सुहास सरदेशमुख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतिहासाच्या विकृतीकरणाची दुरुस्ती करत असल्याचे सांगत भांडारकर प्राच्य विद्या व संशोधन संस्थेवर हल्ला करणाऱ्या तसेच पुणे येथील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविण्याच्या घटनांमध्ये पुढाकार असल्याचा दावा करणाऱ्या संभाजी ब्रिगेड या संघटनेबरोबर शिवसेनेच्या युतीने राजकीय पटलावर भुवया उंचावल्या गेल्या आहेत. मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या संभाजी ब्रिगेड या संघटनेने २०१६ पासून राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली, पण तेव्हापासून राजकीय पटलावर हा पक्ष चाचपडत होता. आता मात्र त्यांच्या साथीला राज्याच्या राजकारणातील मोठा पक्ष युतीसाठी मिळाला. दुसरीकडे मराठा समाजाचे ध्रुवीकरण झालेच तर ते आपल्या बाजूने रहावे असा शिवसेनचा होरा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीपुरता तो दिसू शकेल असे सांगण्यात येत आहे. पण संभाजीबिग्रेडच्या ‘वैचारिक कृतीशीलते’मुळे शिवसेनेसमोर अधिक प्रश्नच उभे राहण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- मनसेच्या मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड मतदार स्वीकारतील?

भाजपशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला मानणारा मतदार आता शिवसेनेबरोबर असणार नाही, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. घाऊक प्रमाणात भाजपमध्ये दाखल झालेल्या मराठा पुढाऱ्यांच्या मागे असणारा मतदार कदाचित संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिवसेनेबरोबर जोडला जाईल असे मानून नवी युती झाल्याचे मानले जाते. या युतीसाठी माजी मंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला होता. या अनुषंगाने बोलताना संभाजी ब्रिगडचे अध्यक्ष मूळचे हिंगोली जिल्ह्यातील मनोज आखरे म्हणाले, ‘ आम्ही वैचारिक कृतीशील संघटना म्हणून काम करत होतो. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे अशा प्रागतिक विचारांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत आलो आहोत. शिवसेनाही आमचे हिंदुत्व शेंडी- जानव्याचे नाही, असे आवर्जून सांगते. त्यामुळे आमच्यामध्ये वैचारिक समानता आहे. अठरापगड जातीला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असणाऱ्या पक्ष संघटनेमुळे नक्की लाभ होऊ शकतो. गेल्या वेळी राजकीय भूमिका घेण्याचे ठरविले तेव्हा वेळ कमी होता. तरीही काही ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवता आले. पण आता यश वाढेल.’ 

हेही वाचा- विधानसभेतील दुर्मिळ प्रसंग

भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवरील हल्ल्यानंतर बहुजन अस्मिता जाग्या झाल्याचा दावा करत मनोज आखरे यांनी धर्माच्या नावाने कटकारस्थान करून सत्तेत बसणाऱ्यांच्या विरोधात समतावादी, पुरोगामी विचार रुजविण्यासाठी संभाजी बिग्रेड काम करत असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवसेनेबरोबरच्या युतीचा दोन्ही बाजूला लाभ होईल असे ते आवर्जून सांगतात. मुद्याला मुद्दा आणि आवश्यक वाटेल तेव्हा गुद्दा अशा पद्धतीने काम करत असल्याने ग्रामीण भागातील संघटनेचा लाभ होईल, असा दावाही संभाजी बिग्रेडच्यावतीने केला जात आहे. 

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मोर्चा काढणारी मंडळी राज्य सरकारच्या बाजूने नाहीत, असे चित्र आता निर्माण केले जात आहे. ‘ मराठा हित’ असे संघटना बांधणीचे स्वरूप असणाऱ्या संभाजी ब्रिगेड या राजकीय संघटनेबरोबर केलेली युतीमुळे शिवसेनेच्या जातनिरपेक्ष या प्रतिमेला मात्र तडा देणारे असल्याचेही मत व्यक्त होत आहे. संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनांचे व त्यांच्या वैचारिक कृतीशीलतेचे परिणाम आणि त्याचा इतिहास याबाबतचे प्रश्न आता शिवसेनेलाही विचारले जातील. त्यामुळे नव्या युतीचा ग्रामीण भागात लाभ आणि शहरी भागात तोटा असे संमिश्र चित्र राजकीय पटलावरही दिसू शकेल असे मानले जात आहे. भाजपमधील मराठा नेत्यांच्या मागे मराठा समाज आहे किंवा नाही, याची चाचपणी जिल्हा परिषद व पंचायती निवडणुकांमध्ये होईल असे मानले जात असून त्याची चाचणी म्हणूनही नव्या युतीकडे पाहिले जात आहे.

आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजामध्ये अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नव्या युतीमुळे शिवसेनेला लाभ होईल का, याविषयी शंका घेतल्या जात आहे. ग्रामीण भागात विकासाची कंत्राटे घेणारा समाज आता शिंदे गटाशी जोडला जात असल्याने संघटन बांधणीसाठी शिवसेनेला युतीचा लाभ होऊ शकतो. मात्र, इतिहासाच्या विकृतीकरणाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन किती आहे, याविषयी अद्यापि संभ्रम असल्याने शहरी भागात शिवसेनेला त्याचा काही प्रमाणात फटकाही बसू शकतो असे मानले जात आहे. मराठवाड्यात शिवसेनेचा चेहरा ‘ बहुजन’ वादी होता तो नव्या युतीमुळे ‘ मराठा हित’ वादी होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji briged may create new challenges in front of shivsena print politics news pkd