आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांच्या इंडिया आघाडीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. ही चर्चा चालू असतानाच समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये एकूण १६ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. समाजवादीच्या या भूमिकेनंतर काँग्रेस आणि अखिलेश यादव यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचाच संदेश गेला आहे. असे असतानाच आता समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी मला अद्याप भारत जोडो न्याय यात्रेचे आमंत्रण मिळालेले नाही, असे अप्रत्यक्षपणे सांगितले.
“आम्ही स्वत:च आमंत्रणासाठी विचारणा करावी का?”
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा चालू आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडिया आघाडीतील घटकपक्षांनीही या यात्रेत सहभागी व्हावे, असे काँग्रेसकडून आवाहन केले जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. यावरच अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली. “अडचण अशी आहे की, अनेक मोठ्या कार्यक्रमांत आम्हाला आमंत्रित केले जात नाही. बोलावण्यात आलेले नसताना आम्ही स्वत:च आमंत्रणासाठी विचारणा करावी का?” असा प्रश्न अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.
ममता बॅनर्जींचे ‘एकला चलो रे’
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा अगोदर पश्चिम बंगालमध्ये गेली होती. त्यानंतर या यात्रेने बिहारमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा एकदा ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये गेली आहे. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्ही आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असून आमची इंडिया आघाडीशी जागावाटपावर चर्चा सुरू नाही, असे सांगितले आहे. तृणमूल काँग्रेसच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. या भूमिकेनंतर ममता बॅनर्जींनी आम्ही भारत जोडो न्याय यात्रेतही सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, बॅनर्जी यांनी आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत, असे सांगितले असले तरी तृणमूल काँग्रेस हा अद्याप इंडिया आघाडीचाच भाग आहे.
समाजवादीने जारी केली १६ उमेदवारांची यादी
दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू आहे. मात्र या दोन्ही पक्षांत यावर तोडगा निघालेला आहे. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण १६ उमेदवारांची नावे आहेत. समाजवादी पार्टीच्या या भूमिकेनंतर उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसची अडचण झाली आहे.
पहिल्या यादीत १६ उमेदवार, डिंपल यादव यांना उमेदवारी
समाजवादी पार्टीने आपल्या पहिल्या यादीत एकूण १६ जागांसाठी उमेदवार दिले आहेत. या पहिल्याच यादीत समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या पत्नी तथा खासदार डिंपल यादव यांनाही तिकीट देण्यात आले आहे. त्या मैनपुरी या आपल्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवतील. मैनपुरी हा मतदारसंघ यादव घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. याच जागेवरून अखिलेश यादव यांचे वडील तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी निवडणूक लढवलेली आहे. कित्येक वर्षे मुलायमसिंह यादव यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आता याच मतदारसंघातून डिंपल यादव खासदार असून त्या पुन्हा एकदा याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत.
समाजवादी पार्टी-काँग्रेस यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात
याच जागावाटपावर समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव यांनी प्रतिक्रिया दिली. “आगामी काळात आम्ही आणखी काही उमेदवारांची घोषणा करणार आहोत. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जगावाटपावरील चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे,” असे रामगोपाल यादव म्हणाले.
काँग्रेसला ११ जागा देण्याची समाजवादी पार्टीची तयारी
काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीने एकतर्फी निर्णय घेत आम्ही काँग्रेसला ११ जागा देऊ, अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेसला मात्र उत्तर प्रदेशमध्ये १५ ते १६ जागा हव्या आहेत. समाजवादी पार्टीला मध्य प्रदेशमध्ये एक जागा हवी आहे.ही जागा मिळावी यासाठी समाजवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता अखिलेश यादव यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२०१९ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?
२०१९ सालच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने बसपाशी युती केली होती. या युतीमुळे भाजपाला चांगलाच फटका बसला होता. भाजपाच्या जागा ७१ वरून ६२ पर्यंत खाली आल्या होत्या. बसपाने ३८ तर सपाने ३७ जागा लढवल्या होत्या. यापैकी बसपाने १० जागा जिंकत एकूण १९.४३ टक्के मते मिळवली होती, तर सपाने ५ जागा जिंकत १८.११ टक्के मते मिळवली होती.
२०१७ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?
दरम्यान, याआधी २०१७ साली काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. या निवडणुकीत समाजवादी पार्टीने २९८, तर काँग्रेसने १०५ जागा लढवल्या होत्या. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. समाजवादी पार्टीचा एकूण ४७ जागांवर, तर काँग्रेसचा फक्त ७ जागांवर विजय झाला होता. काँग्रेसला ६.७५ टक्के, तर समाजवादी पार्टीला २१.८३ टक्के मते मिळाली होती.