मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने रणशिंग फुंकले. महाविकास आघाडीत समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीकडे १२ जागांची मागणी करणार असून राज्यात स्थापन होणाऱ्या संभाव्य सरकारमध्ये समाजवादी सामील होणार आहे.समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उत्तर प्रदेशमधील समाजवादीच्या ३१ खासदारांचा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. या सत्काराला मुंबईतील उत्तर भारतीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हिंसाचाराचा मुद्दा अबू आझमी यांनी यावेळी उपस्थित केला. विशाळगडावरील मशीद तोडणारे हिंदू नसून ते सांप्रदायिक आहेत. राम केवळ भाजपाचे नसून आमचेही आहेत, हे अयोध्येमध्ये समाजवादीचा खासदार विजयी झाल्याने सिद्ध झाले आहे, असा दावा आझमी यांनी केला. मला एक दिवस राज्याचा गृहमंत्री करा, हजारो उत्तर भारतीयांची ठेले, हातगाड्या ज्या माणसाने उद्ध्वस्त केल्या आहेत, त्याला सरळ करतो, या शब्दांत अबू आझमी यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष केले.
हेही वाचा >>>शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात तक्रारी, भाजपच्या बैठकीत लोकसभा निकालावर मंथन; जागावाटप लवकर करण्याची मागणी
अयोध्या (फैजाबाद) लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत कोणाही दलित उमेदवाराला उभा करण्याचे धाडस एकाही राजकीय पक्षाने केले नव्हते. मी अनुसूचित जातीचा (पाशी ) असूनही मला अयोध्येत उमेदवारी दिली आणि जिंकून आणल्याबद्दल अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनी समाजवादीचे अध्यक्ष अखिलेश सिंह यांचे आपल्या भाषणामध्ये आभार मानले. अवधेश प्रसाद यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद मिळाला.
मणिभवनला भेट
उत्तर प्रदेशातील समाजवादीच्या ३१ खासदारांनी शुक्रवारी सकाळी मणिभवनला भेट दिली. त्यानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दुपारी शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख होते.