लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेवर शनिवारी सवाल उपस्थित केला. शिवसेनेची ही भूमिका कायम राहिली तर आम्ही ‘मविआ’तून बाहेर पडू, असा इशारा ‘सपा’चे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी दिला.
समाजवादी पक्षाने विधानसभेची निवडणूक ‘मविआ’मध्ये लढवली होती. ‘मविआ’च्या आमदारांनी विधानसभा सदस्यत्व शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. समाजवादी पक्ष ‘मविआ’चा घटक पक्ष असताना या पक्षाच्या आमदारांनी मात्र शपथ घेतली.
शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ६ डिसेंबरच्या निमित्ताने ट्वीट करत बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेवर बाळासाहेब ठाकरे यांच्या टिप्पणीचा पुनरुच्चार केला होता. अबु आझमी यांनी नार्वेकर यांच्या भूमिकेवर टीका केली. राजकारणात धर्म न आणण्याची ‘मविआ’ची भूमिका होती. शिवसेना कट्टर हिंदुतत्वादी भूमिका सोडणार नसेल तर ‘मविआ’मध्ये राहण्यासंदर्भात विचार करावा लागेल, असा इशारा आझमी यांनी दिला.
‘मविआ’मध्ये विधानसभा निवडणुकीत ताळमेळ नव्हता, आमच्या अधिक जागा निवडून आल्या असत्या, असेही आझमी म्हणाले.