राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी गेल्या आठवड्यात नागपूरला झाला. एकेकाळी राज्याचे नेतृत्व करणारा आणि कधी कधी एकाच वेळी तीन-चार वजनदार मंत्री होण्याचे भाग्य लाभलेला सांगली जिल्हा यावेळी मंत्रीपदापासून वंचित राहिला. जिल्ह्यात आठपैकी पाच आमदार महायुतीला मिळाले, ताकद वाढली. मात्र सत्तेची पदे शेजारच्या जिल्ह्याने पटकावली. यावेळी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान परजिल्ह्याला मिळणार असे दिसत असतानाच काही विरोधक मात्र आमच्या साहेबांच्या हस्तेच यावेळी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण होणार असल्याचे सांगत आहेत. साहेब जरी दिल्या घरीच सुखी असल्याचे वारंवार सांगत असले तरी त्यांच्या वक्तव्यात आणि कर्तृत्वात कायम विरोधाभास असल्याचा दाखलाही दिला जात आहे. आता जिच्यासाठी वाईली राहिले, तीच सासू होणार असेल तर नांदतींचा शाप भोवणार का?
नवीन घरोबा?
पदाविना माशाची पाण्याबाहेर जशी तडफड होते तशीच अवस्था मंत्रीपदाविना छगन भुजबळांची झाली असावी. कारण गेल्या रविवारी मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळाले नाही तेव्हापासून भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. ‘आपल्यासाठी नव्हे पण ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी मंत्रीपदे हवे होते वगैरे पालुपद त्यांनी लावले. फडणवीस मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे सर्वाधिक मंत्री आहेत. तरीही भुजबळ नसल्याने ओबीसी समाजाचे प्रश्न सुटू शकणार नाहीत हे कसे काय? नवीन रक्ताला संधी दिली पाहिजे हे प्रस्थापित नेत्यांच्या बहुधा गावीच नसावे. अजित पवारांनी मंत्रीपद नाकारल्यावर भुजबळांची चीडचीड सुरू झाली. राष्ट्रवादीने दखल घेतली नाही, त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी मागणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली. विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही म्हणून शिवसेना सोडली, मंत्रीपदासाठी शरद पवारांची साथ सोडली. भुजबळ आता पुन्हा नवीन घरोबा करणार का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
हेही वाचा : BJP Vs Congress : राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार करणारे भाजपाचे खासदार कोण?
आधी सासऱ्यांना समजवा…
संपूर्ण महाराष्ट्राला मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील संबंध कसे आहेत, ते माहीत आहे. या दोघांना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी कोणतेही मैदान चालते. लोकसभा, विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान तर एकमेकांवर आरोप करण्यास उधाण आले होते. निवडणूक झाल्यावर मग त्यांना नागपूर अधिवेशनाचे मैदान मिळाले. खडसे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत एका पोलीस निरीक्षकाने कोणामुळे आत्महत्या केली, असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला होता. तर खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील वाळू उपसा आणि अवैध धंदे महाजन यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप केला होता. खडसे आपल्याविषयी कायम कमरेखालच्या भाषेत बोलतात. त्यामुळे त्यांच्या भाषेतच उत्तर द्यावे लागते, असा संताप महाजन यांनी जळगावात व्यक्त केला. एकनाथ खडसे यांच्या स्नुषा तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी महाजन आणि खडसे यांनी एकत्र येण्याची भूमिका मांडली असता, आधी आपल्या सासऱ्यांना घरी समजवा, असे उत्तर मंत्री महाजन यांनी दिले.