कोची येथील एका कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत यांनी इंग्रजीमधून भाषण दिले. हिंदीचा प्रामुख्याने वापर करणारा रा. स्व. संघ आपल्या विस्तारासाठी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंग्रजी भाषेचा स्वीकार करत आहे का? संघाचा इंग्रजीला विरोध का होता आणि आता इंग्रजीचा स्वीकार का केला जात आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रा. स्व. संघाने ‘हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान’ ही घोषणा आपली ओळख बनवली होती. कार्यक्रमांमध्ये संघाने हिंदी भाषेला कायम प्राधान्य दिले. परंतु, आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रा. स्व. संघ इंग्रजी भाषेचा स्वीकार करत आहे. ७ ऑक्टोबर रोजी डॉ. मोहन भागवत यांनी कोची येथे श्रोत्यांना संबोधित केले तेव्हा त्यांनी ”सज्जन और माता, भगिनी” अशी हिंदीमध्ये सुरुवात केली. त्यानंतर पुढे बोलताना ते, ”मला इंग्रजीमध्ये बोलण्यास सांगितलेले आहे. इंग्रजी माझ्या अभ्यासाची भाषा नाही. ती सुंदर भाषा आहे; पण भारतीय संकल्पना मांडण्यासाठी ती अपुरी आहे, असे मला वाटते. तरीही मी प्रयत्न करेन आणि माझी भाषा ऐकून घेण्याचा प्रयत्न करा,” असे म्हणाले. त्यानंतर ते ५० मिनिटे अस्खलित इंग्रजीत बोलत होते.

हेही वाचा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकीय वाटचाल; नव्या गाण्याच्या माध्यमातून संघ काय दर्शवू पाहतो?

या भाषणामुळे रा. स्व. संघाचा इंग्रजीला असणारा विरोध मावळला आहे, असे वाटते. एकेकाळी ‘हिंदी, हिंदू, हिंदुस्तान’ ही घोषणाच संघाची ओळख झालेली. परंतु, आता त्यांच्या बौद्धिक कार्यक्रमांमध्येही इंग्रजी भाषेचा समावेश केला गेलेला दिसतो.

संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी इंग्रजी साहित्यामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. ते खासगी संभाषणात आणि जाहीर कार्यक्रमांमध्येही इंग्रजी भाषेमध्ये बोलतात. संघातील एका सूत्राने द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, रा. स्व. संघाने आपले साहित्य हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित केलेले आहे. परंतु, मागील काही वर्षांमध्ये इंग्रजी पुस्तके प्रकाशित करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच, सरस्वती शिशु मंदिर आणि त्यांच्याशी संलग्न विद्या भारतीद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक संघ शाळांनी इंग्रजी माध्यमाचा स्वीकार केलेला आहे. हिंदी बहुभाषिक असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्येही या शाळांचा समावेश आहे.

हेही वाचा : सरसंघचालकांच्या भाषणात वोकवादाचा उल्लेख, काय आहे या संकल्पनेचा इतिहास

रा. स्व. संघाच्या एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने सांगितल्यानुसार, ”शाळेचे माध्यम कोणते असावे, याचे वरिष्ठांकडून आदेश येत नाहीत. स्थानिक पातळीवर शाळांचे मुख्याध्यापक, पालक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतले जातात. शाळेचे माध्यम इंग्रजी भाषा असावी, असे संघाचे धोरण नाही. तसेच, सीबीएसई अभ्यासक्रमाचा स्वीकार करणे ही काळ आणि शाळेची गरज आहे. माध्यम कोणतेही असले तरी भारतीय मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजेत, ” असे त्यांनी स्पष्ट केले.

रा. स्व . संघातील एका सूत्राने सांगितल्यानुसार, ईशान्य भारतामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांविरुद्ध आपल्या विचारांचे अधिष्ठान असणाऱ्या शाळा संघाने १९७० च्या काळात उघडल्या होत्या. तेव्हा संघाने स्वीकारलेल्या तत्त्वांच्या हे विरुद्ध आहे. त्या काळात के. एस. सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली अरुणाचल प्रदेश सरकारकडून जमीन आणि संसाधने पुरवण्याची ‘ऑफर’ नाकारली गेली. कारण- ही जमीन देण्याच्या बदल्यात त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, अशी अट ठेवली होती.

