आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक लक्षात घेऊन विरोधकांच्या इंडिया आघाडीने जागावाटपाला सुरुवात केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून याच आघाडीत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीदेखील आम्ही काँग्रेसला ११ जागा देऊ असे एकतर्फी जाहीर केले आहे. अखिलेश यादव यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची तसेच इंडिया आघाडीची चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान, आमची जागावाटपावर समाजवादी पार्टीशी चर्चा सुरू आहे, असे काँग्रेसने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगाल, बिहार, पंजाबमध्ये अस्थिरता

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आमचे इंडिया आघाडीशी जागावाटपावर बोलणे चालू नाही, आम्ही लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार असे जाहीर केले. आम आदमी पार्टीचे (आप) नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीदेखील आम्ही पंजाबमध्ये लोकसभेची निवडणूक एकट्यानेच लढवणार अशी भूमिका घेतली आहे. बिहारमध्ये नितीश कुमारदेखील भाजपाशी हातमिळवणी करण्याची दाट शक्यता आहे. असे असतानाच आता अखिलेश यादव यांनीदेखील आम्ही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत ११ जागा देऊ, अशी भूमिका घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसला यापेक्षा अधिक जागा हव्या आहेत.

काँग्रेसला हव्यात १५-१६ जागा

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये १५ ते १६ जागा हव्या आहेत. असे असतानाच आम्ही काँग्रेसला फक्त ११ जागा देऊ, असे अखिलेश यांनी जाहीर केले आहे. समाजवादी पार्टीला मध्य प्रदेशमध्ये एक जागा हवी आहे. ही जागा मिळावी म्हणूनच या पक्षाकडून अशा प्रकारे राजकीय खेळी केली जात आहे, असे म्हटले जात आहे. याच जागावाटपावर समाजवादी पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसने काही जागांसाठी विजयी होण्याची शक्यता असणाऱ्या नेत्यांची नावे दिल्यास आम्ही त्यांना आणखी काही जागा देऊ शकू”, असे या नेत्याने म्हटले.

काँग्रेसचा फक्त एका जागेवर विजय

काँग्रेस उत्तर प्रदेशमधील अमेठी, रायबरेली, गाझियाबाद, गौतम बुद्धनगर, बरेली या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ८० पैकी ६७ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसचा फक्त एका जागेवर विजय झाला होता. काँग्रेसला एकूण ६.३६ टक्के मते मिळाली होती.

२०१९ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?

२०१९ सालच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने बसपाशी युती केली होती. या युतीमुळे भाजपाला चांगलाच फटका बसला होता. भाजपाच्या जागा ७१ वरून ६२ पर्यंत खाली आल्या होत्या. बसपाने ३८ तर सपाने ३७ जागा लढवल्या होत्या. यापैकी बसपाने १० जागा जिंकत एकूण १९.४३ टक्के मते मिळवली होती, तर सपाने ५ जागा जिंकत १८.११ टक्के मते मिळवली होती.

मध्य प्रदेशमध्ये एका जागेची मागणी

समाजवादी पार्टीला मध्य प्रदेशमध्ये एक जागा हवी आहे. याबाबत समाजवादी पार्टीच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली. “आम्ही काँग्रेसला खजुराहो किंवा टिकमगड यापैकी एक जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचा २०१९ सालच्या निवडणुकीत या जागांवर तीन लाख मतांच्या फरकाने पराभव झालेला आहे. तर याच जागांवर समाजवादी पार्टीला ४० हजारपेक्षा अधिक मते मिळालेली आहेत”, असे या नेत्याने सांगितले.

काँग्रेसने काय प्रतिक्रिया दिली?

समाजवादी पार्टीच्या या भूमिकेनंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. त्यासाठी काँग्रेसचे नेते अशोक गहलोत हे अखिलेश यादव यांच्या संपर्कात आहेत. आमच्यात सकारात्मक पद्धतीने चर्चा होत आहे. जागावाटपाचे सूत्र ठरल्यानंतर आम्ही त्याबाबतची घोषणा करू. आमच्यातील जागावाटप हे काँग्रेस, समाजवादी पार्टी तसेच इंडिया आघाडीच्या फायद्याचे असणार आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

२०१७ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?

दरम्यान, याआधी २०१७ साली काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. या निवडणुकीत समाजवादी पार्टीने २९८, तर काँग्रेसने १०५ जागा लढवल्या होत्या. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. समाजवादी पार्टीचा एकूण ४७ जागांवर, तर काँग्रेसचा फक्त ७ जागांवर विजय झाला होता. काँग्रेसला ६.७५ टक्के, तर समाजवादी पार्टीला २१.८३ टक्के मते मिळाली होती.