राहुल गांधी यांनी ‘माफी मागायला मी सावरकर नाही’ असे विधान केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणजेच ठाकरे गटाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत राहुल गांधी यांचे नाव घेत आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे ठणकावून सांगितले होते. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या दिल्लीमधील बैठकीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काँग्रेस आणि आमच्यात चर्चा झाली आहे. आमचे या मुद्द्यावर समाधान झाले आहे, असे ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>> लोकसभा अध्यक्षांविरोधात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव दाखल करणार? विरोधकांची भूमिका काय?
सावरकरांच्या मुद्द्यावर मी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली- संजय राऊत
“राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या विधानावर आम्ही दोन दिवसांपूर्वी आक्षेप व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला आम्ही अनुपस्थित राहिलो. आम्ही जो आक्षेप व्यक्त केला होता, त्याची दखल घेतली गेली. सावरकरांच्या मुद्द्यावर मी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. आमच्यासाठी हा विषय आता संपला आहे. आमच्यातील मतभेद दूर झाले आहेत. त्यानंतर आता आज (२९ मार्च) बोलावण्यात आलेल्या विरोधकांच्या बैठकीस आम्ही उपस्थित रोहिलो आहोत,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> ओडिशातील मंत्र्यांची हत्या झाल्यानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा BJD च्या विरोधात उमेदवार देणार
आमच्यातील मतभेद मिटले आहेत- संजय राऊत
तसेच राहुल गांधी यांनी आगामी काळात सावरकरांवर वक्तव्य केल्यास, ठाकरे गट काय भूमिका घेणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना “या विषयावर आम्हाला अधिक बोलायचे नाही. आमच्यातील मतभेद मिटले आहेत. राहुल गांधी यांनी हाच मुद्दा पुन्हा उपस्थित केल्यास, काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. मात्र राहुल गांधी सावरकरांचा मुद्दा उपस्थित करणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >>> भाजपा भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ; विरोधकांवर हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले ‘२०४७’ मधील भारताचे स्वप्न
राहुल गांधी काय म्हणाले होते?
राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये असताना भारतीय लोकशाही धोक्यात आहे, असे विधान केले होते. तसेच संसदेत आम्हाला बोलू दिले जात नाही. माईक बंद केला जातो, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण करत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र माफी मागायला मी सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते.