Sam Pitroda Controversy सॅम पित्रोदा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यांनी अनेकदा पक्षदेखील अडचणीत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे पक्षाला अडचणीत आणलं आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी वडिलोपार्जित संपत्तीबाबत एक वक्तव्य केले, त्यावरून सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेस यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्रोदा आणि गांधी घराण्याचे कनेक्शन काय?

ओडिसातील तितिलागड येथे १९४२ साली सॅम पित्रोदा यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा आहे. ते सध्या शिकागो येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वेबसाइटवर त्यांनी स्वतःचे वर्णन दूरसंचार शोधक, उद्योजक, विचारवंत आणि धोरण निर्माता म्हणून केले आहे. नेहरू-गांधी घराण्याचे विश्वासू मानले जाणारे पित्रोदा यांनी राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे.

हेही वाचा : मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित

१९८९ मध्ये ते दूरसंचार आयोगाचे पहिले अध्यक्ष झाले. २००५ ते २००९ या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे ते अध्यक्ष होते. २००९ मध्ये त्यांना पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे आता पित्रोदा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आंतरराष्ट्रीय भाषणाचे कार्यक्रमही आयोजित करतात. परंतु, पित्रोदा यांनी गेल्या काळात पक्षाला दुखावणारी अनेक विधाने केली आहेत. यावेळीप्रमाणे गेल्या काळात केलेल्या अनेक विधानांमुळे पक्षाला सारवासारव करावी लागली आहे.

बुधवारी त्यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकन वारसा कायद्यावर भाष्य केले. पित्रोदा म्हणाले, “तुम्ही तुमच्या पिढीत संपत्ती निर्माण केली आणि आता तुम्ही जात आहात, अशावेळी तुम्ही तुमची पूर्ण संपत्ती नाही तर अर्धी संपत्ती जनतेसाठी सोडली पाहिजे. अमेरिकेतील काही राज्यात २० टक्क्यांपर्यंत वारसा कर लावतात.”

काँग्रेस आधीच संपत्ती पुनर्वितरणाच्या मुद्द्यावरून अडचणीत आहे. अलीकडेच आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशाच्या संपत्तीचे पुनर्वितरण करण्याचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने याचे खंडन केले आहे. पंतप्रधान मोदींवर कारवाईची मागणी करण्यासाठी पक्ष निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी पित्रोदा यांचे वक्तव्य सार्वजनिक होताच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, पित्रोदा यांचे विचार पक्षाच्या विचारांपेक्षा वेगळे आहेत; तर सॅम पित्रोदा म्हणाले की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे.

अलीकडच्या काही वर्षांत केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्ये

पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. अलीकडच्या काही वर्षांत पित्रोदांनी अनेक अशी वक्तव्ये केली, जी वादग्रस्त होती.

-२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पित्रोदा यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले होते की, मध्यमवर्गाने सर्व गरीब कुटुंबांसाठी किमान उत्पन्नाची हमी देण्यासाठी अधिक कर भरायला हवा, त्यांना स्वार्थी होऊन जमणार नाही. या विधनानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना स्पष्ट करावे लागले की, काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास मध्यमवर्गावर अतिरिक्त कराचा बोजा वाढणार नाही.

-बालाकोटमधील एअर स्ट्राइकवरून आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपावर हल्ला चढावला होता. “मुंबईतही हल्ला झाला होता. त्यानंतर आम्ही उत्तर देण्यासाठी आमची विमाने पाठवली असती, पण तो योग्य दृष्टिकोन नाही. आठ दहशतवादी (२६/११) येतात आणि काहीतरी करतात, त्यामुळे तुम्ही संपूर्ण राष्ट्राला (पाकिस्तान) लक्ष्य करू नका. काही लोकांनी इथे येऊन हल्ले केले म्हणून त्या राष्ट्रातील प्रत्येक नागरिक दोषी असेल, असे नाही”, असे पित्रोदा म्हणाले होते.

-२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जेव्हा भाजपाने दावा केला की, १९८४ च्या शीख विरोधी दंगलीसाठी राजीव गांधींकडून सूचना आल्या होत्या, तेव्हा पित्रोदा यांनी आरोप नाकारले. परंतु ते म्हणाले, “अब क्या है ८४ का? आपने क्या किया पाच साल में, उसकी बात करिये. ८४ में हुआ तो हुआ, आपने क्या किया? (आता १९८४ बद्दल काय बोलायचे? तुम्ही गेल्या पाच वर्षात काय केले याबद्दल बोला. १९८४ मध्ये जे झाले ते झाले, पण तुम्ही काय साध्य केले?)” या वक्तव्यानंतर पित्रोदा यांनी माफी मागितली होती आणि काँग्रेसलादेखील स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

-जून २०२३ मध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत अमेरिकेत एका कार्यक्रमात पित्रोदा म्हणाले, “आम्हाला बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्याची समस्या आहे, या गोष्टींवर कोणी बोलत नाही. पण, प्रत्येक जण राम, हनुमान आणि मंदिराबद्दल बोलतो; मंदिरे रोजगार निर्माण करणार नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “जेव्हा संपूर्ण देश राम मंदिर आणि रामजन्मभूमीवरच बोलत असतो, तेव्हा मला त्रास होतो. माझ्यासाठी धर्म ही एक अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे आणि राष्ट्रीय समस्या म्हणजे शिक्षण, रोजगारवाढ, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण आहेत; पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही”, असे पित्रोदा म्हणाले होते.

हेही वाचा : मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित

-या वर्षाच्या सुरुवातीला पित्रोदा यांनी एक्स (X) वर लेख शेअर केले करत, भारतीय राज्यघटना तयार करण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना न देता माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दिले होते. यानंतर भाजपाने त्यांच्यावर आंबेडकरांचा वारसा मोडीत काढत असल्याचा आरोप करत काँग्रेसवर हल्ला चढवला. काहीवेळाने पित्रोदा यांनी ती पोस्ट डिलिट केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sam pitroda and congress connection rac
Show comments