आगामी लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून काँग्रेसकडून या निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा भारतभर प्रवास करत आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय. इंडिया आघाडीतील घटकपक्षांनीही या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून केले जात आहे. दरम्यान, आम्हाला या यात्रेचे अद्याप आमंत्रणच मिळालेले नाही. आमंत्रण नसताना यात्रेत सहभागी कसे होणार? असे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले होते. दरम्यान, या यात्रेचे रितसर आमंत्रण आता अखिलेश यादव यांना पाठवण्यात आले असून, ते या यात्रेत सहभागी होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजवादीकडून १६ उमेदवारांची घोषणा

येत्या १६ फेब्रुवारी रोजी काँग्रेसची ही यात्रा उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे. या यात्रेचे आमंत्रण अखिलेश यादव यांना मिळालेले आहे. सध्या काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या इंडिया आघाडीच्या दोन्ही घटकपक्षांत लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर एकमत होत नाहीये. समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून एकूण १६ उमेदवारांची घोषणा केली आहे. जागावाटपासाठीच्या चर्चेचा शेवट झालेला नसताना अखिलेश यादव यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेस समाजवादी पार्टीला भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्यासाठी निमंत्रण पाठवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीच अखिलेश यादव यांना आमंत्रण पाठवले असून या यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली. विशेष म्हणजे अखिलेश यादव यांनीदेखील हे आमंत्रण स्वीकारले असून मी रायबरेली किंवा अमेठी या मतदारसंघांत कुठेतरी या यात्रेत सहभागी होईन, असे अखिलेश यादव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

अखिलेश यादव पत्रात नेमकं काय म्हणाले?

अखिलेश यादव यांनी ६ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले. ‘प्रिय खरगेजी, मला तुमचे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाले. अमेठी किंवा रायबरेली येथे आल्यावर मी या यात्रेत सहभागी होईन. भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर ही यात्रा आमच्या पीडीए धोरणामध्ये सहभागी होईल. सामाजिक न्याय आणि सौहार्दाच्या आंदोलनाला ती पुढे घेऊन जाईल, अशी आम्हाला आशा आहे,’ असे अखिलेश यादव आपल्या पत्रात म्हणाले.

अखिलेश यादव काय म्हणाले होते?

“अडचण अशी आहे की, अनेक मोठ्या कार्यक्रमांत आम्हाला आमंत्रित केले जात नाही. बोलावण्यात आलेले नसताना आम्ही स्वत:च आमंत्रणासाठी विचारणा करावी का?” असा प्रश्न अखिलेश यादव यांनी उपस्थित केला होता.

ममता बॅनर्जींचे ‘एकला चलो रे’

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा अगोदर पश्चिम बंगालमध्ये गेली होती. तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्ही पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असून आमची इंडिया आघाडीशी जागावाटपावर चर्चा सुरू नाही, असे सांगितले आहे. तृणमूल काँग्रेसच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. या भूमिकेनंतर ममता बॅनर्जींनी आम्ही भारत जोडो न्याय यात्रेतही सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, बॅनर्जी यांनी आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत, असे सांगितले असले तरी तृणमूल काँग्रेस हा अद्याप इंडिया आघाडीचाच भाग आहे.

निमंत्रण मिळाले नाही, असे अखिलेश यादव यांनी सांगितल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसची भूमिका एक्सच्या माध्यमातून स्पष्ट केली होती. त्यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला. “भारत जोडो न्याय यात्रेचे उत्तर प्रदेशमधील वेळापत्रक तयार केले जात आहे. या वेळापत्रकाला येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम स्वरुप मिळणार आहे. त्यानंतर हे वेळापत्रक इंडिया आघाडीतील घटकपक्षांना दिले जाईल. अखिलेश यादव भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यास इंडिया आघाडीला अधिक बळ येईल. ही यात्रा १६ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे”, असे जयराम रमेश यांनी सांगितले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party chief akhilesh yadav received invitation of bharat jodo nyay yatra send by congress chief mallkarjun kharge prd