आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाला गती आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातही जागावाटपाची चर्चा होत आहे. मात्र, या दोन्ही पक्षात यावर अद्याप एकमत झालेले नाही. असे असतानाच आता समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) यांच्यात युती झाली आहे. समाजवादी पार्टीने आरएलडीला सात जागा देण्याची तयारी दाखवली आहे.
लखनौमध्ये दोन पक्षांत बैठक
समाजवादी पार्टी लोकसभेच्या एकूण ८० जागांपैकी सात जागा आरएलडीला देणार आहे. शुक्रवारी समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आणि आरएलडीचे सर्वेसर्वा जयंत चौधरी यांच्यात लखनौमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत या युतीवर चर्चा झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आरएलडी आणि समाजवादी पार्टी यांच्यात युती झाल्याचे जाहीर केले. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी एक्सवर पोस्ट करत एकमेकांचे अभिनंदन करत युतीसाठी तसेच उत्तर प्रदेशच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू, असा संदेश दिला.
अखिलेश यादव नेमके काय म्हणाले?
“राष्ट्रीय लोक दल आणि समाजवादी पार्टी यांच्यात युती झालेली असून सर्वांचे खूप खूप अभिनंदन. विजयासाठी आपण एकत्र येऊ”, असे अखिलेश यादव म्हणाले. तर “आम्ही भारतीय संविधान तसेच राष्ट्रीय मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी कायम तत्पर आहोत. या युतीतील सर्व नेते आणि कार्यकर्ते उत्तर प्रदेशच्या विकासासाठी तसेच समृद्धीसाठी काम करतील अशी आमची अपेक्षा आहे”, असे चौधरी म्हणाले.
आरएलडीला मथुरा, बाघपत, फतेपूर, सिक्री, बिजनोर जागा मिळणार?
आरएलडीचे राष्ट्रीय सरचिटणीस अनुपम मिश्रा यांनी या युतीवर शुक्रवारी (१९ जानेवारी) भाष्य केले. “समाजवादी पार्टीने आम्हाला सात जागा देण्याची तयारी दाखवली आहे, मात्र याबाबत आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही. याबाबतची अधिक माहिती लवकरच दिली जाईल”, असे अनुपम मिश्रा म्हणाले. आरएलडीतील सूत्रांच्या माहितीनुसार या सात जागांमध्ये मथुरा, बाघपत, फतेपूर, सिक्री, बिजनोर यांच्यासह पश्चिम उत्तर प्रदेशमधील अन्य काही जागांचा समावेश आहे.
“समाजवादी पार्टी हा सर्वांत मोठा पक्ष, म्हणूनच…”
समाजवादी पार्टीची काँग्रेस पक्षाशी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. असे असतानाच आता समाजवादी पार्टी आणि आरएलडी यांच्यातील युतीची घोषणा झाली आहे. यावर आरएलडीचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल दुबे यांनी प्रतिक्रिया दिली. “सध्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. समाजवादी पार्टी ही उत्तर प्रदेशमधील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे हा पक्ष आपल्या मित्रपक्षांना काही जागा देईल. मला वाटते काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यातील जागावाटपाची चर्चा लवकरच पूर्ण होईल”, असे दुबे म्हणाले.
काँग्रेसला हव्यात २८ जागा
याच जागावाटपावर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या या माहितीनुसार काँग्रेसने समाजवादी पार्टीकडे एकूण २८ जागांची मागणी केली आहे. समाजवादी पार्टी एकूण २५ जागा देईल, अशी काँग्रेसला आशा आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने एकूण २१ जागांवर विजय मिळवला होता. याच निकालाच्या आधारावर काँग्रेसकडून २८ जागांची मागणी केली जात आहे.
काँग्रेसची मागणी अवाजवी
तर दुसरीकडे काँग्रेसकडून अवाजवी जागांची मागणी केली जात आहे, अशी भूमिका समाजवादी पार्टीकडून घेतली जात आहे. “२०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आलेला आहे. असे असताना काँग्रेस लोकसभेच्या एकूण ८० जागांपैकी २८ जागा मागत आहे. इंडिया आघाडीच्या यशासाठी काँग्रेसने तडजोड करणे गरजेचे आहे”, असे समाजवादीच्या एका नेत्याने म्हटले.
समाजवादी-आरएलडी युतीचा इतिहास
समाजवादी पार्टी आणि आरएलडी या दोन्ही पक्षांची २०१९ सालापासून युती आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत आरएलडी, बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी या तीन पक्षांची युती होती. महाआघाडीचा भाग म्हणून त्यावेळी आरएलडीने तीन जागा लढवल्या होत्या. या तिन्ही जागांवर या पक्षाचा पराभव झाला होता; तर समाजवादी पार्टीने एकूण ३७ जागा लढवल्या होत्या. यातील पाच जागांवर या पक्षाचा विजय झाला होता. बहुजन समाज पार्टीने एकूण १० जागांवर विजय मिळवला होता. पुढे २०२२ साली समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या दोन्ही पक्षांनी विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. या निवडणुकीत समाजवादी पार्टीने ३४७ जागांपैकी एकूण १११ जागांवर विजय मिळवला, तर आरएलडीला नऊ जागांवर विजय मिळवता आला. बहुजन समाज पार्टीला ४०३ जागांपैकी फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला.
जागावाटपाच्या चर्चेला यश येणार?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते. त्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेला यश येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.