ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा असतानाही ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर पुन्हा एकदा खासदार होण्याचे स्वप्न पहाणारे माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे पक्षाने थेट कळवा-मुंब्रा विधानसभेची जबाबदारी सोपविल्याने त्यांचे समर्थक गोंधळून गेले आहेत. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पकड असलेल्या या मतदारसंघात भाजप फारच कमकुवत आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत हिंदु बहूल कळव्यात भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. असे असताना ठाण्याची स्वप्न पहाणाऱ्या संजीव नाईकांवर कळवा-मुंब्रा सारख्या ओसाड जमिनीवर कमळ फुलविण्याची जबाबदारी देऊन पक्षाने त्यांना बढती दिली की त्यांचा स्वप्नभंग केला याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना जोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील मातब्बर नेते गणेश नाईक यांचे पुत्र असलेले संजीव नाईक यांची नवी मुंबईचे महापौर म्हणून कामगिरी दमदार होती. मोरबेसारखे धरण नवी मुंबईकरांना मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहीला. या कामगिरीच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना तीन वेळा खासदारकीचे तिकीट दिले. प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा खासदारपदासाठी निवडणूक लढवली. परांजपे यांचे पुत्र आनंद यांनी त्यावेळी त्यांचा ९० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला खरा मात्र त्यानंतर झालेल्या नव्या ठाणे लोकसभा निवडणुकीत नाईक यांनी शिवसेनेचे वादग्रस्त उमेदवार विजय चौगुले यांचा ५० हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव करत शिवसेनेकडून ‘ठाणे’ खेचून घेतले. खासदार म्हणून ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईदर या शहरात त्यांचा सततचा राबता राहिला. देशात आणि राज्यात भाजप, संघ परिवाराची चलती नसतानाही नाईक यांनी सर्वपक्षीय संबंध ठेवण्यावर भर दिला. ठाणे शहरातील संघ कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशीदेखील ते सलोखा राखून असायचे. मात्र २०१४ मध्ये देशभरात आलेल्या नरेंद्र मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे यांनी संजीव यांचा दोन लाख ८२ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीत मात्र पक्षश्रेष्ठींचा आग्रह असतानाही नाईक कुटुंबियांनी उमेदवारी घेणे टाळले आणि पुढे थोरल्या नाईकांसह त्यांच्या समर्थकांनी भाजपची वाट धरली.

हेही वाचा – अमित शहांच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा ११ वेळा उल्लेख

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात नाईकांची तयारी

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांनी येथील प्रशासकीय तसेच राजकीय वर्तुळावर एकछत्री अंमल निर्माण करायचा प्रयत्न सुरू केला आहे. यातूनच जिल्ह्यातील भाजप आणि मुख्यमंत्री समर्थकांमध्ये जागोजागी विसंवादाचे सूर दिसू लागले आहेत. राज्यात नवे मंत्रिमंडळ स्थापन होताच कळव्यात झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेत यापुढे भाजपचा खासदार दिसेल असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचे काही दौरे या मतदारसंघात ठरवून करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून संजीव नाईक यांनीही ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा बांधणी सुरू केली आहे.

ठाणे लोकसभेवर मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा दावा असला तरी भाजपनेही येथून तयारी सुरू केली. नाईक यांच्या एप्रिल महिन्यात झालेल्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी ठाणे, मीरा भाईदर शहरात जोरदार वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने संजीव नाईक यांची ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छ जाहीरपणे दिसून आली. असे असताना पक्षाने मात्र त्यांना नव्या नियुक्त्यांमध्ये कळवा-मुंब्रा विधानसभेची जबाबदारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा – सुधीर मुनगंटीवार गटाचे वर्चस्व; हंसराज अहीर समर्थकांना डावलले!

जुन्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक वर्षानुवर्षे निवडून येत असत. मुंब्रा आणि कळव्याचा काही भाग या मतदारसंघात येत असे. हा इतिहास वगळला तर कळवा-मुंब्रा परिसर नाईक कुटुंबियांसाठी कधीच राजकीय परिक्षेत्र राहिलेला नाही. सद्यस्थितीत या मतदारसंघात भाजपची ताकद नसल्यातच जमा आहे. कळव्यातही मुख्यमंत्री समर्थकांचा जोर दिसून येतो. असे असताना हा मतदारसंघ संजीव नाईकांकडे सोपवून भाजप पक्षश्रेष्ठी त्यांना नेमका कोणता संदेश देऊ पहात आहे, अशी चर्ची त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ठाणे लोकसभेचे संयोजक म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड करण्यात आली असताना ठाण्यातून खासदारकीचे स्वप्न पाहणारे संजीव नाईक यांची पाठवणी कळव्यात होणे हेदेखील त्यांच्या समर्थकांना अस्वस्थ करणारे ठरले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjeev naik who was expecting thana given responsibility of strengthening bjp in kalwa mumbra print politics news ssb
Show comments