श्रावणी अमावस्या, मध्यानरातीचे बारा वाजलेले. विक्रमादित्य स्मशानातील वडाच्या झाडावर लटकलेले प्रेत खांद्यावर टाकून चालू लागला. एवढ्यात प्रेतातील वेताळ म्हणाला, ‘‘सांगलीचे खासदार अपक्ष. निवडणुकीत त्यांनी मुख्य शत्रू असलेल्या भाजप उमेदवाराचा पराभव करताना, या विजयात स्वकीयांचा जसा वाटा आहे, तसाच विरोधकांमधील आप्तांचा स्नेहही आहे. या उपकाराची परतफेड दिवाळीनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी करावी लागणार आहे. आता जाईल त्या ठिकाणी खासदार प्रत्येकाला मदत करतो असे सांगत आहेत. मग राजा मला सांग खासदार पैरा कुणाचा आणि कसा फेडणार?’’ प्रश्न सांगून वेताळ म्हणाला, ‘‘राजा जर उत्तर ज्ञात असून दिले नाहीस तर तुझ्या शरीराची शंभर शकले होऊन पायाशी लोळण घेतील आणि मौन बाळगलास तर पुन्हा मी झाडावर लटकेन. यावर राजा म्हणाला, इस्लामपूरची ताकद (जयंत पाटील) कुणाच्या मागे असेल त्याच्या विरोधात असेल त्याला मदत होईल. राजाचा मौनभंग झाल्याने वेताळ पुन्हा वडाच्या दिशेने झेपावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता बोला की…

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. अमुक तमुक फायदे मिळवून देतो असे सांगून खिसा कापण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा धतींगखोरांची मजल आणखी वाढली आहे. धनिकांना हेरून तुमचा अमली पदार्थ विक्री किंवा दहशतवादी संघटनेला मदत केल्याचा राष्ट्रविरोधी गंभीर गुन्ह्यात हात गुंतला आहे, अशी साधार भीती घालत काही लोकांना लाखो रुपयांची फसवणूक केल्याची प्रकरणी कोल्हापुरात चर्चेत आहेत. भाजपतून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता यांना अशाप्रकारे २० लाखाचा गंडा घातला गेला. ही संधी साधत त्यांचे प्रतिस्पर्धी हसन मुश्रीफ यांच्या समर्थक, अजितदादा गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी घाटगे यांना उद्देशून सरबत्ती सुरू केली. हे राजकीय डावपेच असल्याचे लक्षात घेऊन घाटगे यांनी फराकटे यांना अनुलेखाने मारले. शनिवारी कोल्हापुरात एका उद्याोजकाला अशाप्रकारे ८० लाख रुपयांना फसवण्यात आले. तेव्हा घाटगे यांच्या समर्थकांनी शीतल फराकटे यांना हा विषय काढायला सांगा; म्हणजे न्याय मिळेल, अशी मार्मिक टिप्पणी केली.

हेही वाचा : Haryana Election : हरियाणाच्या निवडणुकीत राजकीय घराण्यातील उमेदवारांची संपत्ती जाहीर; कोण आहेत सर्वात श्रीमंत दुष्यंत चौटाला?

शरीराने भाजपमध्ये, मनाने काँग्रेसमध्ये!

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यात आघाडीमध्ये, स्वगृही परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून भरतीवर जोर दिला जात आहे. त्याचाच एक किस्सा सोलापुरात पाहायला मिळाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते कल्याणराव पाटील यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते झाडून उपस्थित होते. याच समारंभात पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे व सध्या भाजपमध्ये असलेले दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. चन्नगोंडा हविनाळे यांना सुशीलकुमार शिंदे यांनी स्वगृही परतण्यासाठी जाहीरपणे गळ घातली. डॉ. हविनाळे हे काही कारणांनी भाजपमध्ये गेले असले तरी मनाने आजही काँग्रेसमध्येच आहेत. त्यांची नाळ तुटू शकत नाही. ते सदैव काँग्रेससोबतच राहतील, असा विश्वास व्यक्त करताना, तसे कबूल करून घेण्यास सुशीलकुमार शिंदे विसरत नव्हते. तेव्हा डॉ. हविनाळे यांची अवस्था सहनही होईना आणि सांगताही येईना, अशी झाली.

(संकलन : दयानंद लिपारे, एजाज हुसेन मुजावर, दिगंबर शिंदे)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli islampur assembly constituency jayant patil and vishal patil print politics news css