Nitesh Rane on Saif Ali Khan Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेनं आता राजकीय वळण घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आणि सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांनी या प्रकरणातील घटनाक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मंगळवारी जेव्हा सैफला मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तेव्हा शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. अभिनेता इतक्या लवकर कसा बरा झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैफवरील हल्ल्याबाबत का घेतली जातेय शंका?

निरुपम म्हणाले, “डॉक्टरांनी सांगितलं की, अडीच इंचांचा चाकू सैफ अली खानच्या पाठीत रुतून बसला होता. त्याच्यावर सहा तास शस्त्रक्रिया करण्यात आली. हे सर्व १६ जानेवारीच्या मध्यरात्री घडलं आणि आज २१ जानेवारीला त्याला डिस्चार्ज मिळाला. अवघ्या पाच दिवसांत तो इतका फिट कसा काय झाला?” दरम्यान, भाजपा मंत्री नितेश राणे यांनीही गुरुवारी सैफ अली खानच्या लवकर बरे होण्याबद्दल शंका व्यक्त केली.

आणखी वाचा : ‘Vote Jihad 2’: फडणवीस सरकारची बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम; आता जन्म दाखल्यांवर करडी नजर

“मी पाहिलं की तो (सैफ) कसा रुग्णालयातून बाहेर आला… मला शंका आहे की, त्याच्यावर खरोखरच चाकूने वार करण्यात आले होते की, तो फक्त नाटक करत होता. जेव्हा जेव्हा शाहरुख खान किंवा सैफ अली खानला सारखा खान जखमी होतो, तेव्हा प्रत्येक जण बोलू लागतो आणि सहानुभूती दाखवू लागतो”, असं नितेश राणे म्हणाले.

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करताना राणे म्हणाले, “जेव्हा सैफ अली खान, नवाब मलिक व शाहरुख खानच्या मुलाला दुखापत होते तेव्हाच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते प्रतिक्रिया देतात. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर राष्ट्रवादीचे नेते गप्प आहेत. हिंदू अभिनेते व कलाकारांवरील हल्ल्यांनंतर ते काहीही बोलत नाहीत,” असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय निरुपम काय म्हणाले?

शिवसेनेचे (शिंदे गट) माजी खासदार संजय निरुपम यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “विरोधी पक्षाच्या कथित पक्षपातीपणाबद्दल मी नितेश राणे यांच्या भूमिकेशी सहमत आहे. त्यांनी असा पक्षपात करू नये आणि कलाकारांकडे त्यांच्या धर्माच्या आधारावर पाहू नये. कलाकारांकडे फक्त कलाकार म्हणूनच बघितलं पाहिजे. हल्ल्यादरम्यान सैफला झालेल्या दुखापतींच्या तीव्रतेबद्दल मला आणि इतर मुंबईकरांना एक प्रश्न पडला आहे. सैफ अली खान इतक्या लवकर बरा होणं हा वैद्यकीय चमत्कारच आहे.”

पुढे बोलताना निरुपम म्हणाले, “सैफ अली खानवर हल्ला झाल्याची घटना मी नाकारत नाही. डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्यावर अत्यंत क्रूर आणि जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. सैफच्या शरीरात अडीच इंचांचा चाकू रुतून बसला होता आणि खूप रक्तस्रावही होत होता. त्याचे पूर्ण कपडे रक्ताने माखले होते, त्या अवस्थेत तो रुग्णालयात पोहोचला. अशा परिस्थितीत अभिनेता चार दिवसांत कसा बरा होऊ शकतो, हा प्रश्न माझ्या मनात आहे. गंभीर दुखापत असूनही एखादी व्यक्ती धावत आणि नाचत घरी कशी परत येऊ शकते?”

‘सैफवरील हल्ल्याचा क्रम बाहेर येणं आवश्यक’

“सैफ अली खानवर झालेला हल्ला किती गंभीर होता हे खान कुटुंबानं उघड करायला हवं. कारण- हल्ल्याच्या वेळी घरात त्याच्या कुटुंबाशिवाय इतर कोणीही नव्हतं. त्यामुळे हल्ल्याचा क्रम बाहेर येणं आवश्यक आहे. सोसायटीच्या सुरक्षिततेवर आणि सीसीटीव्ही देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही संपूर्ण घटना घडली तेव्हा आरोपी सुमारे एक तास सैफच्या घरात होता. मग त्याच्या बचावासाठी कोणीही कसं धावलं नाही हा प्रश्न उपस्थित होतो, असंही निरुपम म्हणाले.

हेही वाचा : Maharashtra Politics : आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या ‘कारभारा’वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय?

नाना पटोले यांची नितेश राणेंवर टीका

संजय निरुपम यांनी मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. “या घटनेनंतर मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील प्रत्येक नागरिकाच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. ज्यामुळे गृहमंत्रालयाचे अपयश दिसून येत आहे”, असं निरुपम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपा मंत्री नितेश राणे यांच्या विधानावर काँग्रेसने कठोर शब्दांत टीका केली आहे. राणे हे जाणून बुजून धर्म आणि राजकारणाची सरमिसळ करीत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचा हा अजेंडा आहे, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राजकीय नेत्यांनी सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाची चर्चा थांबवायला हवी, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते व गृहनिर्माण मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पोलीस तपासात ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्याची माहिती माध्यमांना दिली जात आहे. बाकीचे सर्व कयास खोटे असून, पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं आपण कौतुक केलं पाहिजे, असंही कदम यांनी म्हटलं आहे.

सैफ अली खानवर चाकूहल्ला कसा झाला?

गुरुवारी १६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी एका दरोडेखोराने हल्ला केला. सर्वांत आधी सैफच्या घरात मदतनीस असणाऱ्या एलियम्मा फिलिप या महिलेची दरोडेखोराबरोबर झटापट झाली. आरडाओरड झाल्यानंतर सैफ बेडरूममधून बाहेर आला आणि त्याने दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दरोडेखोराने अभिनेत्यावर चाकूने सहा वेळा वार केले आणि घटनास्थळावरून पळून गेला. हल्ल्यानंतर खान कुटुंबीयांनी सैफला एका रिक्षातून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या घटनेनंतर वांद्रे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.