Samajwadi Party Akhilesh Yadav माजी केंद्रीय मंत्री आणि पाच वेळा खासदार राहिलेले सलीम शेरवानी यांनी काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव पीडीए (पिछडा, दलित, अल्पसंख्याक) समुदायांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, शेरवानी समाजवादी पक्षातून बाहेर पडले. अखिलेश यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीडीए सूत्र तयार केले आहे. अखिलेश सरकार पिछडा (मागास), दलित आणि अल्पसंख्याक वर्गाकडे लक्ष केंद्रीत करत आहे. परंतु पीडीए समुदायांकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप सलीम शेरवानी यांनी केला. रविवारी ७० वर्षीय शेरवानी यांनी राजीनामा पत्रात अखिलेश यांना विविध प्रश्नांद्वारे जाब विचारला आहे. “सपा भाजपापेक्षा वेगळी कशी आहे? २७ फेब्रुवारीच्या राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत मुस्लिम नाव का नाही?” ‘इंडियन एक्स्प्रेस’ने घेतलेल्या मुलाखतीत शेरवानी यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
राज्यसभेच्या उमेदवार यादीत मुस्लिम नाव नाही
राजीनामा का दिला यावर शेरवानी म्हणाले, “बऱ्याच दिवसांपासून मी अखिलेश यादवजींना सांगत होतो की, मुस्लिम समाज आणि पक्षातील अंतर वाढत चालले आहे. आपण समाजासाठी पुरेसा आवाज उठवत नाही. समाजातील ८०-९०% लोकांनी सपाला मत (२०२२ यूपी विधानसभा निवडणूक) दिले आहे. मी गुन्हेगारांबद्दल बोलत नाही, पण निरपराध नागरिकांवर बुलडोझरची कारवाई, मशीद पाडणे, तरुणांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात पाठवले जाणे यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.” लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी पीडीए सूत्र महत्त्वाचे असल्याचे संगितले. राज्यसभेसाठी पक्षाचे उमेदवार घोषित करण्यात आले, त्यात कुठलेही मुस्लिम नाव नसल्याचेही त्यांनी संगितले.
समाजवादी पक्ष मुस्लिम समाजाच्या प्रश्नांविषयी बोलत नाहीत, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नावर ते म्हणाले, “आजकाल वातावरण असे आहे की, जो कोणी मुस्लिमांचे प्रश्न मांडतो त्याला देशद्रोही ठरवले जाते. पक्षाला केवळ त्यांच्या व्होटबँकेची चिंता आहे. मी हे वृत्तवाहिनीवरही बोललो आहे की, जर मला या देशात सुरक्षित वाटत असेल, ते केवळ येथील बहुसंख्य हिंदूंमुळे. परंतु कोणीही मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडत नाहीत,” असे ते म्हणाले.
अखिलेश यादव मुस्लीम शब्द का उच्चारत नाहीत?
पक्षात तुमची उपेक्षा झाली का? असे विचारले असता, शेरवानी यांनी संगितले, “पक्षाच्या सर्व बैठकांमध्ये मी उपस्थित असायचो. मला राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी पूर्ण आशा होती. गेल्यावेळी पक्षाने मला राज्यसभेचे तिकीट दिले नाही, तेव्हा मी आवाज उठवला नाही, कारण त्यावेळी तिकीट जावेद अली साहब यांना मिळाले होते. यावेळीही त्यांनी मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली असती, तर मी काहीच बोललो नसतो. मुस्लिम शब्द वापरतांना ते (अखिलेश) इतके का कचरतात, हेच कळत नाही,” असे त्यांनी सांगितले.
तुम्ही राजीनामा देण्यापूर्वी ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनीही तेच केले होते, तर आमदार पल्लवी पटेल यांनीही पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. याकडे तुम्ही कसे पाहता? या प्रश्नावर शेरवानी म्हणाले, “प्रत्येकाचे प्रश्न एकसारखेच आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यूपीतील भारत जोडो न्याय यात्रेकडे कसे पाहता? तुम्ही काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करत आहात का? या प्रश्नावर ते म्हणाले, मला काँग्रेसमधील काही लोकांनी संपर्क केला आणि बसपातीलही काही लोकांनी संपर्क केला. सपाच्या एका वरिष्ठ नेत्यानेही मला भेटून काही गोष्टींवर चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. मी कोणालाही अद्याप नाही म्हटले नाही, पण माझी अट आहे की मी शीर्ष नेतृत्वाशी चर्चा करेन.”
ते पुढे म्हणाले, “मला काँग्रेसमधील काही लोकांनी संपर्क केला आहे तर काही बसपातील. सपाच्या एका वरिष्ठ नेत्यानेही मला भेटून काही गोष्टींवर चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. मी कोणालाही नाही म्हटले नाही, पण माझी अट आहे की मी शीर्ष नेतृत्वाशी चर्चा करेन… मी माझ्या सर्व समर्थकांना भेटून लवकरच निर्णय घेईन. माझ्या दृष्टीने राहुल गांधी यांची यात्रा एक उत्तम पाऊल आहे. अनेक जण त्यात सामील होत आहेत. पक्षाला याचा किती फायदा होईल, हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल. देशाला एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे,” असेही त्यांनी सांगितले.
“मला उत्तरप्रदेश यात्रेत सहभागी होण्यासाठी पक्षाकडून फोन आला आहे, पण मला आधी माझ्या समर्थकांशी चर्चा करायची आहे. जर राहुलजींनी मला फोन केला तर मी जाईन. अखिलेशजी, राहुलजी आणि मायावतीजी यांच्यातील समाजाचे खरे प्रश्न कोण मांडणार हे मला जाणून घ्यायचे आहे.” असेही शेरवानी म्हणाले.