नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली असून प्रवीण दटके यांच्या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे निकटवर्ती आणि मानद सचिव संदीप जोशी यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. परंतु, भाजप श्रेष्ठींकडून माधव भंडारी, दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर या तिघांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. विदर्भातून केचेंना संधी देण्यात आल्याने तूर्तास जोशी यांची आमदार होण्याची शक्यता धुसर आहे.
विधानसभेच्या निवडणुका होऊन सहा महिने होत नाहीत तोच राज्यामध्ये आणखी एका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त पाच जागांसाठी २७ मार्चला मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहेत. विधान परिषद सदस्य प्रवीण दटके मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याने त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली आहे. सध्या विधानसभेत भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचेच उमेदवार सहज विजयी होतील.

दटके यांच्या जागेवर भाजपमधून माजी महापौर संदीप जोशींसह दक्षिण नागपूरचे माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नागपूर महापालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे आणि माजी जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांचीही नावे चर्चेत होती. परंतु, संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. त्यांनी यापूर्वी पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. सध्या मुख्यमंत्र्यांचे मानद सचिव म्हणून फडणवीस यांनी नागपूरची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे प्रवीण दटकेंच्या जागेवर जोशींनाच संधी मिळेल, अशी शक्यता होती. खुद्द संदीप जोशींनीही माध्यमांशी बोलताना आपण विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, भाजप श्रेष्ठींनी निश्चित केलेल्या तीन नावांमध्ये विदर्भातून दादाराव केचे यांचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान आर्वीतून त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. बंडखोरीचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांना भाजप श्रेष्ठींकडून विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाने त्यांना दटकेंच्या जागेवर संधी देऊन शब्द पाळल्याचे दिसते.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा निवडणुकीत कामठीतून विजयी झाल्याने त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर झाल्यावर या जागेसाठी संदीप जोशींच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या वाट्याला प्रतीक्षा आली आहे.

विदर्भातील शिवसेना, राष्ट्रवादीचे नेतेही इच्छुक

विधानसभेत भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे एकहाती सत्ता आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकण्याचा दावा महायुतीने केला आहे. यातील तीन जागा भाजपला तर प्रत्येकी एक जागा शिंदे आणि पवार गटाला दिली जाणार आहे. विधानसभेत निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही पक्षादेशामुळे थांबलेल्या विदर्भातील शिंदे आणि पवार गटातील नेत्यांचे लक्ष विधान परिषदेकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांचे नाव आघाडीवर आहेत. तर, अजित पवार गटातील अनेक नेते इच्छुक आहेत.

Story img Loader