सध्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची सगळीकडे चर्चा होत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतील तसेच इतर पक्षातील नेत्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसकडून केले जात आहे. मात्र उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी नुकतेच दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे तसा तर्क लावला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काँग्रेसदेखील आम्हाला आमंत्रण देत नाही”

गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाला वेग आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून वाद सुरू आहेत. या दोन्ही पक्षांत या मुद्द्यावर अद्याप एकमत झालेले नाही. याच कारणामुळे अखिलेश यादव अनेक मुद्द्यांवर काँग्रेसशी असहमती व्यक्त करत आहेत. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमधून जाणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा भाग म्हणून तुम्ही या यात्रेत सहभागी होणार का? असे अखिलेश यांना विचारण्यात आले. या प्रश्नांचे उत्तर देताना “आम्हाला भाजपा त्यांच्या कार्यक्रमाला बोलवत नाही. तसेच काँग्रेसदेखील आम्हाला आमंत्रण देत नाही. समाजवादी पक्षाची आपली वेगळी लढाई आहे. आम्ही सध्या इंडिया आघाडीला बळकट करण्यासाठी लढत आहोत. आम्ही भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी लढत आहोत,” अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली.

यात्रा १४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये दाखल

त्यांच्या याच प्रतिक्रियेमुळे ते भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमधील चंदौली भागात दाखल होण्याची शक्यता आहे. ही यात्रा पुढच्या दहा दिवस उत्तर प्रदेशमध्ये असणार आहे.

“अखिलेश यादव यांना आम्ही आमंत्रण दिलं”

अखिलेश यादव यांच्या या नव्या विधानांमुळे सध्या अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे काँग्रेसने अखिलेश यादव यांना भारत जोडो न्याया यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिलेले आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसने उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्याशी बातचित केली. आम्ही अखिलेश यादव यांना आमंत्रण दिले आहे, असे राय यांनी स्पष्ट केले. “राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वांना आमंत्रण देण्यात आलेले आहे. मी त्याची प्रतदेखील तुम्हाला दाखवू शकतो. अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अन्य नेत्यांना ही आमंत्रणे देण्यात आली आहेत,” असे अजय राय म्हणाले.

अखिलेश यादव आधीच्या भारत जोडो यात्रेपासून दूर

अखिलेश यादव यांच्या या विधानावर काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने प्रतिक्रया दिली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आमंत्रित केले जाणार आहे, असे या नेत्याने सांगितले. काँग्रेसच्या याआधीच्या भारत जोडो यात्रेत बीएसपीच्या प्रमुख मायावती, आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी तसेच अखिलेश यादव या यात्रेत सामील झाले नव्हते. आरएलडी पक्षाने आपले प्रतिनिधी आपल्या या यात्रेत पाठवले होते.

मोदींच्या मतदारसंघातून जाणार यात्रा

दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रा १४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाल्यानंतर एकूण १५ जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारणसी या मतदारसंघाचाही समावेश आहे. तसेच सोनिय गांधी यांचा रायबरेली मतदारसंघ, राहुल गांधी यांचा पूर्वीचा अमेठी मतदारसंघ, प्रयागराज, लखनौ अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party chief akhilesh yadav may not participate in congress bharat jodo nyay yatra prd