Vasantdada Patil Family in Sangli Vidhan Sabha Constituency सांगली : राज्यात राजकीय क्षेत्रात एकेकाळी प्रबळ असलेल्या सांगलीतील वसंतदादा घराण्यात विधानसभा उमेदवारीवरून पुन्हा एकदा फुटीचे ग्रहण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. दादा घराण्यातील थोरली विरूध्द धाकटी पाती असा हा संघर्ष आता नव्या वळणावर पोहचला असून लोकसभा निवडणुकीत एकसंघ दिसणारी काँग्रेस संघटना फुटीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम नेहमी काँग्रेसला पराभूत करण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे असे म्हणत होते. हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य असल्याची अनुभूती विधानसभेच्या रणमैदानावर पुन्हा एकदा येत आहे.

सांगलीच्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू मार्केट यार्डाजवळील विजय बंगल्यात, तर दुसरा बिंदू कारखान्यासमोर असलेल्या साई बंगल्यात आहे. या दोन बिंदूंंना स्पर्श करणारा आणि तरीही नामानिराळे वागणारे एक केंद्र वसंतदादा कारखान्याच्या प्रवेश दारावरील बंगल्यात विसावले आहे. वसंतदादा असताना कारखाना दादांचे पुतणे स्व. विष्णुअण्णा पाटील यांच्याकडे आमदारकी तर खासदारपद स्व. प्रकाशबापू पाटील या मुलाकडे अशी अलिखित वाटणी होती. मात्र, कालांतराने खासदारकी व कारखानाही आपणाकडेच या मानसिकेतून मतभेद निर्माण होत गेले. यातून 1१९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्व.विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव संभाजी पवार या त्यावेळच्या नवख्या पैलवानांने केला. यानंतर १९९५ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी करून जिल्ह्यात पाच पांडव निवडून आणण्याची विजय बंगल्याची ताकद दिसून आली. मात्र, घरच्या मैदानावर प्रकाशबापू पाटील व मदन पाटील या चुलत्या, पुतण्याचा पराभव झाला. काही काळ दोन्ही गटात शांतता राहिली असली तरी कारखाना मात्र थोरल्या पातीकडे गेला. यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मदन पाटील यांनी मै हुं ना चा नारा देत विधानसभेत प्रवेश केला. स्थानिक पातळीवर घडलेल्या गृहयुध्दात त्यांनी विजय संपादन केला असला तरी मने मात्र दुभंगत गेली.

हेही वाचा >>>Nalasopara Vidhan Sabha Constituency : कॉंग्रेसची उमेदवारी हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या पथ्थ्यावर

यातून जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये स्व. मदन पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्या पॅनेलमधून निवडण्ाुक लढवली. मात्र, विकास सोसायटी गटातून विशाल पाटील यांनी विजय संपादन केला. या पराभवानंतर मदन पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला दादा गटातील राजकारणच कारणीभूत ठरले.तथापि, महापालिका क्षेत्रात या गटाचेच वर्चस्व कायम राहिले आहे. शहरावर पकड असतानाही मदनभाउंचा विधानसभा व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव झाला. याचे शल्य या गटाला सातत्याने बोचत राहिले आहे.

हेही वाचा >>>Palghar Vidhan Sabha Constituency : पालघरमध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार भाजपमधून आयात

यातून घराण्याचे राजकीय नुकसान मोठे झाले असल्याचे लक्षात आल्यावर गेल्या पाच वर्षापासून दोन्ही गटांनी जुळते घेत एकोपा दाखवत यावेळची लोकसभा निवडणुकही जिंकली. सांगली विधानसभा मतदार संघामध्ये मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी प्रचार करून खा. विशाल पाटील यांच्या विजयात सक्रिय सहभाग नोंदवला. यानंतर विधानसभा निवडण्ाुकीसाठी मोचेर्र्बांधणी सुरू करत उमेदवारीची मागणीही केली. तथापि, राजकारणात शाश्‍वत असे काहीच नसते. त्यानुसार उमेदवारी गेल्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेले पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर या मनातील खदखदीला वाट मोकळी झाली.

यावेळी श्रीमती पाटील यांनी आम्हाला गाडायला निघालेल्यांना आम्ही गाडल्याविना गप्प बसणार नाही असे सांगत अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला. आता ही उमेदवारी अंतिम राहते, की माघार धेतली जाते यावर पुढचे राजकारण अवलंबून असले तरी दोन गटात निर्माण झालेली कटुता नजीकच्या काळात संपेल का हाही प्रश्‍नच आहे. सांगलीचे राजकारण पुन्हा एकदा नव्या वळणावर उभे ठाकले असून याचा फायदा कुणाला होतो, कोण उचलतो हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.