नागपूर : पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे काम फार मोठे आहे. आजच्या काळातील भाजपचे कार्यकर्ते ह्या गोष्टी ऐकतात तेव्हा त्यांना विश्वास होत नाही. कारण त्यांचे कार्य तेवढे तेजोमय आणि ऊर्जावान होते. त्यांच्याएवढी उंची आपण गाठू शकत नाही. त्याची आवश्यकताही नाही. मात्र, त्यांच्या आयुष्यामधील शंभरातील एक गुणही आपण घेऊ शकलो तरी दाही दिशा उजळवून देऊ शकतो, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
ज्येष्ठ हिंदी कवी दयाशंकर तिवारी (मौन) यांच्या ‘मां भारती के सारथी पं. दीनदयाळ उपाध्याय’ या महाकाव्याचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. भागवत म्हणाले, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या लोकांचे जीवन ऊर्जावान असते.
हेही वाचा >>>Tripura : त्रिपुरा दहशतवादमुक्त? ‘एनएलएफटी’ आणि ‘एटीटीएफ’ बंडखोर गटाच्या ६०० सदस्यांचं आत्मसमर्पण
त्यांचे जीवन संपले तरी त्यांच्या आयुष्याचे कार्य इतके मोठे असते की ते एक तत्त्व म्हणून इतरांसाठी प्रेरणादायी बनते. त्यांचे जीवन इतके ऊर्जावान असते की, येणाऱ्या काळात त्यांच्या आदर्शावर अनेक लोक घडत जातात. त्यांच्या ऊर्जेतील एक कणही आपल्याला मिळाला तरी जीवन सफल होईल.
आजच्या पिढीतील भाजपचे कार्यकर्ते या गोष्टी ऐकतात तेव्हा त्यांना विश्वास होत नाही असे एक वक्ता बोलून गेले. त्यांच्याइतके आपण मोठे होणे शक्य नाही. परंतु, ‘तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाही’ या ओळींप्रमाणे दीनदयाळजींच्या आयुष्यातला एक कणही घेता आला तरी आपण दाही दिशा उजळवून काढू शकतो असा सल्लाही सरसंघचालकांनी दिला.