सातारा : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात साताऱ्याचा दबदबा यावेळीही कायम राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील आठ पैकी तब्बल चार मतदारसंघातील आमदार मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचेही मूळ सातारा जिल्ह्यात आहे. त्यामुळे अर्धे अधिक मंत्रिमंडळ सातारा जिल्ह्यातील आहे. पालकमंत्रीपदासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.
भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा) जयकुमार गोरे (माण)राष्ट्रवादीचे मकरंद पाटील (वाई) शिवसेनेचे शंभूराज देसाई पाटण हे मंत्री कॅबिनेट मंत्री झाले आहेत. साताऱ्याच्या राजकारणावर शरद पवारांचे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही वर्ष आधी प्राबल्य होते. परंतु आता सर्वाधिक आमदार भाजपाचे आणि महायुतीचेच निवडून आले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदा त्यावेळी साताऱ्यातून भाजपमध्ये प्रवेश केला . त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले आदी अनेकांनी पक्ष बदलत भाजपात प्रवेश केला. माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना यावेळी भाजपने मंत्रिपद दिले आहे.
हे ही वाचा… Maharashtra Politics : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही बाहेर पडणार का? शिवसेनेची का सोडली होती साथ?
साताऱ्याच्या राजघराण्याला तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळाल आहे. उदयनराजे यांचे वडील प्रतापसिंहराजे हे स्थानिक राज्यकारणात आघाडीवर होते. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांचे वडील दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी विधिमंडळात अनेक वर्ष साताऱ्याचे नेतृत्व केले. कॅबिनेट मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यानंतर सेना भाजपा युती सरकारच्या काळात उदयनराजे भोसले महसूल राज्यमंत्री होते. आता शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळे राजकारघराण्याला तिसरे मंत्रीपद मिळाले आहे.
वाई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, राष्ट्रवादीचे मदन पिसाळ यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं होते. त्यानंतर आजपर्यंत वाई तालुक्याला मंत्रिपदाची हुलकावणी दिली होती. अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या मकरंद जाधव पाटील यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला. अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवले आहे,आता मकरंद पाटील यांना मंत्रीपद देऊन अजित पवारांनी वाईत डबल धमाका केला आहे. शरद पवारांना या जिल्ह्यात पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी फार मोठी शिकस्त करावी लागेल. याचाच फायदा उचलत मकरंद आणि नितीन पाटील यांच्या माध्यमातून अजित पवार साताऱ्यात आपला पक्ष मजबूतीसाठी प्रयत्न कररत आहेत.
पाटणचा दुर्गम आणि डोंगराळ भागातून आलेल्या शंभूराज देसाई यांना पुन्हा शिवसेना शिंदे पक्षातून मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी अनेक वर्ष मंत्री त्यांच्यानंतर विक्रमसिंह पाटणकर आणि आता शंभूराजे देसाई यांना मंत्रिपद मिळाले आहे. अनेक वर्ष आमदार राहिलेल्या शंभूराजे देसाई यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आणि साताऱ्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. यानंतर महायुती सरकारच्या सरकारमध्ये त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा व ठाणे जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून ही कामकाज पाहिले आहे. शंभूराज देसाई या पदासाठी पुन्हा इच्छुक आहेत.
शंभूराजे देसाई यांचे पालकमंत्रीपद बदलण्याचा दबाव वरिष्ठांवर आहे. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपाकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील यांचे नाव सध्या चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मकरंद पाटील यांच्यासाठी आग्रही आहेत.