उमाकांत देशपांडे

मुंबई : अखेर भाजपला कायम सलत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने रविवारी मध्यरात्री अपेक्षेप्रमाणे अटक केली. राऊत यांनी भ्रष्ट मार्गाने पैशांचे व्यवहार केले असतील तर त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत दोषी ठरविले जाईल. मात्र शिवसेना-भाजपच्या ३० वर्षांच्या युतीत भाजपशी नाळ तोडून महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवणारा आणि भाजपच्या दृष्टीने खलनायक ठरलेला नेता गजाआड गेला, अशी भाजपच्या नेत्यांची भावना आहे.

पत्रकाराच्या भूमिकेत असलेले संजय राऊत हे शिवसेनेचे मुखपत्र ‘ सामना ‘ चे कार्यकारी संपादक झाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते, मात्र उध्दव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर ते त्यांचे निकटवर्तीय झाले. शिवसेनेतील धोरणप्रक्रियेत उद्धव ठाकरे त्यांच्याशी कायम सल्लामसलत करीत होते. त्यामुळेच राऊत यांनी केलेली वक्तव्ये आणि ‘ सामना ‘ तून केलेले लिखाण (दोन-तीन अपवाद वगळता) यांची ठाकरे यांनी कायम पाठराखण केली. पक्ष प्रमुखांच्या निर्णयाचे संकेत ते कायम लिखाण व वक्तव्यातून देत राहिले. ठाकरे यांनी या विश्वासातूनच त्यांना चार वेळा राज्यसभेची खासदारकी देत त्यांना राजकीय नेतृत्व व शिवसेनेची सुभेदारीही दिली.

त्यामुळे राऊत यांचे भाजपशी असलेले संबंध मात्र ताणलेलेच राहिले. भाजपशी युती असली तरी ठाकरे यांचे भाजप नेतृत्वाशी फारसे पटत नव्हते आणि अनेक मुद्द्यांवर वाद झाले. त्या प्रत्येक वेळी भाजपशी झालेल्या राजकीय संघर्षात राऊत हे बिनीचे शिलेदार बनून आघाडीवर राहिले किंवा ठाकरे त्यांना पुढे करीत राहिले. भाजपशी असलेल्या संबंधांमध्ये कटुता येत राहिली. भाजपने २०१४ मध्ये शिवसेनेशी २५ वर्षे असलेली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरील युती लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत तोडली. तेव्हापासून भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष उघडपणे सुरू झाला. विधानसभेत दोन्ही पक्षांमध्येच ‘ सामना ‘ झाला. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या सरकारला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज होती व तो दिला गेला. मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या बहुमताचे सरकार आल्याने महाराष्ट्रातही राजकारण बदलले. भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आला आणि शिवसेनेला छोटा भाऊ केले. शिवसेनेला संपविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू राहिले व शिवसेनेचा विरोध वाढू लागला. राऊत यांनी भाजपबरोबर सत्तेत असतानाही वादग्रस्त वक्तव्ये व लिखाण करून वारंवार भाजपचा संताप ओढवून घेतला. फडणवीस यांनी ठाकरे यांच्याकडे राऊत यांना आवर घालण्याची मागणीही काही वेळा केली होती.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…

राजकीय व महत्त्वाचे विषय आणि निवडणुकांमधील जागावाटपामध्ये राऊत यांचे अनेकदा भाजप नेत्यांशी खटके उडाले आणि जाहीरपणे यथेच्छ निंदानालस्ती झाली. पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावरही राऊत यांनी कायम टीका केली. भाजप नेते राऊत यांना धडा शिकविण्याची वाट पहात होते.

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीत लढूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरून अखेरीस काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. राज्यातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या घटनेत शिवसेनेचे ‘ चाणक्य ‘ राऊत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधांचा वापर करून व काँग्रेसशी यशस्वी शिष्टाई करून राऊत यांनी हे सरकार स्थापन करण्यात मोठा वाटा उचलला. हा भाजपवर मोठा आघात होता आणि शिवसेनेचा राजकीय सूड उगविण्यासाठी भाजपने सातत्याने प्रयत्न केले. त्यातून शिवसेनेत एकनाथ शिंदे व ४० आमदारांचा गट आपल्या बाजूने वळविण्यात आणि राज्यात सत्ता काबीज करण्यात भाजपला यश मिळाले. राऊत यांच्यामुळेच शिवसेनेची शकले झाली आणि हे जनतेचे सरकार सत्तेवर आले, राऊत हे फुटीचे शिल्पकार असल्याचे ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे मत आहे.

राऊत यांना आता पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली आहे. डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणातील रक्कम त्यांना व कुटुंबियांना मिळाल्याबाबतही चौकशी झाली आहे. राजकारणात सर्वपक्षीय नेत्यांची आर्थिक हितसंबंधांची प्रकरणे असतातच. त्यासाठी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी भाजपमध्ये जाऊन किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबर जाऊन ‘ पावन ‘ होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. राऊत यांनी मात्र त्यातून कोणताही धडा न घेता राजकीय संघर्षाचा मार्ग कायम ठेवत भाजप नेते, ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांविरोधात प्रचंड टीका केली.

त्यामुळे आता ते या गैरव्यवहारात पुरते अडकतील,अशी शक्यता आहे. माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक आदींना जामीन मिळणेही मुश्कील झाले आहे. राऊत यांची गत फारशी काही वेगळी होण्याची शक्यता नाही. मी झुकणार नाही, असे अटकेनंतर सांगणाऱ्या आणि भाजपच्या दृष्टीने राजकीय ‘ खलनायक ‘ ठरलेल्या राऊत यांना दीर्घकाळ संघर्षाचा ‘ सामना ‘ सुरू ठेवावा लागणार आहे.