सुहास सरदेशमुख , लक्ष्मण राऊत
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले ५८ माेर्चे, त्यानंतरच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रस्थापित पुढाऱ्यांनी तसे या प्रश्नातून लक्ष काढून घेतले होते. पण आंदोलन काळात ‘ एक मराठा लाख मराठा’ हे घोषवाक्य मात्र ग्रामीण भागात रुजले. गावोगावी चौकात एक मोठा भगवा ध्वज लावणारी, घरातून बाहेर पडताना कपाळी गंध लावणारे, हातात नाना प्रकारचे गंडेदोरे बांधणारे अनेक तरुण आरक्षण मिळाले तरच प्रश्न सुटतील या मानसिकतेने गावोगावी आंदोलने उभारतात. आंतरवली गावातील मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन याच मानसिकतेतून सुरू झालेले. जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या या आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव. शहागड ही त्यांची सासुरवाडी. गेल्या १२ -१५ वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. माथोरी गावातील हा अल्पभूधारक शेतकरी. मराठा आंदोलने सुरू झाली तेव्हापासून छोट्या- मोठ्या आंदोलनात सहभागी होणारे, प्रसंगी पुढारपण करता आले तर एखादे भाषण करणाऱ्या जरांगे यांच्या मागे माेठे पाठबळ उभे राहील, अशी शक्यता आंतरवलीच्या आंदोनापूर्वी नव्हती. २०१५ पासून गावागावात आंदोलन करण्यासाठी १२ पर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्या- त्या गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते.
आरक्षणाच्या आंदोलनांमध्ये अलिकडच्या काळात युवती आणि महिलांचा सहभागही वाढत जाणारा होता. त्याची अनेक कारणे. मराठवाड्यातील दुष्काळसदृष्य परिस्थितीमध्येही दडलेली आहेत. कापूस, सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. शिकलेली मुले शहरात स्पर्धा परीक्षेत गुंतले आहेत किंवा गावातच शेतीमध्येही प्रयोग करुन पाहत आहेत. पण या प्रयत्नांना प्रतिष्ठाही मिळत नाही आणि फारसे यशही. त्यामुळे गावोगावी विवाह न झालेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. या सर्व मुलांना आपले प्रश्न फक्त आरक्षणाच्या माध्यमातूनच सुटू शकतात हे खोलवरु रुजले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला होणारी गर्दी यातून जमा होते.
जरांगे हे शहागड आणि अंकुशनगर आणि शहागडच्या मध्ये एका छोट्या घरात राहतात. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथेही त्यांनी उपोषण केले होते. तेव्हाही आंदोलनास गर्दी जमा झाली होती. या आंदोलनाचीही चर्चा झाली होती.तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलवले होते. त्यांनीही तेव्हा आंदोन मागे घेतले. वडीकाळया आणि भांबेरी या गावातील त्यांच्या उपोषण आंदोनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आंदोलनाची दखल घेतली होती. पूर्वी मुंबईपर्यंत कसाबसा आवाज पोहचायला पण या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवर संपर्कही साधला. पण त्यातून तोडगा निघाला नाही. आंदोलन चिघळले आणि जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आले. या प्रश्नावर काम करण्यासाठी जरांगे यांनी शिवबा ही संघटनाही स्थापन केली. जगलो तर तुझा अन्यथा कपाळावरचे कुंकू पूस असे सांगून आलो आहे, असे वाक्य असणाऱ्या भाषणाचे छायाचित्रण आता समाज माध्यमांवर फिरू लागले आहे.
हेही वाचा >>>इंडियाचे राज्यातील जागावाटप खडतरच
जरांगे पाटील आता चर्चेत आहेत. आरक्षण मागणी पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन सुरूच राहील असे जरांगे यांनी जाहीर केले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह उदयराजे महाराज, छत्रपती संभाजी महाराज, रोहीत पवार, बाळा नांदगावकर यांनी आंदोलनस्थळी भेटी दिल्या आहेत. एक मुद्दा पुन्हा चर्चेत आणला जात आहे. कोणाला भेटतो आहे, कोणता गट कोणाला सहकार्य करतो आहे, यावर सत्ताधारीही लक्ष ठेवून आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी मतांच्या ध्रुवीकरणाची बेरीज- वजाबाकी पुन्हा सुरू झाली आहे, त्यात जरांगे मात्र चर्चेत आले आहेत. गावोगावी आरक्षण प्रश्नी काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांपैकी जरांगे हेही एक कार्यकर्ते. या वेळी त्यांचा आवाज मात्र सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचताना दिसतो आहे.