आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीतील घटकपक्ष आहेत. गुरुवारी (५ ऑक्टोबर) ‘आप’चे नेते व खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्ली काँग्रेसचे प्रमुख दीपक बाबरीया यांनी म्हटले की, खासदार संजय सिंह यांची अटक खऱ्या आरोपांवर आधारित आहे की तपास यंत्रणांच्या गैरवापराचे उदाहरण हे आताच निश्चितपणे सांगता येणार नाही. बाबरीया यांच्या वक्तव्यामुळे उभय पक्षांतील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कथित दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी मात्र या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाबरीया यांचा अपवाद वगळता काँग्रेस पक्षाने या प्रकरणी मौन बाळगल्याचे दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलत असताना बाबरीया म्हणाले, “संजय सिंह यांच्या अटक प्रकरणाकडे काँग्रेस दोन दृष्टिकोनातून पाहते. एक म्हणजे, ‘आप’ने मागच्या नऊ वर्षांत जी काही आश्वासने दिली, त्यातील अनेक आश्वासने ही जुमलाबाजी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘आप’ पक्षाची विश्वासार्हता घसरली आहे. दुसरे असे की, पक्षाचे एक (माजी) मंत्री अनेक काळापासून तुरुंगात आहेत. न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यानंतर आता तिसऱ्या नेत्याचेही नाव घोटाळ्यात घेतले गेले आहे. या प्रकरणात जर तथ्य असेल, तर कायदा त्याचे काम करेलच. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.”

हे वाचा >> विश्लेषण: दिल्लीतील मद्य घोटाळा काय आहे? उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक का झाली?

सध्या या प्रकरणावर कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. जर नेत्यांना बळीचा बकरा केले असेल, तर त्याचा आम्ही निषेधच करू आणि या प्रकरणात जरा जरी तथ्य असेल, तर कायदा त्याचे काम करेलच, असेही बाबरीया यांनी म्हटले.

काँग्रेस पक्षातील सूत्रांनी सांगितले की, पंजाबमधील ‘आप’ सरकारने काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा यांना आठ वर्षांपूर्वीच्या अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केली आहे. या अटकेच्या संतापामुळे काँग्रेस पक्षाकडून संजय सिंह यांच्या अटकेबाबत अधिकृतरीत्या मौन बाळगण्यात आले आहे. खैरा यांच्या अटकेबाबतची नाराजी काँग्रेस नेत्यांनी ‘आप’च्या नेत्यांकडे व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात सूडाचे राजकारण करण्याची भाजपाची पद्धत वापरू नये, असेही काँग्रेस नेत्यांचे सांगणे आहे.

काही काळापूर्वी ‘आप’चे नेते, दिल्लीचे उपमुख्यंत्री मनीष सिसोदियाव मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अटकेच्या वेळीही काँग्रेसने सोईस्कर मौन बाळगले होते. त्याची पुनरावृत्ती आता होताना दिसत आहे. या वर्षी मार्च महिन्यात विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मनीष सिसोदिया यांच्याविरोधात केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरू असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. या पत्रावरही काँग्रेसने स्वाक्षरी केली नव्हती. एवढेच नाही, तर दिल्ली काँग्रेसने सिसोदिया आणि जैन तुरुंगात गजाआड असल्याचे पोस्टर दिल्लीत लावले होते.

न्यूजक्लिक या वृत्त संकेतस्थळावर छापेमारी करून संपादकांना अटक केल्यानंतर इंडिया आघाडीकडून संयुक्त निवेदन काढण्यात आले होते. त्या प्रकारचे निवेदन संजय सिंह यांच्या अटकेनंतर काढलेले नाही. संजय सिंग यांच्यावरील आरोपांची अद्याप चौकशी सुरू असल्याचे सांगताना बाबरीया म्हणाले, “सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकीय नेत्यांची पिळवणूक करण्यासाठी आणि लोकांना घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी केला जात आहे. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीतून सत्य आणि वास्तव कधीच बाहेर येत नाही. संजय सिंह केंद्र सरकारच्या विरोधात कडक भाषेत बोलतात म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली का? ही कारवाई त्यांना घाबरवणे आणि धमकावणे यासाठी झाली असेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो. असे असेल, तर हा लोकशाहीला मोठा धक्का आहे.”

‘आप’ पक्ष हा इंडिया आघाडीतील घटकपक्ष असल्याकडे लक्ष वळवल्यानंतर बाबरीया म्हणाले की, हा प्रश्न तुम्ही मल्लिकार्जुन खरगे यांना विचारू शकता. मी फक्त दिल्लीमधील परिस्थिती आणि इथल्या लोकांच्या भावना काय आहेत, एवढेच सांगितले.

काँग्रेस आणि आम आदमी पक्षात अशा वेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे; ज्यावेळी इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू होत आहे. इंडिया आघाडीतील पक्ष जागावाटपाच्या मुद्द्यावर अतिशय संथ गतीने चर्चा करीत असल्याच्या मुद्द्यावरून ‘आप’ने काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. जागावाटपाचा निर्णय महिनाभरात व्हावा, अशी ‘आप’ची इच्छा असली तरी काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेत सावकाश पावले टाकण्याची भूमिका घेतली आहे. दिल्लीमध्ये दोन्ही पक्षांत जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल? यावर प्रतिक्रिया देण्यास बाबरीया यांनी नकार दिला. हा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार असल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay singh arrest congress delhi in charge says nobody above law will wait for probe kvg