दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : लोकांमधून थेट सरपंच निवड आणि शासनाकडून मिळत असलेला थेट निधी यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने होत आहेत. या निवडणुकित गावचा कल कळणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे यामुळे  सर्वच राजकीय पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत. दिवाळीपूर्वी  ९४ गावांमध्ये  फटाक्याची आताषबाजी व गुलाल उधळला जाणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. यामुळे प्रत्येक नेत्याकडे असलेल्या दुसर्‍या फळीतील नेते सध्या कोणतीही सत्ता अथवा पद नसल्याने अस्वस्थ आहे. त्यात ग्रामपंचायतीसाठी चौदाव्या वित्त आयोगाकडून थेट मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्याने गावच्या सरपंचाला जिल्हा परिषद अथवा  पंचायत समिती सदस्यापेक्षा अधिक आर्थिक अधिकार मिळाले आहेत. यावेळी  सदस्यामधून सरपंच निवड होण्याऐवजी थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्यानेही गावात वर्चस्व कोणाचे हेही या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. गावचा कल समजण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुक ही चाचणी मानली जात आहे. विधानसभेसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हेही वाचा >>> भाजप आमदाराच्या दाव्यानुसार सांगली सुधारेल का?

निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारपासून सुरू झाला असून उमेदवारी माघारीची मुदत  २५  ऑक्टोबर पर्यंत आहे. यानंतर मतदान ५ नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी व निकाल ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामुळे गावचे पारकट्टे आणि देवळाच्या ओसर्‍या निवडणुकीच्या चर्चेत रात्री उशिरापर्यंत जागत्या राहत आहेत. तर नेत्यांच्या बैठकामधून उमेदवारांची चाचपणी सुरू असून रूसवे-फुगवे काढत असतानाच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गेला बाजार गावच्या सोसायटीची उमेदवारी देण्याचा शब्द देउन गटबांधणी सुरू आहे. जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे  २९  तर कवठेमहांकाळ तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. तर अन्य तालुकानिहाय निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती अशा खानापूर ३, जत ५, तासगाव २, पलूस ३, कडेगाव २, वाळवा ४, आटपाडी १६ आणि मिरज ३.

हेही वाचा >>> तेलंगणामध्ये भाजपचे ओबीसींना प्राधान्य

शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव  नाईक यांनी इच्छुकांची बैठक घेउन तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्याची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या तालुक्यात माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आणि आमदार नाईक एकत्र आले असले तरी या एकीकरणाला गावपातळीवर कसा प्रतिसाद मिळतो हे या निवडणुकीत दिसणार आहे. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपचे महाडिक बंधू आणि सत्यजित देशमुख यांच्याकडून होणार आहे. तर कवठेमहांकाळमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून भाजपचा गट प्रबळ करण्याचा प्रयत्न आहे. खासदार पाटील यांच्या गटाला आमदार सुमनताई पाटील यांचा आरआर आबा गटाशी थेट सामना करावा लागणार असला तरी या तालुक्यात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचीही ताकद दुर्लक्ष करण्यासारखी निश्‍चितच नाही. यामुळे या तालुक्यात तिरंगी काही ठिकाणी महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या गटाशी असा चौरंगी सामना अपेिक्षित आहे.

हेही वाचा >>> समीर भुजबळ नाशिकच्या राजकारणातून बाहेर?

आटपाडीमध्ये माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हे भाजपमध्ये आहेत. तसेच त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे भाजपचे विधानसभा प्रचार प्रमुंख आहेत. याच तालुययात आमदार गोपीचंद पडळकर हेही आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न करणार असे दिसते. तर जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील हे सध्या शिवसेना शिंदे गटाचे तालुक्यातील नेते असले तरी माणगंगा कारखाना निवडणुकीपासून त्यांनी स्वत:चा सवता सुभा निर्माण करून राजकीय गुरू आमदार अनिल बाबर यांना शह देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या मदतीने चालविला असल्याचा आरोप देशमुख गटाकडून होत आहे. तर देशमुखांच्या वाड्यातही आता दुहीची बीजे अंकुरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.यामुळे याही तालुक्यात राजकारणाची पुढची दिशा कोणती याचा बोध या निवडणुकीत  मिळणार आहे.

अन्य ग्रामपंचायतीमध्ये कुंडल ग्रामपंचायतीची निवडणुकही लक्ष्यवेधी ठरणार आहे. कारण फारशी  ताकद नसताना कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार अरूण लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिल्याने भाजपला सत्तेची संधी मिळाल्याचा राग काँग्रेसच्या डॉ. विश्‍वजित कदम गटाला आहे. जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनीही गत  निवडणुकीमध्ये लाड यांच्या वर्चस्वाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत बरोबरीने जागा पटकावल्या. मात्र, थेट सरपंच निवडीमध्ये लाड यांच्या गटाने बाजी मारली होती. यावेळी एकहाती सत्ता मिळवण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत. मात्र, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड ही लाड कुटुंबातील नेतृत्वाची पुढची पिढी कशी मोर्चेबाधणी करते आणि ३५  हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत कशी ताब्यात ठेवते याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli gram panchayat elections comptetition leaders of political parties print politics news ysh
Show comments