Sanjay Raut on Nagpur Riots : नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्ते सोमवारी (१७ मार्च) दुपारी एकच्या सुमारास महाल झेंडा चौकात मुघल बादशाह औरंगजेबाचे छायाचित्र घेऊन आले होते. तसेच त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तयार केली होती. चौकात दाखल झाल्यावर त्यांनी औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला. दुपारी दोन वाजता, औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कबरीवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी चादर टाकण्यात आली होती. त्यावर धर्मग्रंथातील काही ओळी लिहिल्याचा दावा केला जात आहे. ती चादर पेटवल्याची अफवा पसरली आणि रात्री नागपुरात दंगल उसळली. एका बाजूला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना राज्याच्या उपराजधानीत दंगल उसळल्यामुळे राज्याच्या गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील या घटनेवरून थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.

संजय राऊत यांनी नुकतीच दी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आणि त्यानंतर नागपुरात पेटलेल्या दंगलीच्या घटनेवर भाष्य केले. तसेच अधिवेशन चालू असतानाच ही घटना कशी काय घडली? समाजकंटकांनी नेमकी हीच वेळ कशी साधली? यावरून त्यांनी संशय उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांची मुलाखत:

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा नेमका आत्ताच का पुढे आला आहे? फडणवीस म्हणाले आहेत की त्या कबरीला संरक्षित दर्जा मिळणे दुर्दैवी आहे.

संजय राऊत : महाराष्ट्रासमोर सध्या कित्येक समस्या आहेत. हे राज्य भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येसारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे. गेल्याच आठवड्यात राज्यातील नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या समस्यांपासून राज्यातील जनतेचे लक्ष विलचित करण्यासाठी किंवा दुसरीकडे वळवण्यासाठी हे सत्ताधारी कबरीतल्या औरंगजेबाला पुन्हा जिवंत करू पाहत आहेत. बीड जिल्ह्यात खंडणी व खुनांची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या समस्यांना लगाम घालण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करू पाहत आहे. लोकांचे लक्ष महत्त्वाच्या समस्यांपासून लोकांचे लक्ष वळवू पाहत आहे.

‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर (या बॉलिवूड चित्रपटात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारल्याचे दाखवण्यात आले आहे) हा मुद्दा चिथावण्यात आला. हे सरकार असे मुद्दे पेटवण्यात पटाईत आहे. सोमवारी आपण त्याची प्रचिती पाहिली. नागपुरात आपण हिंसाचार पाहिला. नागपूर शहराला ३०० वर्षांहून मोठा इतिहास आहे. तीन शतकांमध्ये तिथे कधी जातीय दंगल उसळली नाही. तसेच नागपूर हे फडणवीस यांचे शहर आहे. त्याच शहरात असा हिंसाचार होणे हे फडणवीस यांचे अपयश आहे. गृहमंत्री म्हणून ते राज्यात अपयशी ठरलेच होते. ते आता त्यांच्या स्वतःच्या शहरातही अपयशी ठरले आहेत.

सत्ताधारी लोक म्हणतायत की ते औरंगजेबाची कबर हटवतील, नष्ट करतील. तसे इशारे त्यांनी सरकारला दिले आहेत. परंतु, त्यांना हे करण्यापासून नेमके कोणी अडवले आहे? राज्यात त्यांचेच सरकार आहे. स्वतः सरकारनेच औरंगजेबाची कबर तिथून हटवावी. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अजित पवार यांनी स्वतः हाती कुदळ फावडे घेऊन ती कबर नष्ट करावी. किंवा त्यासाठी अध्यादेश काढावा, ठरावा करावा आणि कबर नष्ट करून टाकावी.

औरंगजेबाच्या कबरीबाबत महाविकास आघाडीची भूमिका काय आहे?

संजय राऊत : आम्ही मविआने अडीच वर्षे सरकार चालवले. आमच्या कार्यकाळात राज्यात जातीय हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. याआधी मनोहर जोशी सरकारच्या कार्यकाळात, बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना अशी एकही घटना घडली नाही. नेमक्या आताच जातीय दंगली का होत आहेत? औरंगजेबाची कबर हा आमच्यासाठी मुद्दाच नाही. ती आमच्यासाठी महत्त्वाची नाही. असेलच तर ती केवळ मराठ्यांच्या शौर्याची आणि धाडसाची साक्षीदार आहे. एक मुघल सम्राट महाराष्ट्र जिंकण्यासाठी इथे आला आणि अपयशी ठरला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी २५ वर्षे त्याच्याशी संघर्ष केला, त्याला युद्धात गुंतवून ठेवलं. अखेर तो इथल्याच मातीत मिसळला. ही कबर मराठ्यांच्या इतिहासाचा पुरावा आहे. तुम्ही ती कबर नष्ट केलीत तर एक प्रकारे मराठ्यांच्या इतिहास नष्ट करत आहात. आरएसएस इतिहास नष्ट करू पाहतेय.

फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित होता, त्याबद्दल काय सांगाल?

संजय राऊत : मग ते काय करत होते? नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित होता तर या गोष्टी घडत असताना फडणवीस नेमके काय करत होते? गृहखाते त्यांच्याकडेच आहे. जर हे सर्व घडत होते, कट रचला जात होता आणि फडणवीसांना या सगळ्याची कल्पना नसेल तर याचा अर्थ ते गृहखाते सांभाळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पूर्वनियोजित दंगलीची तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही गृहमंत्रिपदावर काय करत आहात? त्या पदावर का बसलेले आहात? विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी दंगलीआधी २४ तास माध्यमांसमोर बोलत होते, इशारे देत होते, सरकारला आव्हान देत होते ते फडणवीसांना माहिती नव्हते का? दंगलीची तयारी केली जात होती तेव्हा गृहखाते आणि फडणवीस काय करत होते? पोलीस काय करत होते?

राज्यात ध्रुवीकरण का होत आहे?

संजय राऊत : फडणवीसांच्या सरकारमध्ये असे काही मंत्री आहेत जे नाक्यावरील भाषा वापरतात. विरोधकांना धमक्या देतात, शिव्या देतात, त्रास देतात. असे लोक मंत्रिमंडळात असू नये. राज्याचे सरकार, मुख्यमंत्री निःपक्षपाती, धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. गोंधळ व तणाव निर्माण करणारी वक्तव्ये त्यांनी टाळायला हवीत. अशी वक्तव्ये करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना, मंत्र्यांना पाठिशी घातले जात आहे. यावरून आपल्याला स्पष्ट दिसत आहे की मुख्यमंत्री तणाव निर्माण करणाऱ्या, राज्याची शांतता बिघडवू पाहणाऱ्यांशी सहमत आहेत.

Story img Loader