समाजवादी पक्षाने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ६२ सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनाही मोठी जबाबदारी दिली आहे. तर आझम खान यांनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. तसंच रामचरितमानस विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांनाही कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. शिवपाल यादव, आजम खान आणि स्वामी प्रसाद मौर्य यांना राष्ट्रीय महासचिव करण्यात आलं आहे.
काय आहे कार्यकारिणी?
अखिलेश यादव यादव यांची पक्षाचे अध्य़क्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर आजम खान, स्वामी प्रसाद मौर्य आणि शिवपाल यादव यांना महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. किरनमय नंदा यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष हे पद देण्यात आलं आहे तर रामगोपाल यादव यांना राष्ट्रीय मुख्य महासचिव हे पद देण्यात आलं आहे.
काका पुतण्यांमधले वाद मिटले
समाजवादी पक्षात शिवपाल यादव आणि अखिलेश यादव म्हणजेच काका आणि पुतण्यांमध्ये वर्चस्वाची लढाई पाहण्यास मिळाली होती. शिवपाल यादव यांनी पक्षांतर्गत संघर्षानंतर आपला वेगळा पक्ष स्थापन केला होता. मात्र मुलायम सिंह यादव यांच्या मृत्यूनंतर शिवपाल यादव आणि अखिलेश यादव हे मतभेद विसरून एकत्र आले आहेत. शिवपाल यादव यांनी प्रगतीशील समाजवादी पक्ष समाजवादी पक्षामध्ये विलीन केला आहे. यानंतर चर्चा हीच सुरू होती की शिवपाल यादव यांना मोठी जबाबदारी मिळणार. कार्यकारिणी घोषित झाल्यावरही तसंच झालं. आता पक्ष २०२४ निवडणुकांच्या तयारीला लागला आहे.