नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप, रेस्टॉररन्ट्स, हॉटेल्स नसल्याने होणाऱ्या गैरसोयींबाबत या मार्गावरून प्रवास करणारे नाराजी व्यक्त करीत होते. मात्र सरकार त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आले. आता हा महामार्ग १०० टक्के पूर्ण झाला आहे, आजवर गैरसोयींबद्दल मौन बाळगणारे भाजपचे आमदारही त्या विरोधात जाहीरपणे बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे त्याची सुरूवातही नागपूरच्याच भाजप आमदाराने केली आहे. या पुलाची बांधणी करणारे एमएसआरडीीचे अधिकारी या मार्गावरून प्रवास करीत नाही का ? असा थेट सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या सूचनांकडे सरकार लक्ष देईल का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची मुळ कल्पना असलेला नागपूर-मुंबई महामार्ग फडणवीस २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या नावाने जाहीर केला. एकूण ७०१ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी मार्गाचे नागपूर ते शिर्डी या ५०० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तेव्हा पासूनच हा महामार्ग त्यावर होणाऱ्या अपघातामुळे आणि दूर-दूरपर्यंत हॉटेल्स,रेस्टॉरन्ट आणि पेट्रोल पंप नसल्याने प्रवाशाच्या गैरसोयीमुळे टिकेचे लक्ष्य ठरला. दररोज हजारो वाहने या मार्गावरून जातात. अपघात आणि गैरसोय या विषयी संताप व्यक्त केला जातो. मात्र सरकारच्या कानापर्यंत तो काही पोहचला नाही. खुद्द मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांचाच महत्वाकाक्षी प्रकल्प असल्याने भाजपचे विदर्भ व मराठवाड्यातील सत्ताधारी पक्षातील आमदारही या विषयी काही बोलत नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांनी या बाब सरकार दरबारी मांडली , पण त्यांचे कोणी ऐकत नाही. समृद्धीच्या विरोधात बोलणे म्हणजे फडणवीस यांच्या विरोधात बोलणे असाच समज भाजपमध्ये झाला आहे. आता हा महामार्ग नागपूर-मुंबई असा पूर्ण झाला आहे. याचे पुन्हा उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्याचा घाट घातला जात आहे. पण त्याच वेळी त्यावर नसलेल्या सुविधांबाबत आता भाजपमधूनच ओरड सुरू झाली आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात शनिवारी अधिकृतरित्या पत्रकच काढले आहे आणि प्रवाशासाठी सोयी करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणतात आ. खोपडे
समृदी महामार्गावर १०० किलोमीटरवर पेट्रोलपंप आणि हॉटेलची आवश्यकता आहे. परंतु दोनशे-तीनशे किलोमीटर अंतरापर्यंत काहीच नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. दूर-दूर अंतरावर मोजक्याच ठिकाणी रेस्टोरेंट व पेट्रोल पंप आहे. परंतु या ठिकाणी वाहनाकरिता शेड नाही. उन्हामध्ये वाहने गरम होतात. रस्ताही सिमेंटचा आहे. त्यामुळे तापमानही वाढते. उन्हाळ्यात त्याची तीव्रता अधिक असते. या मार्गावर जी मोजकी हॉटेल्स आहेत तेतेही वाहने उन्हातच उभी करावी लागते त्यामुळे ती आणखी गरम होते. यााबाबत सरकारने काही उपाययोजना कराव्या, अशी मागणी खोपडे यांनी केली आहे.
एमएसआरडीसीचे अधिकारी जात नाही का ?
या रस्त्याची बांधणी करणारी यंत्रणा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एसएसआरडीसी) असून त्याचे अधिकारी व मंत्री या रस्त्यावरून प्रवास करतात किंवा नाही. त्यांना गैरसोयीबाबत काहीच कसे कळत नाही ? उन्हाळा वाढत असल्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे खोपडे यांनी पत्रकात नमुद केले आहे.