र नसतील तर भाजी कापण्याच्या चाकू, सुऱ्याला धार काढून ठेवावी. ज्याप्रमाणे तुम्ही भाजी कापता, त्याप्रमाणे त्यांचे शीर…”, प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या या भाषणामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. याआधी देखील प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा अडचणीत आलेले आहेत.
२०१९ साली ठाकूर यांनी एटीएसचे माजी प्रमुख आणि अशोक्र चक्राने सन्मानित केलेले अधिकारी दिवंगत हेमंत करकरे यांची तुलना रावन आणि कंसाशी केली होती. ठाकूर यांना २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटाशी जोडून तुरुंगात टाकल्यामुळेच २६/११ च्या हल्ल्यात करकरेंना जीव गमवावा लागला, असेही त्या म्हणाल्या होत्या. तसेच ठाकूर यांनी करकरेंना तुमचं वाटोळं होईल असं सांगितलं आणि तसंच झालं, असेही त्या एका सभेत म्हणाल्या होत्या.
हेमंत करकरे यांच्यावरील वक्तव्यामुळे प्रज्ञा ठाकूर यांच्यावर चौफेर टीका झाली. निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. भाजपने तर ठाकूर यांच्या वक्तव्यापासून हात झटकले. करकरे आमच्यासाठी हुतात्मा आहेत आणि नेहमीच राहतील, अशी सारवासारव भाजपने केली. साध्वी प्रज्ञा यांचे वक्तव्य वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यांनी जो मानसिक आणि शारीरिक त्रास भोगला त्या उद्वेगातून कदाचित त्या असं बोलल्या असाव्यात, असेही भाजपच्यावतीने सांगितले गेले. करकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर चहुबाजूंनी टीका झाल्यावर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घुमजाव करत वक्तव्य मागे घेतलं आणि माफी मागितली.
काही महिन्यानंतरच प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे “देश भक्त” असल्याचे त्या म्हणाल्या. “नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि राहिल. जे गोडसेला दहशतवादी म्हणून संबोधतात त्यांना या निवडणुकीत उत्तर मिळेल”, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.
करकरेंप्रमाणेच महात्मा गांधी यांच्या वक्तव्यानंतरही भाजपने हात झटकले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर न्यूज२४ वृत्तवाहिनीशी बोलत असताना अशाप्रकारची वक्तव्ये ही भयंकर खराब असल्याचे म्हटले होते. “अशा वक्तव्याचा निषेध केला गेला पाहीजे. सुसंस्कृत समाजात अशा विखारी भाषेला कोणतेही स्थान नाही. जे लोक अशी वक्तव्ये करतात त्यांनी शंभरवेळा विचार करायला हवा. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याबद्दल माफी जरी मागितली तरी मी हृदयापासून त्यांना माफ करु शकणार नाही”, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला असला तरी अनंतकुमार हेगडे आणि नलीन कुमार सारख्या नेत्यांनी मात्र ठाकूर यांची पाठराखण केली. या सर्व नेत्यांना त्यावेळचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी समज देत गोडसे बद्दल बोलाल तर कारवाई करु, असा इशारा दिला. “बेजबाबदार वक्तव्ये करणाऱ्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस पाठविणार आहोत. त्यांचे उत्तर आल्यानंतर शिस्तपालन समिती त्यावर निर्णय घेईल. पुर्ण भाजप पक्ष यामुळे दुःखी असून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा – “हिंदूंनी घरात शस्त्रं बाळगावीत किंवा धारदार सुऱ्या तरी बाळगाव्यात” प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वक्तव्य
इतका विरोध होऊनही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा संसदेतच गोडसे यांची भलामण केली. नोव्हेंबर २०२० मध्ये डीएमकेचे सदस्य ए. राजा यांनी विशेष सुरक्षा दल (दुरुस्ती) विधेयकासंबंधी चर्चा करत असताना महात्मा गांधी यांची हत्या गोडसेने का केली? याबद्दल भाष्य केले. ए. राजा यांच्या भाषणात व्यत्यय आणत प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गोडसेची भलामण केली. यामुळे चिडलेल्या विरोधकांनी ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच भाजपच्या सदस्यांनीही ठाकूर यांना बसण्यास सांगून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अखेर लोकसभेच्या रेकॉर्डवरुन सदर वक्तव्य काढून टाकण्यात आले.
विरोधकांच्या दबावामुळे सरकारने संसदीय समितीमधून ठाकूर यांची गच्छंती केली. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत सांगितले, “खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. भाजप अशा वक्तव्याची कधीच पाठराखण करणार नाही. आम्ही प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संसदीय समितीवरुन बाजूल करत आहोत. तसेच यापुढे त्यांना संसदेच्या पक्षीय बैठकात सहभागी करुन घेतले जाणार नाही.”