सांंगली : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना सांगली मतदारसंघात मात्र सर्वच राजकीय पक्षांमध्ये अखेरच्या टप्प्यात उमेदवारीवरून गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे या निवडणुकीत शत्रू कोण, मित्र कोण, झेंडा कोणाचा घ्यायचा आणि खांद्यावर पालखी कोणाची घ्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अद्याप उमेदवार निश्‍चित नसला तरी जिल्ह्यातील महायुती, महाआघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष अशी चौरंगी लढत पाहण्यास मिळणार असली तरी कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल हे अजून अनिश्‍चित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच आठ महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीला विधानसभेचे संदर्भही महत्वाचे ठरणार आहेत. यामुळे उमेदवारीवर आघाडी, युतीअंतर्गत मोठा अंतस्थ संघर्ष सुरू आहे. महायुतीमध्ये सांगलीची जागा भाजपलाच मिळणार हे स्पष्ट असले तरी भाजपअंतर्गत उमेदवारीसाठी विद्यमान खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचे पडसाद गेल्या आठवड्यात पक्ष निरीक्षकांच्या भेटी दरम्यान दिसून आले. पक्षांतर्गत संघर्ष असल्याने सांगलीची जागा खात्रीलायक पक्षाकडे राहावी यासाठी भाजपकडून विरोधकांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल याची पेरणी केली जात आहे. यातूनच माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या पेरल्या जात आहेत का, असा संशय बळावत चालला आहे. पक्षाअंतर्गत उमेदवारीसाठी चाललेला संघर्ष संपावा हा हेतू यामागे असला तरी विरोधकामध्ये संशयाचे वातावरण तयार करणे आणि पक्ष बेबनाव टाळणे हाच डाव या मागे असू शकतो.

हेही वाचा – मंत्री दादा भुसे यांच्या विरोधातील धुसफूस बाहेर

सध्याच्या घडीला सांगली मतदारसंघात महाआघाडीतून विशाल पाटील, महायुतीतून खासदार संजय पाटील व देशमुख यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. संक्रातीच्या निमित्ताने गावोगावी महिलांचे हळदी कुंकू सोहळे, होम मिनिस्टरसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे.

वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची उमेदवारी विश्‍वजित कदम यांनी तर चार महिन्यांपूर्वीच जाहीर करून चित्र स्पष्ट केले आहे. मात्र, लोकसभा जागा वाटपामध्ये कोल्हापूरची जागा लढविण्याची तयारी दर्शवत असताना शाहू महाराज यांनी काँग्रेसकडून लढविण्याची भूमिका घेतल्याने सांगलीची जागा शिवसेनेला मिळावी अशी चर्चा झाल्याने सांगलीत गोंधळ माजला आहे. शिवसेनेला जर जागा दिली तर सक्षम उमेदवार अगोदर शोधावा लागणार आहेच, पण यावरही स्थानिक पातळीवर गतवेळीप्रमाणे काँग्रेसने उमेदवारही उसनवारीवर द्यावा अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. मात्र, हा धोका पत्करण्यास काँग्रेसचे स्थानिक नेते राजी नाहीत.

हेही वाचा – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या राजकारणाची तऱ्हाच न्यारी

महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब पटकावणारे चंद्रहार पाटील हेही लोकसभेच्या मैदानात उतरलेच आहेत. कधी बैलगाडी शर्यती, रक्तदान शिबिरे यामाध्यमातून त्यांनी जनसंपर्क ठेवत असताना गावोगावच्या कुस्ती मैदानांना भेटी देत संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांनी उमेदवारीसाठी प्रत्येकाचे उंबरे झिजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेने सांगलीची जागा मागताच पैलवानांनी लगेच मातोश्रीवर धाव घेतली. तत्पुर्वी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाल्याचा दावा करत येत्या काही दिवसांत उमेदवारी जाहीर होणार असल्याचे सांगितले. रविवारी तर वंचितची उमेदवारी पैलवानांना जाहीरच झाल्याचा संदेश समाज माध्यमावर प्रसारित होऊ लागला, सायंकाळी मात्र, ते खोटे असल्याचे जाहीर झाले, तोपर्यंत पैलवान शिवसेनेच्या तंबूत गेल्याचे वृत्त पसरले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची उमेदवारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केली आहे. खराडेही गतवेळचा अनुभव पाठीशी घेऊन मतदारसंघात प्रचारात मग्न आहेत.

भाजपला सांगलीमध्ये हॅटट्रिक साधायची आहे. मात्र, यासाठी पक्षातील पहिल्या फळीचे नेते एकसंघ असल्याचे चित्र काही केल्या साधेना झाले आहे. यातूनच विरोधकांचे आयात नेतृत्व हाती लागते का याची चाचपणी सध्या सुरू आहे. यातूनच कधी आमदार विश्‍वजित कदम, कधी, आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील तर कधी वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आभासी पद्धतीने घडत असाव्यात अशी शंकास्पद स्थिती आहे. स्वाभिमानीचे खराडे वगळता अन्य कोणत्याचा पक्षाच्या उमेदवाराची घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यांमधला संभ्रम दूर होणार नाही. त्यानंतर पालखी कोणाची उचलायची, झेंडा कोणता खांद्यावर घ्यायचा याचा निर्णय दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनी प्रलंबित ठेवला आहे.