सांगली : ‘काट्याच्या आणीवर वसली तीन गावं, दोन ओसाड, एक वसेचना’ अशी संत एकनाथ यांच्या भारूडातील गावाप्रमाणे जिल्ह्यात लाडक्या बहिणींची अवस्था सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ जागांसाठी छाननीनंतर १८४ उमेदवार उरले असून, यापैकी एकाही राजकीय पक्षाने महिलांना संधी तर दिलीच नाही. मात्र, अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या १० महिलांनाही रणांगणातून बाजूला करण्याचे हस्ते, परहस्ते प्रयत्न सुरू आहेत.

सांगली विधानसभा मतदार संघात माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे. सांगलीत त्यांच्या नामसाधर्म्यांचा लाभ उठविण्याच्या हेतूने आणखी तीन महिला उमेदवार जयश्री पाटील या नावाच्या आहेत.

हेही वाचा :PM Narendra Modi: मोदींच्या सभांचा ८ नोव्हेंबरपासून धडाका

सांगली मतदार संघामध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील, जयश्री (वहिनी) जगन्नाथ पाटील, जयश्रीताई पाटील आणि मिनाक्षी विलास शेवाळे या चार महिला आणि बहुजन समाज पार्टीने अधिकृत उमेदवार दिलेल्या आरती सर्जेराव कांबळे या पाच महिला उमेदवार आहेत. आता उमेदवारी माघारीच्या मुदतीपर्यंत कोण मैदानात राहते हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. मिरज मतदार संघातून चार महिला रिंगणात उतरल्या आहेत. यामध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांच्यासह जैनब पिरजादे, ज्योती कांबळे, स्टेला गायकवाड यांचा समावेश आहे. तर पलूस मतदार संघामध्ये शंकुतला शशिकांत पवार या एकमेव महिला उमेदवार आहेत. अन्य पाच विधानसभा मतदार संघात एकही महिला उमेदवार नाही. एकाही राजकीय पक्षाकडून महिलांना उमेदवारी न देता एकमेव मातब्बर उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या सांगलीतील जयश्री पाटील यांची उमेदवारी मागे कशी घेतली जाईल, याचीच मोर्चेबांधणी मात्र सध्या काँग्रेसकडून सुरू आहे. अद्याप त्यांची अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची भूमिका असली तरी सोमवारनंतरच खरे काय ते स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला

जिल्ह्यात यापूर्वी कळंत्रे अक्का (१९५२), लोकसाहित्याच्या अभ्यासिका सरोजिनी बाबर (१९५२), शालिनीताई पाटील (१९८०) आणि सुमनताई आरआरआबा पाटील (२०१४) व (२०१९) या महिलांनी विधीमंडळात प्रतिनिधीत्व केले आहे.