उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून रामचरितमानसवरून वाद सुरू झाला आहे. शुद्र, ब्राह्मण, उच्च जात हे विषय चर्चिले जात आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेरही गर्वसे कहो हम शुद्र है असे पोस्टर लावण्यात आले होते. तसंच इतरही काही पोस्टर्स लावले गेले. मात्र आता हे पोस्टर्स हटवण्यात आले आहेत. यानंतर अखिलेश यादव हे रामचरित मानसच्या वादासंदर्भात कातडी बचाव धोरण घेत आहेत का अशी चर्चा आता रंगली आहे.
सपाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, खासदार आणि इतर नेते, आमदार या सगळ्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि यापैकी कुणीही धार्मिक मुद्द्यांवर बोलू नये असंही म्हटलं होतं. त्यानंतर सपा कार्यालयाबाहेरची रामचरित मानस आणि शुद्र यांच्याविषयीची पोस्टर्स हटवण्यात आली आहेत.
सपाच्या लखनऊ येथील कार्यालयाबाहेर रामचरितमानस संदर्भात स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक वक्तव्य केलं. ज्यानंतर सातत्याने पोस्टरबाजी होत होती. सपा कार्यालयाच्या बाहेर जे पोस्टर्स लागत होते त्यात रामचरितमानस आणि शुद्र यासंदर्भात टिपण्णी होत्या. हे सगळे पोस्टर्स आता हटवण्यात आले आहेत.
रामचरितमानस वरून वाद झाल्यानंतरही अखिलेश यादव यांनी स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासोबत होते. अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावर काहीही भाष्य केलं नाही.सुरूवातीला असं म्हटलं जात होतं की अखिलेश यादव नाराज झाले आहेत. मात्र तसं काही घडल्याचं समोर आलं नाही. सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्वामी प्रसाद मौर्य यांना स्थान देण्यात आलं आहे.