PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरिशसच्या दौऱ्यावर आहेत. मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोखूल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाकुंभमेळ्यातील गंगाजलाने भरलेला गडू भेट दिला. तसंच त्यांच्या पत्नीला बनारसी साडी भेट दिली. या भेटींची चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना काय भेटी दिल्या?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोखूल यांची आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली. या भेटीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोखूल यांना महाकुंभातील त्रिवेणी संगमाच्या पाण्याचा गंगाजलाने भरलेला तांब्याचा गडू भेट दिला. तसंच बिहार येथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ मखाणेही त्यांना भेट म्हणून दिले. एवढंच नाही तर राष्ट्रपती धरम गोखूल यांच्या पत्नी ब्रिंदा गोखूल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनारसी साडी भेट म्हणून दिली. बनारसी साडी ही तिच्या उत्तम दर्जाच्या सिल्कसाठी आणि जरीकामासाठी देशभरात आणि जगभरात प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये तयार झालेल्या एका खास खोक्यात ती साडी ठेवून ते गिफ्ट त्यांनी ब्रिंदा यांना दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मॉरिशसच्या ५७ व्या राष्ट्रीय दिवसाला उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे समकक्ष नवीनचंद्र रामगुलाम यांच्या निमंत्रणानंतर मॉरिशस दौऱ्यावर आले आहेत. आज नवीनचंद्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमानतळावर स्वागत केलं. १२ मार्चला मॉरिशसचा ५७ वा राष्ट्रीय दिवस आहे. त्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील.मॉरिशसला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दोन्ही देशांमधला नवा आणि उज्ज्वल अध्याय आहे असंही वक्तव्य केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी २०१५ मध्ये पंतप्रधान असताना आणि १९९८ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असताना मॉरिशसचा दौरा केला होता. भारत आणि मॉरिशस यांच्यात उत्तम व्यावसायिक संबंध आहेत. मॉरिशसला १९६८ मध्ये स्वातंत्र्य मिळालं. दोन्ही देशांमध्ये अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत. कारण मॉरिशसच्या १२ लाखांच्या लोकसंख्येत साधारण ७० टक्के नागरिक हे भारतीय वंशाचे आहेत.
मॉरिशसच्या पंतप्रधानांनाही भेटले नरेंद्र मोदी
मॉरिशसच्या राष्ट्रपतींची भेट घेण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे समकक्ष मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांचीही भेट घेतली. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्येही मॉरिशसचा दौरा केला होता. त्यावेळीही त्यांनी मॉरिशसच्या गंगा तलावाला भेट दिली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंब्याच्या झाडाचं उदाहरण दिलं होतं. “आपण आंब्याची विविध झाडं पाहतो तेव्हा त्यातले सगळे आंबे खाऊन बघत नाही. एक किंवा दोन आंबे खाल्ले की आपल्याला समजतं की संपूर्ण झाडांना लगडलेले आंबे कसे आहेत. त्याचप्रमाणे जगाने मॉरिशसकडे पाहिलं की त्यांना भारत काय आहे हे समजू शकतं” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरिशसच्या दौऱ्यावर गेले आहेत. मॉरिशसमध्ये त्यांचं स्वागत झाल्याचंही त्यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.