Samajwadi Party Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीतील पक्षांनी चर्चा केल्याशिवाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर करू नये असं ठरवलं होतं. मात्र मविआमधील घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने राज्यभरात घेतलेल्या वेगवेगळ्या जाहीर सभांद्वारे राज्यातील पाच जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी (१९ ऑक्टोबर) धुळे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून इर्शाद जागीरदार यांच्या नावाची घोषणा केली. तर शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) सपाने मालेगावमध्ये पीडीए (पिछडा/मागास, दलित आणि अल्पसंख्याक) सभेचं आयोजन केलं होतं. या सभेतून अखिलेश यादव यांनी अबू आझमी यांच्या नावाची मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघाचे सपाचे अधिकृत उमेदवार म्हणून, तर रिजाझ आझमी यांच्या नावाची भिवंडी पश्चिमचे उमेदवार म्हणून घोषणा केली. पाठोपाठ मालेगाव मध्य मतदारसंघातून शान-ए-हिंद यांच्या नावाची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अखिलेश यादव म्हणाले, “हे उमेदवार त्या-त्या मतदारसंघांमध्ये चांगली कामं करत आहेत. यांच्यामुळे राज्यात आमच्या पक्षाची ताकद दिसून येत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच आमचा पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. उमेदवारांची नावं जाहीर करण्यास विलंब नको म्हणून आम्ही आत्ताच ही नावं जाहीर करत आहोत. आमच्या पक्षाने महाविकास आघाडीकडे राज्यात १२ जागा मागितल्या आहेत. सध्या राज्यात आमचे दोन आमदार आहेत. जागावाटपात आम्ही कमी जागांवर समाधान मानू. काल आम्ही मालेगावमध्ये होतो. तिथे आम्ही पक्षाचा प्रचार केला. ज्या-ज्या जागांवर आमचा पक्ष मजबूत स्थितीत आहे. तिथले आमचे उमेदवार आम्ही जाहीर केले आहेत”.

हे ही वााचा >> Onion Belt in Maharashtra: कांदा उत्पादक पट्ट्यात भाजपा यावेळी कशी कामगिरी करणार?

सपाचं काँग्रेसच्या जागांवर लक्ष

समाजवादी पार्टीचं राज्यातील १२ जागांवर लक्ष आहे. त्यामध्ये त्यांनी रावेर आणि अमरावतीवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. या दोन्ही जागांवर सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तसेच भायखळा, वर्सोवा, औरंगाबाद पूर्व, अणूशक्तीनगर व कारंजा या जागांसाठी देखील हा पक्ष आग्रही आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सपाने सात जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन जागांवर त्यांचे उमेदवार जिंकले होते.

हे ही वाचा >> हरियाणातील पराभवानंतर काँग्रेस अर्लट मोडवर; महाराष्ट्रात चुकांची पुनरावृत्ती टाळणार?

सपा महाविकास आघाडीच्या साथीने एमआयएमला शह देण्याच्या तयारीत

दरम्यान, सपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “माझ्या व रईस शेख (भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार) यांच्या नावांची घोषणा निश्चित आहे”. हे दोघेही विद्यमान आमदार आहेत. आझमी म्हणाले, “भिवंडी पश्चिमच्या जागेवर सपाचा उमेदवार जिंकू शकतो असं एका सर्वेक्षणात आढळलं आहे. तसेच इतर दोन जागांवर म्हणजेच, मालेगाव मध्य व धुळे शहरात मुस्लीम मतदारांची संख्य मोठी आहे. मुस्लीम मतदारांच्या जोरावर या जागा मागील निवडणुकीत (२०१९) एआयएमआयएमने जिंकल्या होत्या. मात्र या मतदारसंघांसह राज्यातील अल्पसंख्याक मतदारांवर एमआयएमपेक्षा सपाचा अधिक प्रभाव आहे. तसेच या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार देखील आहेत. जे अखिलेश यादव यांच्यामुळे समाजवादी पार्टीला पाठिंबा देऊ शकतात. सपा काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याबरोबर आघाडी करून या जागा लढवत असेल तर आमचा विजय निश्चित होईल.

हे ही वाचा >> भाजपच्या पहिल्या यादीत, फडणवीस, बावनकुळे; सावरकरांना डच्चू, खोपडे, मेघे, मतेंना पुन्हा संधी

त्या पाच उमेदवारांना मविआचा विरोध नाही?

“काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) या तिन्ही प्रमुख पक्षांबरोबर आम्ही पाच जागांवरील उमेदवारांबाबत चर्चा केली आहे. त्यापैकी कुठल्याही जागेवर या तीनपैकी कोणत्याही पक्षाने त्यावर आक्षेप घेतला नाही. सपाला महाविकास आघाडीत आणखी काही जागा मिळायला हव्यात”, असंही सपाचे आमदार अबू आझमी यांनी एक्सप्रेसला सांगितलं.

हे ही वाचा >> १२० मतदारसंघांत ‘मराठा शक्ती’च्या जरांगे प्रयोगाचा महाविकास आघाडीला फटका?

मविआने तातडीने जागावाटप जाहीर करावं : आझमी

अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की काँग्रेसने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी समाजवादी पार्टीला विश्वासात घ्यावं. तसेच महाविकास आघाडीने जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. दरम्यान, समाजवादी पार्टीने आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर केले असून त्यावर महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याने अथवा पक्षाने प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party demands 12 seats in mva maharashtra assembly polls 5 candidates announced asc