दिगंबर शिंदे
सांगली : गेल्या तीन वर्षापासून बंद असलेला आणि जिल्हा बँकेने थकित कर्जासाठी ताब्यात घेतलेल्या आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक भाजप विरूध्द शिवसेना शिंदे गट यांच्यात अत्यंत चुरशीने होण्याची चिन्हे आहेत. या कारखान्याच्या निमित्ताने राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातच राजकीय संघर्ष पाहण्यास मिळण्याची चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आ. अनिल बाबर यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तथा भाजपचे माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यात ही राजकीय लढाई असेल.
दुष्काळी भागात कारखाना चालेला का अशी शंका असतानाही राजेवाडी, सांगोला आणि माण या तीन तालुययातील उस शेतीवर आटपाडीच्या माळरानावर कारखाना उभारणी करण्यात आली. १९८६ मध्ये या कारखान्याचे पहिले गाळप झाले. मात्र, मध्यंतरीच्या काळात साखर कारखानदारी अडचणीत आल्यानंतर अन्य कारखान्याप्रमाणेच याही कारखान्यावर आर्थिक संकट आले. कर्जबाजारी कारखाना कर्जाची परतफेड करू शकला नाही. तीन वर्षापासून हा कारखाना बंद पडला. कारखान्याला पुरविण्यात आलेल्या उसाची देयकेही उस उत्पादकांना मिळाली नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यासाठी आंदोलनेही केली, मात्र, अखेरपर्यंत मार्ग निघू शकला नाही. कर्जाचा बोजा वाढत गेल्याने अखेर जिल्हा बँकेने या कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेउन लिलावाचा प्रयत्न केला. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे सध्या हा कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे.
हेही वाचा >>> माधव, खाम, अहिंदा…निवडणुका जिंकण्यासाठी यशस्वी प्रयोग
बंद असलेल्या आणि जिल्हा बँकेचा ताबा असलेल्या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या १७ जागासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून तब्बल ७६ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ३१ मे असून त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या ज्या पध्दतीने मोचेबांधणी सुरू आहे त्यानुसार यावेळी निवडणुक अटीतटीची होण्याचीच चिन्हे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील माण या तालुययातील काही शेतकरी सभासद आहेत. कारखान्याचे एकूण मतदार १० हजार ५०५ असून कारखाना स्थापन झाल्यापासून यावर देशमुख यांचेच वर्चस्व राहिले आहे. या वर्चस्वालाच गेल्या दोन-तीन वर्षापासून आव्हान देण्याचे प्रयत्न आ. बाबर गटाकडून सुरू आहेत.
हेही वाचा >>> भाजप कार्यकारिणी बैठकीची ‘शाळा’
जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी केला होता. एवढ्यावर न थांबता नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीतही पाटील यांनी देशमुख गटासमोर आव्हान उभे करून १८ पैकी ९ जागा जिंकत बरोबरी साधली आहे. आता सभापती निवडीत यशस्वी राजकीय खेळी करीत भाजपचा एक संचालक आपल्या गटाकडे वळवून सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे खिशात घातली. यामुळे बाजार समितीवरील देशमुख गटाचे वर्चस्वही मोडीत निघाले. देशमुख गट सध्या भाजपमध्ये असला तरी त्यांची मूळ नाळही राष्ट्रवादीशी होती. खा. शरद पवार यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. मात्र, बदलत्या राजकारणात त्यांनी आ. गोपीचंद पडळकर यांच्यासोबत भाजपमध्ये बस्तान बसविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
गेल्या वेळी पंचायत समितीची सत्ताही या गटाच्या ताब्यातच होती. आता मात्र, शिवसेना शिंदे गटाने त्यांना प्रत्येक निवडणुकीत आव्हान देण्याचे प्रयत्न चालविले असून याला काही प्रमाणात यशही मिळत असल्याचे दिसत आहे. जिल्हा बँकेनंतर बाजार समितीची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर माणगंगा कारखान्यावरही कब्जा करण्याचा पाटलांचा प्रयत्न आहे. आता टेंभू योजनेचे पाणी शिवारात आले आहे. यामुळे या पाण्यावर उस शेतीमध्येही वाढ झाली असून कारखान्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या राजेवाडी परिसरात असलेला सद्गुगुरू श्री श्री हा एकमेव खासगी कारखाना असून तालुययात पर्यायी कारखाना म्हणून माणगंगा कारखान्याची उपयुक्तता वाढणार आहे. आणि नेमयया याच स्थितीचा लाभ उठविण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.