रा. स्व. संघाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, ”डॉ. भागवत यांनी इंग्रजीत भाषण करणे ही दुर्मीळ घटना आहे.” ”डॉ. भागवत हे ज्यांना प्रादेशिक भाषा येत नाहीत, त्यांच्याशी इंग्रजीमध्ये खासगीl संवाद साधतात. परंतु, सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यासाठी ते हिंदी आणि मराठी या भाषांना प्राधान्य देतात. तमिळनाडूमध्येही त्यांनी स्थानिक स्वयंसेवकांना रिअल टाइम भाषांतरासह हिंदीमध्ये संबोधित केले आहे,” असे आरएसएसच्या एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने सांगितले.

१९७३ मध्ये तत्कालीन रा. स्व. संघाचे प्रमुख एम. एस. गोळवलकर यांना तमिळनाडूमध्ये एका सभेला इंग्रजीमध्ये संबोधित करण्याची विनंती कशी केली होती. पण, ते हिंदीमध्ये बोलले आणि त्याचे तमीळ भाषांतर करण्यात आले. “एक दिवस मी इंग्रजीत आणि दुसऱ्या दिवशी हिंदीत बोललो. परंतु, प्रशिक्षणार्थींना विचारल्यानंतर असे लक्षात आले की, लोक इंग्रजीपेक्षा हिंदी अधिक समजू शकतात. कारण- हिंदीतील बरेच शब्द त्यांच्या भाषेमध्येही आहेत,” असे एका स्वयंसेवकाने सांगितले.

भाजप खासदार व रा. स्व. संघाशी संबंधित नेते राकेश सिन्हा यांनी संघाच्या व्यवस्थेविषयी पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी लिहिल्यानुसार, संघ कधी भाषेचे बंधन मानत नाही. संघाने इंग्रजीचा केलेला स्वीकार हा वर्तमान अन् वास्तवतेला धरून आहे.

“भाषा ही संस्कृतीची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे भारतीय भाषांच्या संवर्धनावर रा. स्व. संघाचा भर आहे. मागील ४०० वर्षांपासून इंग्रजी ही जागतिक स्तरावरील एक महत्त्वाची भाषा बनली आहे. प्रत्येक क्षेत्र, साहित्यामध्ये इंग्रजीचा वापर होऊ लागला. अभिजात वर्गामध्ये, समाजाचा एका विशिष्ट स्तरामध्ये इंग्रजीमध्ये बोलले जाते. त्यामुळे आपली विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इंग्रजीचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे,” असे ते म्हणाले.
आरएसएसच्या ‘प्रज्ञा प्रवाह’ या थिंक टँकचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार म्हणतात की, ”संघाचा इंग्रजीला कधीच विरोध नव्हता. इंग्रजांनी जी वसाहतवादी प्रवृत्ती आपल्या संस्कृतीवर लादली, त्याला आमचा विरोध आहे. १९२५ ते १९४० या काळात संघाच्या शाखांचे सर्व आदेश इंग्रजीत होते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. १९४१ नंतर हे आदेश संस्कृतमध्ये देण्यात येऊ लागले. गोळवलकर गुरुजींचे ‘अ बंच ऑफ थॉट्स’ हे पुस्तक प्रथम इंग्रजीत प्रकाशित झाले. ते केरळला जात, तेव्हा ते इंग्रजीमध्ये संवाद साधत,” असेही नंदकुमार म्हणाले.

नंदकुमार यांच्या मताशी सहमती दर्शवीत राकेश सिन्हा म्हणाले, “रा. स्व. संघाचे माजी स्वयंसेवक आणि भारतीय जनसंघ पक्षाचे माजी खासदार दत्तोपंत ठेंगडी यांची संसदेतील जवळपास ९० टक्के भाषणे इंग्रजीत होती.” नंदकुमार म्हणाले, ”ज्यांना भारतीय भाषा कळत नाहीत, त्यांच्याशी संवाद साधताना इंग्रजी भाषेचा वापर करण्यास संघाचा कधीही विरोध नव्हता. आम्ही भारतीय मूल्ये जपूच; पण त्यासाठी इंग्रजीकडे दुर्लक्ष करणार नाही. आम्ही इंग्रजीही शिकूच. वेळ आली, तर माध्यम भाषा म्हणून फ्रेंचही शिकू.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarsanghchalak bhagwats speech in english in kerala what is the reason behind the decline of english hatred of the team vvk
Show comments