गेल्या वर्षी पंजाबमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव करत अरविंद केजरीवाल यांच्या आपनं पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. राजकीय धुरिणांसाठी काहीसा अनपेक्षित असलेला हा निकाल आपच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. या निकालाच्या जोरावर आपनं इतर राज्यांमध्ये देखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र, एकीकडे देशभर वावरण्याची अरविंद केजरीवाल यांची महत्वाकांक्षा असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मतदारसंघात शिरोमणी अकाली दलाकडून कडवं आव्हान दिलं जात आहे. मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या संगरूरमध्ये येत्या २३ जून रोजी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अकाली दलाकडून ‘बंदी सिंग’च्या मुद्द्यावरून रान पेटवलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आणि बादलांचं आव्हान!
वास्तविक संगरूर लोकसभा मतदारसंघ देखील मुख्यमंत्री भगवंत मान यांचाच. पंजाबचं मुख्यमंत्रीपद स्वीकारताना मान यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि इथे पोटनिवडणुका होणार हे स्पष्ट झालं. तेव्हापासूनच मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आपला कडवं आव्हान देण्याची तयारी शिरोमणी अकाली दलाचे सुखबिर सिंग बादल यांनी केली होती. त्यानुसार कमलदीप कौर राजोना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकूण ९ विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व आमदार आपचे आहेत. त्यामुळे आपचा बालेकिल्लाच मानला जाणारा हा मतदारसंघ शिरोमणी अकाली दलाने उचललेल्या ‘बंदी सिंग’च्या मुद्द्यामुळे चर्चेत आला आहे.
काय आहे ‘बंदी सिंग’ मुद्दा?
पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्या हत्येप्रकरणी सध्या तुरुंगात असणाऱ्या बलवंत सिंग राजोनाच्या भगिनी कमलदीप कौर राजोना यांना उमेदवारी देऊन सुखबिरसिंग बादल यांनी मोठा डाव टाकला आहे. या पार्श्वभूमीवरच शिरोमणी अकाली दलाने पूर्ण पंजाबमध्ये तुरुंगात खितपत पडलेल्या अनेक पंजाबी लोकांचा मुद्दा उपस्थित केला आहे. तुरुंगात बंद असलेले सिंग यातूनच ‘बंदी सिंग’ ही संकल्पना प्रचलित केली जाऊ लागली आहे. एकीकडे या मतदारसंघातील इतर असंख्य महत्त्वाचे प्रश्न असताना अकाली दलाकडून मांडल्या जाणाऱ्या ‘बंदी सिंग’ मुद्द्यावरून टीका देखील होत आहे.
तडजोडीच्या राजकारणावरुन भाजप आक्रमकतेकडे
कमलदीप कौर यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. “या पोटनिवडणुकीत आमचा लढा हा अन्यायाविरोधात आहे. इथे इतरही अनेक प्रश्न आहेतच. पण आम्ही हा मुद्दा इथल्या सर्वधर्मीयांपर्यंत घेऊन जात आहोत. कारण शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर देखील सर्वच धर्मांचे नागरिक पंजाबमधल्या तुरुंगांमध्ये खितपत पडले आहेत. माझे बंधू भाई बलवंत सिंग राजोना देखील त्यापैकीच एक आहेत”, असं त्या म्हणाल्या.
पंजाबमध्ये ‘मान’ सरकारविरोधात वाढती आंदोलने, पोटनिवडणुकीत आपच्या बालेकिल्ल्यात धक्का बसणार?
शिरोमणी अकाली दलाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
२००७ ते २०१७ या काळात शिरोमणी अकाली दल भाजपासोबत सत्तेत होता. शिवाय २०१४ ते २०२१ या काळात केंद्रात देखील सत्तेत होता. मात्र, तेव्हा ‘बंदी सिंग’चा मुद्दा का उपस्थित करण्यात आला नाही? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, “याआधी अकाली तख्त आणि आम्ही सगळे कधीच या मुद्द्यावर अशा प्रकारे एकत्र आलो नव्हतो”, असं म्हणत कमलदीप कौर यांनी भूमिका मांडली आहे.