उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी, समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी (२८ जुलै) एक मोठा निर्णय घेतला, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अखिलेश यादव यांनी ब्राम्हण नेते माता प्रसाद पांडे यांची विरोधी पक्षनेतेपदी (एलओपी) निवड केली. त्यांचे काका शिवपाल सिंह यादव यांच्याऐवजी ब्राम्हण नेत्याला हे पद दिल्याने, हा चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत माता प्रसाद पांडे?

माता प्रसाद पांडे यांचे पहिले काम पाच दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात सपाचे नेतृत्व करणे असेल. पूर्वेकडील उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील इटवा येथील सातवेळा आमदार राहिलेले पांडे यांनी यापूर्वी २००४ मध्ये मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले होते. २०१२ मध्ये अखिलेश यांनी सपाचे नेतृत्व केले, तेव्हा त्यांना पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. सूत्रांनी सांगितले की, पक्षाच्या एका गटाला अखिलेश यांचे काका आणि सपा संस्थापक-सदस्य शिवपाल सिंह यादव यांनी एलओपी म्हणून पदभार स्वीकारावा अशी इच्छा होती. परंतु, दीर्घ चर्चेनंतर नेतृत्वाने त्याविरुद्ध निर्णय घेतला. पक्षाने आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती आणि पीडीए – पिछडे (मागास), दलित, अल्पसंख्याक ही घोषणा देत, ब्राम्हणांना एलओपी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय त्यांच्या विधानसभा नेतृत्वात संतुलन निर्माण करण्याच्या उद्देशाने घेण्यात आल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा : चंद्राबाबू नायडूंची एक साद आणि १६० आमदारांनी दिली साथ; नक्की काय घडलं?

समाजवादी पार्टीने रविवारी आणखी दोन महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या. माजी राज्यसभा खासदार आणि अखिलेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री, कांठचे आमदार कमाल अख्तर विधानसभेत पक्षाचे मुख्य व्हीप असतील, तसेच प्रतापगढचे कुर्मी नेते, राणीगंजचे आमदार आर. के. वर्मा हे डेप्युटी व्हीप म्हणून काम पाहतील. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्मा सपामध्ये सामील झाले होते. २०१७ च्या निवडणुकीत, ते प्रतापगढ विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा सहयोगी असलेल्या अपना दल (सोनेयलाल) चे उमेदवार म्हणून निवडून आले.

सपाच्या आतील सूत्रांनी सांगितले की, पक्षातील एक गट बाहेरच्या व्यक्तीला व्हीपची जबाबदारी देण्याच्या विरोधात होता. कारण अलीकडेच हे नेते इतर पक्षांमधून सपामध्ये सामील झाले आहेत. परंतु, विरोधी पक्षनेते पदासाठी पांडे यांची एकमताने निवड झाली. माजी चीफ व्हीप आणि ब्राह्मण नेते मनोज कुमार पांडे यांनी राज्यसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता, त्यांच्या पदावरून बाहेर पडल्यानंतर या पदावरील नियुक्ती महत्त्वाची होती.

ब्राम्हण नेत्याची नियुक्ती का?

विशेषत: आरक्षण आणि पीडीएवर सपा लक्ष केंद्रित करून आहे, त्यामुळे ब्राम्हण चेहऱ्याला एलओपी म्हणून नामनिर्देशित केल्याने पक्षातील काहींना आश्चर्य वाटले. परंतु, एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ब्राम्हण नेता पक्षाला समुदायाची मते एकत्रित करण्यास मदत करेल, विशेषत: पूर्वांचल प्रदेशात. पांडे यांनी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इटवा येथून १९८० मध्ये पहिली निवडणूक लढवली. १९८५ मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली. १९८९ मध्ये लोक दलाचे उमेदवार म्हणून त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर ती जागा जिंकली. ते २००२ मध्ये पहिल्यांदा सपाच्या तिकिटावर निवडून आले आणि २००७ व २०१२ मध्ये त्यांनी इटवा ही जागा राखून ठेवली. परंतु, २०१७ मध्ये ते भाजपाच्या एस. सी. द्विवेदी यांच्याकडून पराभूत झाले. २०२२ मध्ये पांडे यांनी द्विवेदी यांचा १,६६२ मतांच्या अत्यंत कमी फरकाने पराभव करून ही जागा पुन्हा मिळवली.

हेही वाचा : नितीश कुमारांची नक्कल करणे आरजेडी नेत्याला पडले महाग, विधान परिषदेतील सदस्यत्व रद्द; कोण आहेत सुनील सिंह?

रविवारी विधानसभेत सर्वपक्षीय बैठक आणि व्यवसाय सल्लागार समितीला उपस्थित राहिल्यानंतर माता प्रसाद पांडे म्हणाले, “या सरकारने राज्यातील जनतेला फक्त समस्या दिल्या आहेत, त्यामुळे सभागृहात मांडण्यासाठी प्रश्नांची कमतरता नाही. सर्वात वरती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बेरोजगारी, विद्यार्थी, शेतकरी आदी समस्या आहेत. या सर्व प्रश्नांवर आम्ही लढू आणि हे प्रश्न विधानसभेत मांडू.” पांडे यांचा ‘प्रकाश का स्तंभ (प्रकाशाचा स्तंभ)’ असा उल्लेख करून अखिलेश यादव म्हणाले की, पांडे यांचा अनुभव केवळ सपा आमदारांनाच नाही तर विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री आणि आमदारांनाही मदत करेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party akhilesh yadav bramhin leader lop rac