सांंगली : लोकसभेसाठी भाजप सांगली मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना धक्कातंत्राचा अवलंब करत चर्चेत असणार्यांना वगळून अन्य नावांचा विचार करत आहे. यातून आमदार गोपीचंद पडळकर आणि दीपक शिंदे यांच्या नावाचा प्राधान्याने विचार सुरू असून उमेदवारीच्या शर्यतीत असलेले विद्यमान खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार पृथ्वीराज पाटील यांना डावलून नवखाच उमेदवार देऊन धक्कातंत्र वापरण्याचे मनसुबे भाजपचे असल्याचे समजते.
महाआघाडीमध्ये सांगलीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सध्या सुरू आहे. यातच अद्याप महाविकास आघाडीत अधिकृत सहभागी न झालेल्या वंचित बहुजन आघाडीनेही सांगलीसाठी हक्क सांगितला आहे. गतनिवडणुकीत वंचित आघाडीला तीन लाख मते मिळाली असल्याने आपला या जागेवर हक्क अधिक प्रबळ असल्याचा दावा केला जात आहे. एकीकडे वंचित आघाडीशी चर्चा सुरू असताना कोल्हापूरच्या बदली सांगलीच्या जागेची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ही मागणी आग्रहाने पुढे केली जात असतानाच काँग्रेसच्या पदाधिकार्यांनीही सांगलीच्या जागेवर तडजोड होऊच शकत नाही, जर वरिष्ठ पातळीवर जागा बदलली तर काँग्रेस विसर्जित करण्याचा इशारा देत विशाल पाटील यांच्यासाठी सर्वांनीच आग्रह धरला आहे. यामुळे महाआघाडीतील सांगलीच्या जागेचा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या चिन्हाशिवाय अन्य कोणतेही चिन्ह आपण स्वीकारणार नसल्याचे विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीत ठणकावून सांगितले आहे.
हेही वाचा – यवतमाळमध्ये शिंदे गटातच जुंपली, मंत्री संजय राठोड – खासदार भावना गवळी यांच्यात फलक युद्ध
दुसर्या बाजूला महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब पटकावणारे पैलवान चंद्रहार पाटील यांनी संजय राऊत यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण मशाल चिन्ह घेऊन मैदानात उतरण्यास तयार असल्याचे सांगून जागा वाटपाच्या लढाईत उडी घेतली आहे. यामुळे कोल्हापूरच्या जागेमुळे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला पेच कसा सुटतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा – राज्यातील जागावाटपात तीन तिघाडा नाराजांचा बिघाडा
सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील हे तिसर्यांदा खासदार होण्यासाठी सज्ज झाले असून गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तयारी सुरू आहे. तर त्याहीअगोदर विद्यमान खासदारांच्या कामकाजावर नाराज असलेल्या मंडळींना एकत्र करून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनाही उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. मात्र, दोघापैकी एकाला उमेदवारी दिली तरी भाजपची सांगलीची हक्काची जागा अडचणीत येऊ शकते याची जाणीव पक्षाच्या वरिष्ठांना झाली असल्याने उमेदवारीबाबत धक्कातंत्राचा अवलंब केला जाऊ शकतो. यातून पर्यायी उमेदवार म्हणून विधान परिषदेचे सदस्य आणि धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गळी उमेदवारी मारण्याचे मनसुबे पक्षाअंतर्गत पातळीवर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. तसे झाले तर मतदारसंघात मराठा विरुद्ध धनगर असा सामना रंगला तर अगोदरच सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे पक्ष अडचणीत येण्याची साशंकताही वर्तवली जात असून पर्याय म्हणून शहर जिल्हा भाजपचे अध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांचेही नाव चर्चेत आले आहे.